घरफिचर्सवुहान आणि आपण !

वुहान आणि आपण !

Subscribe

संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या कोविड-19 विषाणूचे केंद्रस्थान म्हणून ज्या शहराला मानले गेले त्या चीनमधील वुहान शहराचे लॉकडाऊन बुधवारी काढण्यात आले. तब्बल तीन महिने वुहान करोनाशी दोन हात करत होते. गेल्या मंगळवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत करोनाचे एकही प्रकरण वुहानमधून समोर आले नाही. त्यामुळे लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे इथल्या लोकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. यावेळी अनेक ठिकाणी डिजिटल जाहिरातींच्या बोर्डवर करोनाशी लढणार्‍या डॉक्टर आणि सेवाकर्मींचे आभार मानण्यात आले. या निमित्ताने यांगतेज नदीच्या दोन्ही बाजूला लाईट शो, इमारती आणि पुलांवर आरोग्य कर्मचारी रुग्णाला घेऊन जात असल्याच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. किनार्‍यावर आणि पुलावर लोक ध्वज फडकवत ‘वुहान पुढे जा’चे नारे देत होते. चीनचे राष्ट्रगीत देखील गात होते.

करोना विषाणूचा संसर्ग होत असल्याची बाब पुढे आल्यानंतर 23 जानेवारीला वुहानमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर शहरातील लोकांना घरात राहण्यास भाग पाडले गेले. चीन सरकारने जाहीर केल्यानुसार वुहान शहरात 82 हजारांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली. या विषाणूमुळे तब्बल 3 हजार 300 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अर्थात चीनच्या या आकड्यांवर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. एकट्या वुहान शहरात सुमारे 42 हजार लोकांचा मृत्यू करोनाने झाल्याचे तेथील स्थानिक नागरिकच सांगतात. वुहानमधून सुरू झालेला करोना विषाणूचा संसर्ग बघता बघता जगभरात पसरला. आज येथून सुरू झालेल्या संकटाने बघता बघता इटली, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, भारत यांसारख्या देशांना आपल्या जाळ्यात ओढले. पण जेथून आजाराचा उगम झाला ते वुहान मात्र आता आजारमुक्त आहे. त्याचे श्रेय तेथील सरकार आणि नागरिकांच्या सहनशीलतेला द्यावे लागेल.

- Advertisement -

76 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये लोकांच्या घराबाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली होती. फक्त जीवनाश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची लोकांना परवानगी होती. शहराच्या सीमारेषाही बंद करण्यात आल्या होत्या. रहिवासी इमारतीत प्रत्येकाला ओळखपत्र देण्यात आले होते. याव्यतिरिक्त अन्य कुणालाही इमारतीत येण्यास मज्जाव करण्यात येत होता. चीन सरकारने आपल्या कर्मचार्‍यांसमवेत नागरिकांनाही वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये काम करण्याची जबाबदारी दिली. किराणा आणि जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थ ऑनलाईनने मागवले जात. दररोज सरकारकडून इमारतींच्या प्रवेशव्दारावर ऑनलाईनव्दारे नोंद केलेली सामुग्री ठेवली जात. तत्पूर्वी 20 जानेवारीपर्यंत चीनमधील सर्वच व्यवस्था कोलमडून पडल्या होत्या. त्यामुळे तीन दिवसांनंतर म्हणजे 23 जानेवारीला चीन सरकारने सर्व शहरांत लॉकडाऊन घोषित केले. या काळात अन्य शहरातील करोना नियंत्रणात आला. परिणामी 14 मार्चला वुहान व्यतिरिक्त अन्य शहरांना पूर्णत: खुले करण्यात आले. करोनाच्या विळख्यामुळे वुहान मात्र बंदिस्त होते. पण या विरुद्ध तेथील सुजाण जनतेने उठाव केला नाही की आततायीपणा. सरकारच्या प्रत्येक आदेशाला शिरसावंद्य मानून ते काटेकोरपणे पाळले गेले. सरकारचे प्रयत्न आणि त्याला नागरिकांची मिळालेली साथ या एकटजुटीमुळे करोनाच्या राक्षसाने वुहानमधून अखेर पराभव पत्करला.

आता, वुहानमध्ये येत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सरकारने बनवलेल्या अ‍ॅपवर आपण निरोगी असल्याबाबतचा ग्रीन कोड दाखवणे बंधनकारक आहे. वुहानमधील शासनकर्त्यांचे प्रथम लक्ष आता नोकरी आणि लोकांचे उत्पन्न वाढविणे याकडे आहे. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात आहे. जो सुदृढ आहे त्यालाच शहरात वावरण्याची परवानगी दिली जातेय. वुहानचे लॉकडाऊन पाहून भारतासह जगभरातील देशांनी विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचे मॉडेल स्विकारलेे. पण केवळ मॉडेल स्वीकारुन भारताला चालणार आहे का? प्रत्येकाला वुहानवासियांसारखी स्वयंशिस्तही पाळावी लागेल. भारतात विशेषत: महाराष्ट्रात अशा शिस्तीची नितांत गरज आहे. आज देशात सुमारे 5 हजार 194 इतकी रुग्णसंख्या आहे. त्यात एकट्या महाराष्ट्रात 1 हजार 135 इतकी आहे. म्हणजे तब्बल 22 टक्के रुग्ण आपल्या राज्यात आहे. त्यातही एकट्या मुंबईत 106 रुग्ण आहेत.

- Advertisement -

करोनामुळे मृत्यू आलेल्यांची राज्यातील संख्या 72 इतकी असून त्यात मुंबईतील 45 जणांना जीव गमवावा लागला आहे. म्हणजे राज्यातील एकूण मृत्यूंपैकी मुंबईतील मृत्यूंचे प्रमाण 63 टक्के इतके आहे. अशीच परिस्थिती वुहान शहराची होती. चीनमध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यूपैकी 80 टक्के मृत्यू हे एकट्या वुहानमध्ये झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे वुहान आणि मुंबईची लोकसंख्या आणि अर्थकारण जवळपास सारखेच आहे. त्यामुळे वुहानने ज्या पद्धतीने काळजी घेतली तशीच मुंबईमध्ये घेणे गरजेचे आहे. वुहानमधील वैद्यकीय सुविधा अतिशय प्रगत अशाच आहे. तरीही या शहराला करोनाशी इतक्या ताकदीने झगडावे लागले. तर अपुर्‍या सुविधा असलेल्या मुंबईची काय अवस्था होईल याचाही प्रत्येक पातळीवर विचार व्हावा. करोनाचा विषाणू उष्णतेत फार काळ टिकून राहत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे विषाणूचा बिमोड करण्यासाठी उन्हाळ्याचा काळ हा सर्वोत्तम मानायला हवा. मात्र हा काळ वाढला आणि पावसाळ्याला सुरुवात झाली तर मात्र परिस्थिती हाताबाहेरही जाऊ शकते. त्यामुळे आतापासूनच प्रत्येकाने काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.

करोनाचा रुग्ण आढळल्यानंतर महिन्याभराने चीनने लॉकडाऊन केले. भारतातही तसेच झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात पहिला रुग्ण केरळला आढळून आला. त्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. चीनच्या अन्य प्रांतात करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर वुहानमध्ये मात्र परिस्थिती सुधारलेली नव्हती. त्यामुळे या शहराचे लॉकडाऊन वाढवण्यात आले. भारतात यदाकदाचित 14 एप्रिलनंतर काही शहरांतील लॉकडाऊन शिथिल केले तरीही त्यातून मुंबई, पुण्याची सुटका होईल असे तरी दिसत नाही. वुहानचे मॉडेल अंगीकारल्यास मुंबई, पुणे आणि अन्य काही शहरांना लॉकडाऊन काढण्यासाठी जून महिनाही उजाडू शकतो. त्यामुळे नागरिकांना सहनशील राहण्यापलिकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. प्रत्येकाने घरात बसून राहण्याचे राष्ट्रीय कर्तव्य जरी निभावले तरीही करोनावर लवकरात लवकर मात करून लॉकडाऊनचा कालावधी कमी करता येऊ शकतो. यासाठी प्रथमत: प्रत्येकाने शासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. आज जवळपास सर्वच शहरांत थोड्या-फार सारख्याच फरकाने लोक अजूनही रस्त्यावर उतरत आहेत.

भाजीपाला, किराणा खरेदीसाठी गर्दी करताहेत. करोना रस्त्यांवर अक्षरश: वाट बघत बसल्याची माहिती प्रत्येकाला असूनही लोक स्वत:च्या जीवाशी खेळतायत. या सर्व गोष्टी टाळणे शक्य आहे. जीवनावश्यक वस्तू वितरित करण्याची जबाबदारी सरकारनेच स्वीकारल्यास लोक या बाबींसाठी बाहेर पडणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच खासगी क्षेत्रातील नर्स आणि तत्सम काम करणार्‍यांना मदतीचे आवाहन केले. त्याचप्रमाणे करोनाशी लढा देण्यासाठी इच्छुक असलेल्या स्वयंसेवकांचीही मदत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी सरकार घेऊ शकते. ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त जीवनावश्यक वस्तुंची मागणी नोंद झाल्यास रोजच्या-रोज इमारती आणि घरांपर्यंत या बाबी पुरवणे शक्य होईल. त्यासाठी शासनाला वायफाय सिटी वा अल्पदरात इंटरनेटची सुविधा तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करून द्यावी लागेल. वुहान शहरासमोर करोनाशी लढण्याचे कोणतेही मॉडेल नव्हते. तरीही त्यांनी तीन महिन्यात या आजाराचा बिमोड केला. आपल्यासमोर वुहानचे मॉडेल आहे. शिवाय केंद्र आणि राज्य शासनाचे सक्षम पाठबळ आहे. त्यामुळे घाबरुन न जाता नियोजनपूर्वक या संकटाशी सामना केल्यास त्यात विजय आपलाच होऊ शकतो हे निश्चित !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -