IPL 2020 : आयपीएल सामन्यावर सट्टा लावताना माजी क्रिकेटपटूला अटक

IPL 2020 Former cricketer arrested for betting in IPL

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूएईमध्ये आयपीएलचा तेरावा मोसम पार पडत आहे. १० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. यंदाच्या मोसमात सट्टाबाजार जोरात सुरु आहे. यात धक्कादायक बातमी म्हणजे सट्टाबाजारात माजी क्रिकेटपटूचे नाव समोर आले आहे. मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला वर्सोवा पोलिसांनी आयपीएलमध्ये सट्टा लावताना पकडले आहे. याप्रकरणी क्रिकेटपटूला अटकही करण्यात आली आहे.

मुंबईचा माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस याला पोलिसांनी आयपीएलमध्ये सट्टा लावताना पोलिसांनी पकडले आहे. वर्सोव्यात आयपीएल सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मॉरिसच्या घरातून फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. मॉरिसला न्यायालयात हजर करण्याआधी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, मॉरिसने १९९५ ते २००७ या कालावधीमध्ये ४४ प्रथम श्रेणी आणि ५१ लिस्ट ए मॅच खेळल्या आहेत.

मॉरिसवर याआधीही सट्टाबाजाराचे आरोप झाले आहेत. अल जजिराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्येही रॉबिन मॉरिसवर सट्टा बाजाराचे आरोप करण्यात आले होते. रॉबिन मॉरिससोबत पाकिस्तानचा माजी बॅट्समन हसन रजादेखील स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडला होता. या स्टिंग ऑपरेशनमध्ये दोघेही टी-२० स्पर्धांमध्ये स्पॉट फिक्सिंग करण्याबाबत बोलत होते. यानंतर मॉरिसने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते, तसेच चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आपण गेल्याचे स्पष्टीकरण दिले होते.