नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: फराळी पॅटिस

नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: फराळी पॅटिस

नवरात्र उपवास स्पेशलमध्ये आज आपण फराळी पॅटिस रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य –

 • चार उकडलेले बटाटे
 • पाव किलो पनीर
 • आल्याची पेस्ट
 • तीन ते चार हिरव्या मिरच्या
 • अर्धी वाटी कोथिंबीर
 • लिंबाचा रस
 • मीठ
 • बदाम
 • मनुका
 • शेंगदाण्याचा कुट
 • तेल
 • राजगिऱ्याचं पीठ

कृती – 

पहिल्यांदा चार उकडलेले बटाट्यांचा मध्यम काप करायचे. त्यामध्ये पाव किलो पनीर घालून ते व्यवस्थित बारीक मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर या व्यवस्थित मिक्स झालेल्या मिश्रणात आल्याची पेस्ट घालायची. मग त्यामध्ये बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. त्यानंतर कोथिंबीर अर्धी वाटी घालायची. मग त्यात एक लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालायचं. हे सर्व मिश्रण व्यवस्थितीत मळून घ्यायचं. त्यानंतर पॅटिस करायला घ्यायचं. चपातीसाठी तयार करत असलेल्या गोळ्याप्रमाणे मिश्रणाचा गोळा घ्यायचा. त्यामध्ये भिजवून आणि बारीक काप केलेले बदाम, मनुका आणि थोडासा शेंगदाण्याचा कुट घालून त्याचा पुन्हा नीट गोळा तयार करायचा. अशा प्रकारे उरलेल्या मिश्रणाचे फराळी पॅटिस तयार करायचं. मग सर्व पॅटिस तयार झाल्यानंतर गरम तव्यावर तेल ओतायचे. मग सर्व पॅटिस राजगिऱ्याच्या पिठात व्यवस्थित कोट करून ते तेलायचं. अशा प्रकारे तुम्ही उपवासासाठी खास फराळी पॅटीस करू शकता.