Sunday, January 24, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आहार भान - आवळा नवमी

आहार भान – आवळा नवमी

Related Story

- Advertisement -

कार्तिक शुध्द नवमी आवळा नवमी, कुष्मांड नवमी, अक्षय नवमी अशा अनेक नावांनी ओळखली जाते. या दिवशी जे काही पूजाअर्चा, दानधर्म, जपतप करू त्याचे पुण्य अक्षय लाभते अशी श्रध्दा आहेकुष्मंड म्हणजे कोहळा. या दिवशी श्रीकृष्णाने कुष्मांड दैत्याचा वध केला. म्हणून कुष्मांड नवमी. कोहळा हे ही आरोग्यदायी फळ. कोहळ्यात सोनेरुपे घालून दान करायची पद्धत कुठे कुठे आहे.

ब्रह्मदेव जेव्हा ईश प्राप्तीसाठी तप करत होते तेव्हा ईश प्रीतीने त्यांचे मन उचंबळून आले आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यापासून आवळा बनला.

- Advertisement -

आवळा नवामीची कथाही खूप रंजक आहे. एकदा लक्ष्मीला शिव आणि विष्णूची एकत्रित पूजा करून त्यांना भोजन देण्याची इच्छा झाली. तेव्हा तिने आवळ्याच्या झाडाखाली हरिहराची पूजा करून त्यांना भोजन दिले. तेव्हा श्री विष्णूंनी कार्तिक नवमी पासून पौर्णिमा पर्यंत आवळ्याच्या झाडाखाली निवास करण्याचे वचन दिले. तेव्हा पासून आवळ्याच्या झाडाखाली जे व्रत , पूजन, भोजन, दानधर्म करतील त्यांना आरोग्य, ऎश्वर्य, सुख, समाधान प्राप्त होईल असा वर आहे. याच काळात विठोबाचे नवरात्र सुरू होते. शैव, वैष्णव, श्रीकृष्ण, देवी, विठ्ठल अशा सगळ्या उपासना मार्गांना एकत्र घेतले आहे या सोहळ्यात. वन भोजन, समूह भोजन, आरोग्यदायी भोजन असे अनेक लाभ या आवळी भोजनात आहेत. शरीर, मन, व्यक्ती, समाज सगळ्यांना सामावून घेणारे हे व्रत आहे. खेड्या पाड्यात अजूनही हे व्रत निष्ठेने पाळले जाते.

आयुर्वेदात आवळ्याचे खूप गुण वर्णन आहे. त्वचेचा वर्ण उजवळणारा, केसांच्या वाढीसाठी उपयुक्त, केस काळे ठेवणारा, पचन संस्थेला बळ देणारा, पचन सुधारणारा आणि आताच्या काळात महत्त्वाचे म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारा बहुगुणी आवळा. व्रताच्या निमित्ताने त्याचे महत्त्व लोकांच्या मनात अधोरेखित केले जाते. पुढे वर्षभर आपण आवळ्याच्या झाडांची लागवड, संवर्धन याकडे लक्ष द्यायला हवे. त्यामुळे आज आपण बनवूया मोरावळा अर्थात आवळ्याचा मुरंबा पाहणार आहोत. दिवाळीपासून रसदार पक्व आवळे बाजारात येतात. मी इथे अर्ध्या किलोचे प्रमाण देत आहे.  २-४ वेळा अर्धा-अर्धा किलो असा बनवला तर वर्षभर मोरावळा पुरतो. रोज एक चमचा तरी खावा.

- Advertisement -

लोणची, मुरंबा करणे हे कौशल्याचे काम आहे. पूर्ण लक्ष देऊन, मनापासून केले तर लगेच हात बसतो आणि या गोष्टी करणे फार आनंददायी होते.

साहित्य

आवळे  – अर्धा किलो

साखर – अर्धा किलो

वेलची पूड – ३ चमचे

लवंग – ४ ते ५

दालचिनी – २ काड्या

कृती –

१. आवळे २ ते ३ वेळा पाण्याने चांगले धुवून घ्या. डाग असतील तर कापून टाका.

२. कुकर मध्ये ३-४ शिट्ट्या घेवून आवळे शिजवून घ्या. पाणी घालायची गरज नाही.

३. आवळे शिजल्यावर भांड्यात जे पाणी जमा होते त्यात गूळ, मीठ घालून सरबत बनवता येतो.

४. आवळे शिजल्यावर त्याचे लहान लहान तुकडे करा.

५. एका पसरट, जाड बुडाच्या कढईत अर्धा किलो साखर घ्या. पाणी न घालता मंद आचेवर जरा गरम करा.

६. त्यात आवळ्याचे तुकडे घाला. साखर आणि आवळा चांगा मिक्स करून घ्या.

७. मध्यम आचेवर हे मिश्रण ढवळत रहा.

८. साखर जशी विरघळते तशी मिश्रणावर फेस यायला लागतो. तो फेस हलकेच काढून टाका.

९. १५ – २० मिनिटांनी फेस यायचा थांबतो, मिश्रण दाटसर होते आणि आवळ्याच्या फोडी पारदर्शक दिसायला लागतात. म्हणजे तुमचा मोरावळा तयार झाला. सोनेरी रंग यायला हवा. आता यात ३ चमचे वेलची पूड घालावी.

१०. कधी कधी आजारपणात लवंग, दालचिनीचा जरासही तिखट पणा चालत नाही. असे असेल तर लवंग, दालचिनी मोरवल्यात घालू नका. जर चालत असेल तर जरूर घाला. सुंदर चव आणि सुगंध येतो.

११. यात पाळायचे पथ्य म्हणजे, मिश्रण चांगले ढवळत राहायचे. मध्यम आचेवर ठेवायचे. नाहीतर पाक काळा पडतो आणि आवळ्याच्या फोडी शिजत नाहीत.

११. थंड होईपर्यंत अधून मधून ढवळत राहायचे.

१२. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून स्वच्छ, सूर्य प्रकाश लागणार नाही अशा जागी ठेवावे.

१३. १५ दिवसांनी खायला घ्यावे. स्वच्छ, कोरडा चमचा वापरावा.

१४. भरपूर मोरावळा तयार करून वर्षभराची बेगमी करून ठेवा. आरोग्याची जपणूक अशा छोट्या छोट्या गोष्टींनी करायची.

डॉ. ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]

- Advertisement -