घरफिचर्सआपण, सोशल मीडिया आणि वाचन!

आपण, सोशल मीडिया आणि वाचन!

Subscribe

आज समाज माध्यमांनी आपलं जीवन इतकं व्यापून टाकलंय की आपल्या जीवनातील कोणतीही गोष्ट व्यक्तिगत राहिलेली नाही. ‘हमाम में सब नंगे’, म्हणण्याऐवजी ‘सोशल मीडियापर सब नंगे’, म्हणण्याची वेळ आली आहे. कित्येकांनी आयुष्यभर घेऊन ठेवलेल्या भूमिकांनी त्यांना एका इझमच्या आदर्श मनोर्‍यात बसवलं होतं, हा मनोरा सोशल मीडियाने खिळखिळा करून टाकलाय. अनेकांचे बुरखेही फाडायला सुरुवात केलीय. काहींचे फाटलेतदेखील.

सुटीच्या दिवशी वा घरी असताना कधी कुणाचा फोन आला की विचारतात. काय चाललंय?
मी- काही नाही. वाचत बसलोय.
यावर समोरची व्यक्ती – बरंय बुवा तुमचं.
का? काय झालं?
नाही. आपलं तुम्ही वाचायला रिकामे असता. तुम्ही राजे आहात. आमच्याकडं बघा. आमच्या मागची कामं संपत नाहीत.

फोन ठेवला आणि मी विचार करू लागलो. की, वाचन करणं म्हणजे आपल्याला काही काम नाही का? आणि वाचन करणं हे काम नाही का? की वाचन हे रिकामटेकड्या माणसांचा उद्योग आहे की आपण वाचन संस्कृतीकडे गाभीर्याने पाहात नाहीत? असे एक ना अनेक प्रश्न सतत माझ्या मनात डोकावतात. पण एक मात्र नक्की की वाचणारा माणूस हा राजा असतो.

- Advertisement -

खरं तर, पूर्वापार काळापासून गावागावातून चालणारी ग्रंथांची सामुदायिक पारायणं ही रिकामटेकडा उद्योग होता का? …. तर नाही. तो आम्हा खेडूतांच्या जगण्याची उमेद होता, प्रेरणा होता. या सामुदायिक पारायण सोहळ्यांमधून सहभागी असलेल्या लहानांवर वाचनाचे संस्कार व्हायचे. भलेही ते सर्व केवळ वाचलं जात असेल, त्याचं आकलन होत नसेल. मात्र यातून प्रकट वाचनाचे आणि उच्चारणाचे संस्कार व्हायचे. माणसाच्या जीवनात असलेल्या संस्कार केंद्रांपैकी वाचन हे महत्त्वाचं संस्कार केंद्र. पहिलं संस्कारांचं केंद्र आई, दुसरे शिक्षक आणि तिसरे केंद्र म्हणजे ग्रंथ. पण ग्रंथांच्या माध्यमातून होणार्‍या संस्काराला अर्थात वाचन संस्काराला आपण ऐच्छिक ठेवलंय. कारण आपल्याकडे लेखनाला कष्टसाध्य मानलं जातं, पण वाचन हा आपला छंद असतो.

ते मनोरंजनाचं साधन मानलं जातं. मला वाटतं, आपला हा वाचनाचा रंजन सिद्धांत अत्यंत चुकीचा आहे. कारण आपण वेळ घालवण्यासाठी म्हणजेच Time Pass करण्यासाठी वाचन करतो. याप्रमाणेच बागेत फेरफटका मारतो. तेव्हा आपल्याला आनंद मिळतो. याच प्रकारचा आनंद आपल्याला वाचन करताना मिळतो. त्यापलीकडे जाऊन आपल्याला ज्ञान मिळतं. हे ज्ञानाचं महत्त्व संतांनी जाणलेलं होतं. तथागतांनी जाणलेलं होतं. शिवाय म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा ज्ञानाचं महत्त्व लक्षात आलेलं होतं. तेव्हा केवळ आपल्याकडे पुस्तकं हा एक पर्याय होता, पण काळ बदलला.

- Advertisement -

कागदावर छापल्या जाणार्‍या पुस्तकांची जागा इ-बुकनं घेतली. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आणि माध्यमांनी आपल्याला सातत्याने चुंबकाप्रमाणे आकर्षित केलं. तंत्रज्ञानाला माणसाने कवेत घेण्याऐवजी तंत्रज्ञानानेच माणसाला कवेत घेतलं. जागतिकीकरणाने सर्वच गोष्टींचं सपाटीकरण केलं. माणसाच्या जगण्याचे मानदंड बदलले. परिणामत: कला, कलामाध्यमं आणि कलाभिरुची यामध्ये आमूलाग्र बदल झाला. कोणे एके काळी बोरुने भुर्जपत्रावर-कागदावर लिहिलं जायचं. त्याची जागा आता की-बोर्ड व स्क्रीनने घेतलीय. मनातल्या भावना, कल्पना, विचार कागदावर उतरण्यापूर्वी मनात रुंजी घालायचे आणि उत्कटतेने कागदावर उतरायचे. हल्ली कविता, कथा वा लेखाचा जन्मच डोक्यात कमी आणि फेसबुकवर अधिक होतो. पूर्वी आपल्याला रामदासांनी ‘दिसामाजी काहीतरी लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।’ असं सांगितलं होतं.

त्यांच्या या वचनाला आम्ही उलट केलं. ‘दिसामाजी अखंडित लिहावे। प्रसंगी कधी कधी वाचीत जावे।’चा विडा आम्ही उचलला. दिसामाजी अखंडित लिहावे। नेहमी ऑनलाईन राहावे। आणि। सोशल मीडियावर पोस्टावे हे आजचं बिरूद झालंय. मग सतत लाईक आणि कमेंटला वश झालेल्या आपणास अविरत पोस्टवण्यासाठी (पोस्ट करण्यासाठी) अखंड सृजन झालं पाहिजे. ते तसं होत नाही. यासाठी आजच्या तंत्रज्ञानानं आम्हाला ‘कॉपी-पेस्ट’चं सूत्र दिलं. कारण सतत प्रसवण्यासाठी आम्ही वाचत नाही. मग ही माध्यमंदेखील आपल्याला वाचवत नाहीत. अगदी आत्महत्या करायची तर ती लाईव्ह. यामुळे आपल्या जगण्यातला लाइव्हनेस कमी झालाय. वास्तवातल्या मित्रांपेक्षा सोशल मीडियावरच्या मित्रांची संख्या हजारात गेलीय, पण हाकेला धावून येणारे किती? हा प्रश्न पडतो.

आज समाज माध्यमांनी आपलं जीवन इतकं व्यापून टाकलंय की आपल्या जीवनातील कोणतीही गोष्ट व्यक्तिगत राहिलेली नाही. हमाम में सब नंगे, म्हणण्याऐवजी सोशल मीडियापर सब नंगे, म्हणण्याची वेळ आली आहे. कित्येकांनी आयुष्यभर घेऊन ठेवलेल्या भूमिकांनी त्यांना एका इझमच्या आदर्श मनोर्‍यात बसवलं होतं, हा मनोरा सोशल मीडियाने खिळखिळा करून टाकलाय. अनेकांचे बुरखेही फाडायला सुरुवात केलीय. काहींचे फाटलेतदेखील. एकीकडे प्रचंड मोठ्याप्रमाणात कॉपी-पेस्टचं कल्चर उदयाला आलं असलं, तरी याच समाज माध्यमांवर प्रचंड मोठ्याप्रमाणात मजकूर प्रसवला जातो. माध्यमांवरील निर्मितीचा वेग हा जीवनातील आकलन वेगापेक्षा अधिक आहे.

आजच्या समाज माध्यमांनी ‘बामनाघरी लिव्हणं, कुणब्याघरी दाणं आन् महाराघरी गाणं’ या प्रकारच्या परंपरांना, संकेतांना उभा आणि आडवा छेद देऊन व्यवस्थेला फाट्यावर मारलंय. सोशल मीडियावर असलेल्या युवापिढीच्या मनात परंपरा व प्रस्थापितांविषयी प्रखर आक्रोश आहे. तो उद्वेग सातत्याने व्यक्त होतो. आपण लिहिलेली कविता वा कथा ही कुठल्या तरी दर्जेदार म्हणवल्या जाणार्‍या संस्थानिक नियतकालिकात छापण्यापेक्षा फेसबुकवरच्या वाचकांच्या हवाली केली जाते. तद्वतच अभिनय, गाणं, संगीत, पेंटिग्ज, फोटोग्राफी, मृदकला, मूर्तीकलांच्या प्रदर्शनाची ‘आर्ट गॅलरी’ म्हणून ही माध्यमं उभी राहिली आहेत. नवकलावंतांना ब्लॉग, युट्युब, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम या माध्यमांनी मोठा स्पॅन उपलब्ध करून दिलाय.

संगीतातला प्रणव बडवे, श्रीराम पोतदार, गीतलेखनातला विनायक पवार, गणेश घुले वा वैभव देशमुख, पेंटिग्जमधले विजय गवळी, प्रतिभा घारे, सुनील अभिमान अवचार, मूर्तिकला वा शिल्पकलेतल्या प्रतिभा घारे-शिंदे यांना beyond the real life canvas या सोशल मीडियाने उपलब्ध करून दिलाय. आपल्या जगण्याचे मानदंड जसे या माध्यमांनी बदलून टाकलेत तसाच अभिरुचीमध्येदेखील बदल झालाय. पण ही माध्यमं चुकीच्या पद्धतीने वापरली जात असल्याचं निरीक्षण ‘अक्षरनामा’चे राम जगताप नोंदवतात. फेसबुकद्वारे चुकीची, दिशाभूल करणारी, चारित्र्यहनन वा बदनामी करणारी माहिती पसरवली जाते.

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर अफवांसाठी, ट्विटरचा वापर ट्रोलिंगसाठी तर इन्टाग्रामचा वापर चित्रपटातील नटनट्यांची छायाचित्रं पाहण्यासाठी केला जातो. सनसनाटीच्या आहारी जाऊन फेमस होण्यासाठी ही माध्यमं वापरली जाताहेत. हे सर्व अविश्वसनीय आणि आभासी आहे. अगदी टीव्हीतल्या न्यूज चॅनेलवर दाखवली जाणारी खरमरीत बातमी पाहिल्याबरोबर आपण त्यावर विश्वास ठेवतोच असे नाही, तर अशी बातमी आली की इतर चॅनेल काय दाखवतात ते आपण पाहतो. पण एखाद्या स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या बातमीवर १०० टक्के विश्वास ठेवला जातो. आज बहुसंख्य लोकांकडे स्मार्टफोन आहेत. त्यावर ऑनलाईन पेपर वाचता येतो यामुळे किती वाचकांनी आपल्या घरात येणारे वृत्तपत्र बंद केलेय, असा प्रश्न समाजाला केल्यास याचे उत्तर नाही किंवा नगण्य असेच मिळते.

याचाच अर्थ माध्यमे बदलली. २४x७ ऑनलाईन राहण्याला महत्त्व असलं तरी ऑफलाईन स्रोत हद्दपार झालेले नाहीत, होणारही नाहीत. माध्यमं कितीही बदलली, अभिरुचीमध्ये काळानुरूप बदल झाला असला तरी सुप्रसिद्ध इटालीयन कादंबरीकार उम्बर्तो इको म्हणतो त्याप्रमाणे, पुस्तकाचा शोध चाकाच्या शोधाइतकाच मानवजातीच्या इतिहासात महत्त्वाचा व मूलभूत आहे. अशा शोधात पुढे बदलत्या काळानुसार फेरफार होत राहतात. पुस्तकाचं स्वरूप बदलेल, कागदावर छापलेलं पुस्तक जाऊन त्याजागी ई-पुस्तक येईल पण त्यातली वाचन ही गोष्ट कायम राहील.

-कैलास अंभुरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -