घरफिचर्सहोय, दुसरं जग असू शकतं !

होय, दुसरं जग असू शकतं !

Subscribe

‘कुणीही सत्तेत आलं तरी काय फरक पडतो, आपल्या ताटात कोण भाकर वाढणारंय का’ असं सहज सांगणारा सामान्य माणूस कुठल्या पक्षाशी आपली जवळीक आहे हे सांगणं टाळत ‘पोलिटिकली करेक्ट’ बोलत असतो; पण एका वेगळ्या पातळीवर त्याचं बोलणं एक महत्त्वाचं आध्यात्मिक सत्यही असतं. या सत्तेचा आणि माझा काय संबंध, हे बोलत तो भौतिक जगण्याशी आपली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न करतो.

सांप्रत टायमाला टीव्ही पाहणं, त्यातही न्यूज चॅनल्स पाहणं हे काही नाजूक हृदय असलेल्या माणसाचं काम राहिलेलं नाही. कधीही ब्रेकिंग न्यूजचा स्फोट होऊ शकतो आणि प्रेक्षक जखमीदेखील. अ‍ॅन्कर लोकही इतके कर्तृत्ववान आहेत की कुणी अंतराळवीराचे कपडे घालून चंद्रावर जातो तर एखादा श्रीदेवी जाताच बाथटबमध्ये बुडी घेतो. कुणी फेरीवाल्या विक्रेत्यासारखा कर्णकर्कश्श आवाजात ‘नेशन वान्टस टू नो’ म्हणतो तर कुठे पॅनल डिस्कशन सुरू असताना स्क्रीनवर जाळ लागलेला असतो. असा हा ‘जाळ अन धूर संगट’ असताना प्रेक्षक कुठल्या अग्नीशमन दलाला बोलावणार! पण परवा निवडणुकीचा निकाल असल्याने टीव्हीसमोर बसण्याचा कठीण प्रसंग निर्माण झाला. हेल्मेट, कापसाचे बोळे आणि पाण्याचा ग्लास असं सारं जवळच होतं; पण तरीही हिंमत नव्हती. अखेरीस हिय्या करून टीव्ही लावला आणि काही वेळ टीव्ही पाहिला हे कबूल केलंच पाहिजे. देशाच्या बॉर्डरवर उभं राहून जणू युद्धात सहभागी असल्याप्रमाणे एकेक ‘अ‍ॅन्कर ब्रेकिंग न्यूज’ सांगत होता.

एक मोठी घंटा वाजायची (त्याने काय घंटा फरक पडतो म्हणा) आणि मग ‘ब्रेकिंग न्यूज’ आदळायची. कमळ फुललं, सुकलं, बाण घुसला, रुतला, घड्याळाची टिकटिक वाढली वगैरे सुरू झालं. शेजारी असलेला मित्र म्हणाला, ‘कवट्या महाकाळच्या आवाजात ‘मी पुन्हा येईन’ म्हणणार्‍याला जनता म्हणाली, मी बघून घेईन.’ दुसरा म्हणाला, ‘पण शेवटी आम्हालाच बहुमत. अर्थात सेना खिंडीत गाठणार’ असली चर्चा सुरू असताना बारामतीहून शंतनूचा फोन आला, ‘सायबांना मानलं राव. ५० जागा क्रॉस केल्या.’ ऐन ‘शरद’ ऋतूतल्या चांदण्याऐवजी पावसाने कमाल केली वगैरे मस्त सुरू होतं. एखादं भावगीत शांत संथ लयीत सुरू असावं त्याप्रमाणे काँग्रेसच्या गाडीने ४० चा टप्पा पार केला. ‘४० ने काय होणार?’ देवेंद्रांचा भक्त बोलला. इंजिनीयर असलेला मित्र म्हणाला, ‘तू काही बोलू नको. ४० चं महत्त्व मलाच माहितीय!’

- Advertisement -

कोण कुठं पडलं, कितीचं मार्जिन होतं, कुणी किती पैसे वाटले अशा सार्‍या चर्चा सुरू होत्या. आखाड्यातले ज्येष्ठ पैलवान देवेंद्र सोडले तर बाकी तसे आनंदी होते. भाजपला नम्रता, सेनेला वाटाघाटीची शक्ती, काँग्रेस राष्ट्रवादीला प्रोत्साहन देणारा असा हा निकाल पाहून बर्‍याच उलटसुलट गप्पा सुरू होत्या. एक जण उत्साहाने म्हणाला, ‘पवारसायेब डेंजर माणूसय. ‘मातोश्री’च्या अंगणात ‘गोविंदबाग’ येणार आणि सत्ता त्यांच्या ‘पंज्या’त खेळवणार.’ नवीन राजकीय समीकरण आकाराला येईल आणि मग कोणतं मंत्रीपद कुणाला, अशा अटकळी बांधल्या जात होत्या.

शह-काटशह, बुद्धिबळातल्या डावाप्रमाणे चेकमेट करण्याच्या खेळ्या, उभे-आडवे फासे असं सारं होत असताना या सार्‍याचा उद्देश नक्की काय आहे, असा प्रश्न मला पडू लागला. सिकंदराची गोष्ट आठवली. तो एकदा एका साधूकडे गेला, साधूने विचारलं, पुढे काय करणार आहेस? सिकंदर म्हणाला, ‘अमुक प्रदेश मी जिंकलो. आता ‘अ’ आणि ‘ब’ प्रदेश जिंकेन.’ बरं मग त्यानंतर? सिकंदर म्हणाला, ‘क’ आणि ‘ड’ प्रदेश जिंकणार’ सिकंदर असे एकेक प्रदेश सांगत राहिला. सत्तेची बाराखडी बोलून झाली. साधू म्हणाला, ‘ पुढे काय?’ शेवटी सिकंदर म्हणाला, ‘मग काय आरामच आराम. निवांत आराम करीन मी.’ साधू म्हणाला, ‘मग मी आता काय करतोय?’ सिकंदर कोड्यात पडला.

- Advertisement -

मुद्दा असा की, बेलगाम, निरंकुश सत्ता मिळवून करणार काय? सत्तेबाबतच्या आत्यंतिक महत्त्वाकांक्षेसोबत विवेक नसतो तेव्हा ती सारी सत्ता अर्थहीन होऊन जाते. सिकंदर आणि साधूची ही गोष्ट ऐकताना मला नेहमी ‘प्यासा’ सिनेमातलं ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है’ असा प्रश्न विचारणारं गाणं आठवतं. साध्य आणि साधन सत्ताच आणि जणू ‘सत्ता हाच मोक्ष!’ अशा अवस्थेला सारं येणार असेल तर काय करायचं? ढसाळांच्या ‘या सत्तेत जीव रमत नाही’ कवितेचं अभिवाचन करायचं की ‘ये मेहफील मेरे काम की नहीं’ हे गाणं गायचं?

‘कुणीही सत्तेत आलं तरी काय फरक पडतो, आपल्या ताटात कोण भाकर वाढणारंय का’ असं सहज सांगणारा सामान्य माणूस कुठल्या पक्षाशी आपली जवळीक आहे हे सांगणं टाळत ‘पोलिटिकली करेक्ट’ बोलत असतो; पण एका वेगळ्या पातळीवर त्याचं बोलणं एक महत्त्वाचं आध्यात्मिक सत्यही असतं. या सत्तेचा आणि माझा काय संबंध, हे बोलत तो भौतिक जगण्याशी आपली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न करतो. सारंच नश्वर आहे तर इस लफडे में कायकू फसनेका, असा त्याचा अ‍ॅटिट्युड असतो. तो सत्तेचा थेट भाग नसतो. तो सत्तेला वाकुल्या दाखवू शकत नाही. सत्तेच्या राजकारणापासून पळ काढून तो स्वतःचा बचाव करतो. ‘नोटा’ ला मत देण्याइतपत तो मध्यमवर्गीय नसतो आणि निव्वळ नोटा घेऊन मतदान करण्याइतपत तो वेडाही नसतो. सत्तेच्या सारीपाटात आपली स्पेस शोधण्यात तो वेडापिसा होतो. कारण आपल्या मनातलं राजकारण आकाराला आलेलं नसतं. येत नाही, हेही दिसत असतं. अगतिकता राजीखुशी स्वीकारण्याचं तंत्र तो अवगत करत असतो.

याचा अर्थ रणांगणावरचं ‘बसर्डिस्तान’ पाहून गलितगात्र व्हावं, असं नाही. योगेंद्र यादवांसारखा वेडा माणूस ‘शुभ को सच में बदलने का नाम है राजनीती’ असं म्हणतो आणि ग्राऊंडवर सपशेल फसतो, चुका करतो तरीही अशा वेडेपणावरचा विश्वास टिकला पाहिजे, टिकवला पाहिजे. साने गुरुजींचा ‘नवा प्रयोग’ आकाराला येऊ शकतो, ही आसही असली पाहिजे. शतखंडित होत चाललेल्या भवतालात, ‘डिस्टोपियन’ स्वप्नं पडण्याच्या काळातही उर्ध्वपातित पाण्यासारखा निर्लेप ‘युटोपिया’ उरी बाळगला पाहिजे. आपल्या स्वतःलाच आपण परग्रहवासी वाटू शकतो; पर क्या करे?

आपल्यापाशी हेच जग आहे. दुसरं जग कुठून आणणार? आहे या जगासोबत डील करता आलं पाहिजे बॉस. ‘इक ऐसे गगन के तले’ आपली भेट होऊ शकते आणि दुःख, आनंदाला ओलांडून आपली सुंदर वाट सापडू शकते. मार्क्स म्हणाला तसं, होय, दुसरं जग असू शकतं!

– श्रीरंजन आवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -