घरफिचर्सहोऊ द्या खर्च...

होऊ द्या खर्च…

Subscribe

प्रमुख क्रीडांगणांसह शिखरेवाडी मैदान, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी विभागातील अन्य अनेक क्रीडांगणांची वाताहत पाहता आता नव्याने क्रीडांगण विकास म्हणजे ‘आपल्याच पोळीवर तूप ओढणे’ असा प्रकार तर लोकप्रतिनिधी या निवडणुकीच्या तोंडावर करीत नसतील ना, हा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

नाशिक महापालिकाअंतर्गत राखीव जागांवर क्रीडांगण साकारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला खरा, पण शहरातील यापूर्वीच्या क्रीडांगणांच्या देखभाल-दुरुस्तीचा महत्त्वपूर्ण प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नेहमीप्रमाणे ‘होऊ द्या खर्च’ म्हणत स्थायीच्या बैठकीत सातपूर, नाशिकरोड, पंचवटी आणि सिडकोतील विविध ठिकाणी क्रीडांगण विकासासाठी तब्बल दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. परंतु, आजघडीला जे आहेत त्या क्रीडांगणांच्या देखभाल-दुरुस्तीविषयी पुन्हा उदासीनताच दिसून आली. शहरातील राजे संभाजी स्टेडियम, स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम, शिवाजी स्टेडियम या प्रमुख क्रीडांगणांसह शिखरेवाडी मैदान, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी विभागातील अन्य अनेक क्रीडांगणांची वाताहत पाहता आता नव्याने क्रीडांगण विकास म्हणजे ‘आपल्याच पोळीवर तूप ओढणे’ असा प्रकार तर लोकप्रतिनिधी या निवडणुकीच्या तोंडावर करीत नसतील ना, हा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत निधी मंजुरीची खैरात वाटली गेली. यात सदस्यांच्या विकासकामांसह विविध कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. यात सातपूर विभागातील प्रभाग ९ व प्रभाग २६ मध्ये क्रीडांगण विकासासाठी २.८० कोटी आणि २.२२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. नवीन नाशिक विभागातील प्रभाग २४ मधील पाटीलनगर येथे जुन्या एसटीपीच्या जागेवर क्रीडांगणासाठी १.९३ कोटी, नाशिकरोड विभागातील प्रभाग १९ मधील चेहेडी शिवारात क्रीडांगणासाठी ९३.४२ लाख तसेच पंचवटी विभागात प्रभाग ४ मधील शिवनगर चौफुलीजवळच्या जागेत २.५६ कोटी रुपयांच्या क्रीडांगण प्रस्तावासही स्थायीने मंजुरी दिली. प्रभाग क्रमांक १२ मधील २ एकर जागेत स्टेडियम कॉम्प्लेक्स उभारण्यासही मंजुरी देण्यात आली. त्यामुळे एकाच वेळेस तब्बल दहा कोटींच्या क्रीडांगण प्रस्तावास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. तसे पाहता नाशिक क्रीडानगरीसाठी ही आनदंवार्ता असली तरी प्रत्यक्षात केवळ कागदी घोडे नाचविण्यातच आजवर प्रशासनाने धन्यता मानल्याची अनेक उदाहरणे आहेत. अगोदरच अनेक पांढरे हत्ती पोसून तिजोरीत खडखडाट झालेल्या नाशिक महापालिकेने आता अनेक प्रकल्पांकडे पाठ फिरवली आहे. त्यात नव्याने क्रीडांगण विकास म्हणजे ‘हातचं सोडून पळत्याच्या मागे’ लागण्याचा प्रकारच म्हणावा.

- Advertisement -

देखभाल-दुरुस्तीचे काय..?

केवळ क्रीडांगण उभारून खेळाचा प्रचार-प्रसार शक्य नसतो. प्रकल्पांच्या आड सरकारी तिजोरी रिती करण्यापेक्षा लोकप्रतिनिधींनी खर्‍या अर्थाने खेळाडूंच्या विकासासाठी विविध प्रकारचे खेळ, त्यासाठी आवश्यक साहित्य, उपाययोजना, सर्व सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून देणे गरजेचे आहेे. क्रीडांगणांवर प्रशिक्षक, क्रीडा क्षेत्रातील जाणकार व्यक्ती नेमणेही तितकेच गरजेचे असते. क्रीडांगण साकारल्यानंतर पुढे नियमितपणे जबाबदार खांद्यांनी त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष द्यायला हवे. पालिका प्रशासनाने याकामी नियमीत लक्ष ठेवणे,खेळाडू- मार्गदर्शक, प्रशिक्षक- संघटक यांच्याकडून आलेल्या सूचनांचा विचार करून योग्य त्या सुधारणा देणे महत्त्वाचे ठरते. तसे पाहिले तर ज्या संस्थेला, ठेकेदाराला याबाबत काम दिले जाते, त्यांच्याकडून निर्धारित कालावधीत देखभाल बंधनकारकच असते. परंतू, प्रत्यक्षात तसे होत नसल्याने आजवर अनेक क्रीडांगण, व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक यांची अल्पावधीतच दुरवस्था झाल्याचे दिसून येते. ‘स्पोर्टस हब’ म्हणून नावारूपास येणार्‍या नाशिक नगरीत तसे पाहिले तर क्रीडाविषयक सुविधांची वाणवाच आहे. केवळ उद्याने, क्रीडांगण, व्यायामशाळा बांधून खेळाडू घडतील असे नाहीच. तर त्यानंतरही योग्य ती पावले उचलली जाणे तितकेच गरजेचे आहे.

आहे त्या क्रीडांगणांच्या दुरवस्थेचे काय?

आजघडीला राजे संभाजी स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम, शिखरेवाडी मैदान यांसह जवळपास सर्वच मैदानांवर आवश्यक सुविधांसाठी खेळाडूंची ओरड आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचा समावेश करावा, त्यासाठी पुरेसे साहित्य असावे, त्याची नियमीत देखभाल व्हावी, स्पर्धा व्हाव्यात अशी विविध क्रीडा संस्था, संघटना, खेळाडूंची मागणी दुर्लक्षितच केली जाते ही खेदाची बाब म्हणावी. मुख्य म्हणजे अशा क्रीडांगणांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम क्रीडा संघटक वा प्रशिक्षक, मार्गदर्शक यांच्याकडे देण्याचा विचारही फायद्याचा ठरू शकतो. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान हे त्यासाठी उत्तम उदाहरण ठरू शकेल. नव्याने विकसीत होणार्‍या क्रीडांगणांबाबत तरी प्रशासनाने या मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करावा आणि कागदी घोडे नाचविण्यापेक्षा खर्‍या अर्थाने नाशिकचा क्रीडा विकास साध्य करावा, एवढीच काय ती नाशिककर क्रीडाप्रेमींची अपेक्षा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -