घरक्रीडाआप कतार में है !

आप कतार में है !

Subscribe

रविवार २१ एप्रिलपासून २३व्या आशियाई स्पर्धा शर्यतींना सुरुवात होणार आहे. २४ एप्रिलपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत एकूण ६३ संघ सहभाग घेणार असून यामध्ये ओशियानिया परिसरातील देशांचाही समावेश आहे. धावपटू हिमा दास, जिन्सन जॉन्सन, स्वप्ना बर्मन यासारखे खेळाडू या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भारताने भूवनेश्वर येथे २०१७ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धा शर्यतींत २९ पदके मिळवली होती आणि आता भारतीय खेळाडूंना यापेक्षाही चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. ही स्पर्धा कतारची राजधानी दोहा येथे होणार आहे.

नुसतं पराक्रमी असून चालत नाही; तर आपण पराक्रमी आहोत याचं भान असावं लागतं, असं म्हणतात. कतार या देशाच्या बाबतीत बोलायचं तर हा देश श्रीमंत आहे, इतर देशांवर दबाव आणण्याइतका पराक्रमीदेखील आहे. आपण श्रीमंत आणि पराक्रमी आहोत याचं भानदेखील या देशाला आहे. २३व्या आशियाई स्पर्धा शर्यतींचं आयोजन प्रचंड झगमगाटात करण्याचा पण करून, वर्षभर अगोदरच नियोजनबद्ध पद्धतीने काम करणार्‍या कतारच्या अ‍ॅथलेटिक्स विश्वातील पदाधिकार्‍यांनी, स्पर्धाशर्यतीदरम्यान, ट्रॅकवरील तापमान २०-२५ अंश सें.ग्रे. राहील हे प्रामुख्याने पाहिलं. खलिफा स्टेडियमचं नूतनीकरण करताना नवा कोरा गुलाबी ट्रॅक बसवला.

- Advertisement -

१९७१ मधे ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर कतारने अ‍ॅथलेटिक्स विश्वात अनेक चांगल्या गोष्टी केल्या. ‘अस्पायर’ सारखी संस्था निर्माण केली. त्या संस्थेत विश्वासू आणि व्यावसायिक लोकांनी चांगलं काम करणं, चांगले अ‍ॅथलिट सातत्याने घडवणं आणि त्यांना जागतिक स्पर्धाशर्यतीत उतरण्याचा अनुभव देऊन, जागतिक कीर्तीचे अ‍ॅथलिट निर्माण करणं अशा फार मोलाच्या गोष्टी त्यांनी अल्पावधीत केल्या. या अथक परिश्रमाचा परिणाम लगेच दिसू लागला. तलाल मन्सूरनंतर फेमी ओगुनोडे त्यांना १०० मीटरमध्ये मिळाला.

अहमद बेदिर (भालाफेक), मोहोमत हमदी आणि रशीद अहमद (तिहेरी उडी) यांच्याशिवाय मुताझ बार्शीम याच्यासारखा जागतिक दर्जाचा उंचउडीपटू मिळाला. आशियाई विक्रमांची गोष्ट केली तरी लक्षात येतं की कतारी अ‍ॅथलिटनी तब्बल ८ आशियाई विक्रम आपल्या नावावर केले आहेत. याशिवाय सैफ सईद शाहीनच्या नावावर अजूनही असलेला ३००० स्टीपलचेसमधला विस्वविक्रम हा तर कतारी अ‍ॅथलेटिक्स विश्वातील मानाचा तुराच!

- Advertisement -

सुरुवातीच्या काळात अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा शर्यतींमधे महिलांना उतरू न देणार्‍या कतारने आजच्या घडीला चीन, जपान आणि भारत यांच्यापाठोपाठ एकूण १३७ पदकांसह पदकतालिकेत चौथा क्रमांक मिळवून आपला वेगळाच दबदबा तयार केला आहे. आज चिनी-जपानी-कतारी अ‍ॅथलिट पूर्ण जोमानिशी उतरू पाहत आहेत आणि नेमक्या याचवेळी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ओशियानिया परिसरातले १२ देश या स्पर्धाशर्यतींत सहभागी होत आहेत. हा योगायोग नक्की नाही.

ही ताकद आहे सर्वांना खेचून आणण्याची! जगाला आपली अ‍ॅथलेटिक्स विश्वातील ताकद दाखवण्याची संधी कतारला यावर्षी दोनदा मिळणार आहे. एक आता आणि दुसरी संधी यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणार्‍या जागतिक स्पर्धा शर्यतींत! त्यामुळे अनायासे हाती आलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय कतारी अ‍ॅथलिट राहणार नाहीत हे नक्की!

– उदय ठाकूरदेसाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -