घरफिचर्सनदी वाहते...जीवन वाहू द्या

नदी वाहते…जीवन वाहू द्या

Subscribe

प्रत्येक वर्षाच्या सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा ‘जागतिक नदी’ दिवस (World Rivers Day) म्हणून साजरा केला जातो. ‘मार्क अंजेलो’ (Mark Angelo) या जागतिक जलतज्ज्ञाच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक नदी दिवस साजरा करण्याचे निश्चति केले. संयुक्त राष्ट्राच्या या निर्णयानुसार २००५ मध्ये जगातील ६० देशांनी जागतिक नदी दिवस साजरा केला. यावर्षीचा जागतिक नदी दिवस ३० सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.

मानवी संस्कृतीचा उदय आणि विकास नदीच्या काठी झाला. मानवाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात नदीचे विशेष महत्व आहे. जगभरात प्रमुख सर्व शहरे नदीच्या काठी वसल्याची व विकास पावल्याचे आढळून येते. आदिम काळापासून माणूस नदीची पूजा करीत आला आहे. आजही काही आदिवासी समुदायांमध्ये नदी, झरे यांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जाते. मानवाच्या विकासात नदी ही अपरिहार्य बाब होती आणि आजही आहे. मात्र, आज नळाने पाणीपुरवठा होणार्‍या आपल्या या समाजाला नद्यांचे महत्व वाटेनासे झाले आहे. शहरी भागातील माणसाला आपण वापरीत असलेले पाणी कुठून येते आणि आपण सांडपाणी जे नाल्यामध्ये सोडतो ते शेवटी कुठे जाते, याबद्दलची माहितीही नसते. शिवाय याबाबत काही देणे घेणेही नसते. अर्थात काही सजग नागरिकांचा याला अपवाद आहे. नदीच्या बाबतीत ही उदासीनता प्रादेशिक सीमेपलीकडे जाऊन मानव आणि सर्वच सजीव सृष्टीच्या भविष्याच्या दृष्टीने खूप चिंतेची बाब आहे.

जी नैसर्गिकरित्या वाहत असते ती नदी. आम्ही पर्यावरण शिक्षण केंद्राच्या माध्यमातून पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, आदी जिल्ह्यात पर्यावरण विषयक कार्यशाळा घेतो. या कार्यशाळेत शिक्षक आपले अनुभव सांगताना म्हणतात, गावातील नदी आमच्या लहानपणी बारा महिने वाहत असे, आता ती तीन चार महिन्यातच आटते. अशा प्रकारे बारमाही नद्या ३-४ महिनेही नीट वाहत नाहीत आणि हंगामी वाहणार्‍या नद्या त्या-त्या भागांतून गायब होताना दिसतात. मात्र, या नद्या आटतात तरी का? किंवा कसे? असे प्रश्न खूप कमी लोकांना पडतात. असे प्रश्न पडले तरी त्याचे कारण आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न किती लोक करतात. हा अजून पुढचा प्रश्न. नद्या आटण्याचे प्रमुख कारण म्हणजे नद्यांचे मूळ प्रवाह (Base flow) कमी होणे. मूळ प्रवाह म्हणजे झरे. हे झरे कसे कमी होतात? हा नवीन प्रश्न समोर येतो. झर्‍यातून वाहणारे पाणी येते कुठून याचा जर शोध घेतला तर आपल्याला हे झरे कसे आटतात हे समजून घेणे सोपे जाईल. जमिनीच्या पोटात वेगवेगळ्या प्रकारचे दगड, खडक यांची रचना असते. या दगड खडकात त्यांच्या प्रकारानुसार छोटी-मोठी पोकळ जागा असते. पावसाचे पाणी जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा ते पाणी जमिनीवरील झाडे, झुडपे, गवत यांच्या मुळांच्या सोबत जमिनीत मुरते. पाणी जमिनीत मुरते म्हणजे जमिनीखालील या दगड-खडकांमध्ये असलेल्या पोकळ जागेत साठवले जाते. ज्या ठिकाणी पाणी खडकात मुरते त्या भागाला ‘रिचार्ज एरिया’ म्हणतात. तर जेथून झरा वाहायला सुरुवात होते, त्या भागाला ‘डिस्चार्ज एरिया’ म्हणतात. रिचार्ज एरियामध्ये झाडे, झुडपे, गवत, सलग समतल चरी इ. असतील तर पडणारे पाणी जमिनीत मुरून खडकात साचते. हेच पाणी झर्‍याच्या स्वरुपात बाहेर पडून नदीचा उगम होतो किंवा एखाद्या नदीला जाऊन मिळते. म्हणून रिचार्ज एरियामध्ये बांधकाम, औद्योगिक प्रकल्प इ. बाबींना परवानगी नाकारली पाहिजे. या भागातील झाडे, झुडपे, हिरवळ वाढवली पाहिजे. मात्र, खेदाची बाब अशी की, हा रिचार्ज एरिया कुठे असतो? महाराष्ट्रातील भूगर्भातील खडक रचना कशी आहे? याचा अभ्यास आजतागायत नीटसा झालेला सापडत नाही.

- Advertisement -

नद्यांचे महत्व :

माणसाच्या गरजांसाठी तसेच इतर सजीवांना पाणीपुरवठा करण्यासोबतच नदीच्या निसर्गातील इतरही खूप महत्वपूर्ण भूमिका असतात. नदीमार्गातील दगड गोटे, खडक यांची झीज होऊन माती तयार होत असते. वाहत्या पाण्यात मृत वनस्पती, प्राण्यांचे अवशेष असे जैविक तसेच खनिजे, ऑक्सिजन असे अजैविक घटक मिळतात. या घटकामुळे नदीपरिसरातील माती सुपीक बनत असते. दगड गोटे व खडकापासून बनलेली माती नदी सपाट प्रदेशात आणून सोडते. नदी जेव्हा वाहत असते तेव्हा पाणी स्वच्छ व पिण्यासाठी आरोग्यदायी ठरेल अशी क्रिया करीत असते. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण यातून वाढत असते. वेगवेगळ्या आकाराचे दगड गोटे, जाड, मध्यम व बारीक आकाराची वाळू यातून नद्या स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि वाहत्या राहिल्या तर नदीचे आरोग्य, पाण्याचे आरोग्य टिकून राहते. यातून नदी परिसरातील माणसाचे, इतर सजीव सृष्टीचे आरोग्य चांगले राहते. वाहती नदी जेव्हा वेगवेगळ्या पाणथळी जागेला मिळते तेव्हा त्यामधील मासे, खेकडे इतर जलचर यांना पोषक अन्नद्रव्य त्यामध्ये येत असतात. समुद्रातील मासे आणि इतर जलचरासाठीही महत्वाचे अन्नद्रव्य नदीच घेऊन येत असते. पाण्याचे पावसापासून समुद्रापर्यंतचे जलचक्र नदीमार्फतच पूर्ण होते.

नद्या का धोक्यात आहेत?

नदी ही त्याकाठी राहणार्‍या माणसांचा आरसा असतो. नदीकाठची माणसे कशा प्रकारचे आहेत हे नदीपात्र आणि नदीमधील पाणी बघून सहज सांगता येईल. मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी नदी आपल्याला इतके काही देते, ज्यातून मानवाची संस्कृती विकसित आणि समृद्ध होते, पण आपण परत नदीला काय देतोय? कपड्यांची लक्तरे, कापलेले केस, प्लास्टिक, फोमच्या गाद्या, ताडपत्री, विसर्जित केलेल्या देवांच्या मुर्ती, फोटो, चपला, जोडे, सिगारेटची पाकिटे, दारूच्या बाटल्या, डिटर्जंट पावडरचे रिकामे पाऊच, थर्माकोलचे पुठ्ठे, लोखंडी भंगार, टायर, ट्यूब्ज आणि मानवी मलमूत्र तसेच कारखान्यातून सोडलेले धातू आणि रसायनयुक्त पाणी! शहरातील आपण सर्वजण या सर्व गोष्टी नदीपात्रात टाकत असतोच. आपल्या घरी रोज आपण ज्या गोष्टींचा वापर करतो त्यातून देखील नदी प्रदूषित होत असते. भरमसाठ डिटर्जंटचे पाणी, अंगासाठी आणि भांड्यासाठी वापरलेल्या साबण किंवा जल याचे फेसयुक्त पाणी हे सर्व थेट नदीत जाऊन मिळते. त्यामुळे नदीमध्ये जलपर्णी वाढणे, त्यामधील जीव नाहीसे होणे असे प्रकार घडतात. डासांची अंडी फस्त करणारे जलचर, मासे नाहीसे झाल्यामुळे नदीकाठच्या वस्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर डासांची संख्या वाढल्याचे दिसून येते.

- Advertisement -

नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला आज वेगवेगळे धोके निर्माण झाले आहेत. टेकड्यावरील आणि रिचार्ज एरियामधील वृक्ष कमी होऊन पाणी मुरण्याचे प्रमाण कमी, कमी होत आहे. विंधन विहिरींची (बोरवेलची) वाढत जाणारी संख्या आणि खोली यातून जमिनीतील पाणी साठवून ठेवणारे खडक पोकळ होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषित घटक मुक्तपणे नदीत सोडले जाणे. नदीमधील जाड, मध्यम व बारीक वाळूचा प्रचंड उपसा करणे. शहरी भागांतील लोकांचे मैलापाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडणे, इत्यादी नदीला असलेल्या धोक्यांची यादी करता येईल. नदी जोडप्रकल्प आणि मोठी धरणे ही देखील नदीच्या परिसंस्थेपुढील गंभीर धोके आहेत. मात्र, हे स्वतंत्रपणे मांडण्याचे विषय आहेत. आज औद्योगिक भागातून वाहणार्‍या नद्या तर प्रदूषित आहेतच, त्याबरोबर मोठ्या शहरांतून बाहेर पडणार्‍या नद्या या निव्वळ गटार बनून बाहेर पडतात. आज ज्यात पोहता येईल अशा किती नद्या शिल्लक आहेत. उजनीतील मैलापाण्यामुळे अनेकदा मिथेन गॅसस्फोट सारखी गंभीर समस्या निर्माण झालेले आपण अनुभवतो आहोत. महाराष्ट्र शासनात जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अशा पाणी या विषयाला घेऊन तीन वेगवेगळी खाती आहेत. या खात्यांतर्गत डझनभर तरी वेगवेगळी प्राधिकरणे आणि विकास महामंडळे आहेत. असे वेगवेगळे विभाग, महामंडळे आणि प्राधिकरण यांच्याकडे महाराष्ट्रातील जमिनीवरील पाणी, प्रामुख्याने नदी आणि तळी यांचा विकास आणि व्यवस्थापन करणे, भूजलाचे नियमन करणे इ. महत्वपूर्ण कामे आहेत. इतकी यंत्रणा असूनही म्हणावे तसे त्याचे काम दिसत नाहीत.

आपले शासन आणि प्रमुख शासनसंस्थांच्या कामाचा भर पाणलोट विकास कार्यक्रमावर असतो. ही कामे महत्वाची आहेतच नाही, असे नाही. मात्र, एखाद्या हौदाला खालून असंख्य छिद्र असताना त्यामध्ये पाणी ओतण्याचे काम केल्यासारखे या पाणलोट कार्यक्रमांना यश येताना दिसत नाहीत. पाणलोट कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतील दोष हा वेगळा मुद्दा आहेच. मात्र, भूजलाचे नियमन आणि व्यवस्थापन, पिक पद्धती इ. गोष्टींमध्ये नागरिक तसेच शासनाने लक्ष घातल्याशिवाय आपल्या नद्या प्रवाहित राहू शकत नाहीत. आज बोरवेल, विहीर इत्यादीचे नियमन करणारी यंत्रणा उपलब्ध नाही. रिचार्ज एरियाचाच अभ्यास नसल्यामुळे त्या भागातील अतिक्रमणासंबंधी कुणाचे लक्ष नाही. नदी परिसरातील तथाकथित विकास प्रकल्पांना देण्यात येणारी मंजुरी इ. बाबींवर डोळसपणे चर्चा, अभ्यास पुढे येणे गरजेचे आहे. यातून नदीबाबत उत्तरदायी समाज, सामाजिक संस्था, शासन तयार होऊ शकेल. आपल्या सर्वांच्या सक्रीय सहभागातून आपल्या नद्या पुन्हा स्वच्छ आणि खळखळून वाहतील.

बसवंत विठाबाई बाबाराव

(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -