घरताज्या घडामोडीआहार भान - हळद, आले आणि आवळ्याचे मिक्स लोणचे

आहार भान – हळद, आले आणि आवळ्याचे मिक्स लोणचे

Subscribe

आरोग्य जपणे तसे म्हटले तर खूप सोप्पे आहे. छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या की झाले. आता छान थंडी पडू लागली आहे. बाजारात तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या यायला लागल्या आहेत. भूक पण सणसणीत लागते आणि खाल्लेलं अंगी लागते, हा छान तब्येत कमवायला उत्तम काळ आहे. या ३-४ महिन्यात पौष्टिक खाऊन शरीराची झीज भरून काढायची आणि पुढच्या वर्षीसाठी बेगमी करायची. 

बाजारात येणाऱ्या ओली हळद, आले आणि आवळ्याचे लोणचे म्हणजे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची जादूची कांडी. हळद आपल्या जेवणातील रोजचा घटक आहे. हळदीमुळे रोगप्रतिकरकशक्ती वाढते. तसेच जंतुनाशक आहे. घसा खवखवतो हळदीच्या पाण्याने गुळण्या करा. जखम झाली त्यावर हळद चेपा. सर्दी कफ झाला हळदीचे दूध प्या. हळदी मधील कुरक्युमिन हा घटक तर कॅन्सर पेशींची वाढ नियंत्रित करतो असे संशोधनाने सिध्द झाले आहे. शरीरात जर आतून कुठे सूज, दाह असेल त्यावरही हळद उपयोगी आहे.

- Advertisement -

आले पचन विकारांवर, श्वास विकारांवर गुणकारी आहे. औषधांमुळे होणाऱ्या मळमळणे, उलट्या, अतिसार इ. त्रासांवर परिणामकारक आहे. पोटात गॅस होणे, अपचन, भूक न लागणे यावर आले-लिंबू सैंधव यांनी लगेच आराम पडतो. खोकला, सर्दी, दमा यावर ही आले उपयोगी आहे. 

आवळा म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असणारी जादूची कांडी आहे. पचन सुधारते. शरीराचे पुनरुज्जीवन करतो आणि बरेच काही करतो.  फारसे श्रम न करता होणारे हे झटपट लोणचे. थोडे थोडे ८-१५ दिवस पुरेल इतकेच बनवायचे.

- Advertisement -

साहित्य – 

  • ओल्या हळदीचे तुकडे – १ छोटी वाटी
  • आवळ्याचे तुकडे – अर्धी छोटी वाटी
  • आल्याचे तुकडे – पाव वाटी
  • तीळ तेल – २ चमचे
  • राई – १ छोटा चमचा
  •  हिंग 
  • चवीनुसार मीठ

कृती –

१. ओली हळद, आले, आवळे धुऊन छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत.

२. एका पातेल्यात २ चमचे तीळ तेल घ्यावे. 

३. तेल चांगले गरम झाले की त्यात राई टाकून तडतडू द्यावी. 

४. गॅस बंद करून हिंग टाकावा.

५. हळदीचे, आल्याचे, आवळ्याचे तुकडे टाकून किंचित परतून घ्यावे. शिजवायचे नाहीत. 

६. चवीनुसार मीठ घालावे.

७. तुम्हाला चालत असेल तर अर्धा चमचा काश्मिरी मिरची पावडर घालू शकता.

८. गार झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून फ्रीज मध्ये ठेवावे.

९. तोंडाची चव वाढवणारे, पचन सुधारणारे असे हे लोणचे दिवसातून एकदा तरी जेवणात छोटा अर्धा चमचा घ्यावे. नोकरदार मंडळींनी डब्यात घेऊन जावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -