घरक्रीडाFlash Back 2020: खेळांचे ‘स्पोर्टींग स्पिरिट’ तपासणारे वर्ष!

Flash Back 2020: खेळांचे ‘स्पोर्टींग स्पिरिट’ तपासणारे वर्ष!

Subscribe

२०२० हे कोरोनाचे वर्ष म्हणून ओळखले जाईल. या महामारीचा परिणाम संपूर्ण जगावर झाला. त्याला खेळही अपवाद ठरले नाहीत. कोरोनामुळे खेळांचे वेळापत्रक विस्कटले. टोकियोत होणारी ऑलिम्पिक स्पर्धा असो किंवा विम्बल्डनसारखी मोठा इतिहास असणारी टेनिस स्पर्धा सर्वांनाच याचा फटका बसला. स्पोर्टिंग स्पिरीट हा पाया असलेल्या खेळामध्ये ‘हार न मानणे’ याला महत्त्व दिले जाते. कोरोनाच्या पाश्वर्र्भूमीवर मार्चपासून खेळांच्या जवळपास सर्वच स्पर्धा लांबणीवर पडल्या. परंतु, काही महिन्यांनी बहुतांश खेळांना सुरक्षितरित्या पुन्हा सुरुवात झाली. नवे विजेते मिळाले, अनेक विक्रम रचले गेले. याचाच घेतलेला हा आढावा…

वर्ष धोनीच्या निवृत्तीचे

‘झाले बहू, होतील बहू, पण या सम हा’…असे ज्याचे वर्णन करता येईल अशा भारताच्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्ट २०२० ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी हा भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक-फलंदाज आणि भारतीय क्रिकेटमधून सर्वात यशस्वी कर्णधार. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये एकदिवसीय असे दोन वर्ल्डकप, तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही जिंकली. आता धोनीची जागा घेऊ शकेल असा यष्टीरक्षक शोधणे, हे आगामी वर्षातील भारतीय संघासमोरील मोठे आव्हान आहे. धोनी २०१९ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या वर्ल्डकपनंतर भारतीय संघाच्या बाहेर होता. त्यामुळे तो निवृत्ती घेईल हे अपेक्षित होते. परंतु, २०२१-२२ मध्ये टी-२० वर्ल्डकप होणार असून रैना टी-२० क्रिकेटमध्ये नेहमीच चांगली कामगिरी करतो. त्यामुळे रैनाचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल असे काही क्रिकेट जाणकारांना वाटत होते. मात्र, त्याआधीच रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकले.

- Advertisement -

आयपीएल स्पर्धा दुबईत

आयपीएल ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय स्थानिक टी-२० स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द होण्याची शक्यता होती. परंतु, आयपीएल स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयचे मोठे आर्थिक नुकसान होणार हे निश्चित होते. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन भारताऐवजी युएईमध्ये केले. तसेच ही स्पर्धा मार्चच्या अखेरीस सुरू न होता, सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने उत्कृष्ट खेळ करत आयपीएलचे जेतेपद आपल्याकडे राखले. आयपीएल स्पर्धा जिंकण्याची मुंबई इंडियन्सची ही विक्रमी पाचवी वेळ होती.

टीम इंडियाकडून निराशा

भारतीय क्रिकेट संघ आणि कर्णधार विराट कोहलीला २०२० मध्ये फारसे यश मिळाले नाही. भारताने टी-२० क्रिकेटमध्ये ११ पैकी ९ सामने जिंकले. मात्र, भारताचा एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळ निराशाजनक ठरला. यावर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाने न्यूझीलंडचा दौरा केला. भारताने टी-२० मालिकेत न्यूझीलंडला ५-० असा व्हाईटवॉश दिला खरा, पण कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने त्यांना धूळ चारली. कोरोनामुळे मार्चपासून क्रिकेटचे सामने बंद झाले आणि त्यानंतर भारतीय संघ पुन्हा मैदानात दिसला थेट नोव्हेंबरमध्ये. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला आणि अ‍ॅडलेड येथे झालेल्या डे-नाईट कसोटीत भारताला नीचांकासह पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा कर्णधार विराट कोहली या वर्षात एकही शतक करू शकला नाही.

- Advertisement -

नदालची फेडररशी बरोबरी

स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदालसाठी २०२० हे वर्ष अविस्मरणीय ठरले. नदालने यंदा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेवर आपले वर्चस्व कायम राखत तब्बल १३ व्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या विजयासह त्याने रॉजर फेडररच्या २० ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी केली. फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात नदालने नोवाक जोकोविचला सरळ सेटमध्ये पराभूत केले. हा त्याचा फ्रेंच ओपन स्पर्धेतील १०० वा विजय ठरला. त्याने या स्पर्धेत १६ वर्षांत केवळ दोन सामने गमावले असून तब्बल १०० सामने जिंकले आहेत. तसेच ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकत कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले.

ऑलिम्पिक पहिल्यांदाच लांबणीवर

जागतिक खेळांमध्ये २०२० वर्षाला विशेष महत्त्व होते, कारण यावर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार होती. मात्र, कोरोनामुळे बर्‍याच स्पर्धा पुढे ढकलाव्या लागल्या आणि याला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही अपवाद ठरली नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला ही स्पर्धा पुढे ढकलणे भाग पडले. ऑलिम्पिक लांबणीवर पडल्याची ही या स्पर्धेच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरली. आता ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत रंगणार असली तरी या स्पर्धेला ‘टोकियो ऑलिम्पिक २०२०’ या नावाने संबोधले जाणार आहे.

चॅम्पियन्स लीगमध्ये बायर्नची बाजी

युएफा चॅम्पियन्स लीग ही व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वात मोठी स्पर्धा असून यंदा जर्मनीच्या बायर्न म्युनिक संघाने या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. चॅम्पियन्स लीग जिंकण्याची बायर्नची ही सहावी वेळ ठरली. चॅम्पियन्स लीग स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणार्‍या संघांमध्ये रियाल माद्रिद (१३) आणि एसी मिलानच्या (७) खालोखाल बायर्नचा क्रमांक लागतो. बायर्नच्या या यशात स्ट्रायकर रॉबर्ट लेव्हनडोस्कीने महत्वाची भूमिका बजावली. लेव्हनडोस्कीने मागील मोसमात चॅम्पियन्स लीगमध्ये १० सामन्यांत १५ आणि सर्व स्पर्धांमध्ये मिळून ४७ सामन्यांत ५५ गोल केले. त्यामुळे त्याने फिफाचा २०२० वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -