घरलाईफस्टाईलआंबोली... ‘कोकणचे माथेरान’

आंबोली… ‘कोकणचे माथेरान’

Subscribe

पावसाळ्यात महाराष्ट्राची ‘चेरापुंजी’ म्हणून ओळखले जाणारे आंबोली गाव हिवाळ्यात ‘कोकणचे माथेरान’ म्हणूनही ओळखले जाते.

आंबोली गाव कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदर्‍या, अप्रतिम सृष्टी सौंदर्य हे येथील वैशिष्ट्य आहे. येथे पावसाळ्याप्रमाणेच हिवाळा देखील खूप छान असतो. हिवाळ्यात पडणारे धुके इथल्या निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर घालतात. येथील हे निसर्गाचे मनमोहक सौंदर्य बघण्यासाठी हिवाळ्यात माथेरान आणि महाबळेश्वर इतकेच मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात.

आंबोली हे महाराष्ट्रातील आत्यंतिक पाऊस पडणार्‍या ठिकाणांपैकी एक असून येथे वर्षभरात सरासरी ७५० सेंमी पाऊस पडतो. पावसाळ्यात बर्‍याचदा सूर्यदर्शनही दुर्लभ असते. त्यामुळे या गावाला पावसाळ्यात महाराष्ट्राची ‘चेरापुंजी’ म्हणून ओळखले जाते. तर सह्याद्रीच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर वसलेले आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असल्याने याला ‘कोकणचे माथेरान’ असेही म्हटले जाते.

- Advertisement -

स्थानिकांच्या बोलण्यातून असे कळते की पूर्वी इथले लोक थंडीत पडणार्‍या दाट धुक्यामुळे सकाळी ११ वाजल्यानंतर कामकाजासाठी बाहेर पडत तर दुपारी ३ वाजल्यानंतर गावातील व्यवहार बंद होत. येथील दाट जंगलामुळे अनेकदा रानडुकरे, ससे, गवे, बिबटे, चितळ आदी वन्य प्राणी आढळतात. दुर्मिळ पक्षीही येथे पाहावयास मिळतात. आंबोली फॉरेस्ट पार्कमध्ये विविध प्रजातींचे सर्प, बेडूक पाहता येतात. त्यासाठी वनखात्याची परवानगी घ्यावी लागते.आंबोली येथील हिरण्यकेशी मंदिरातून हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. येथे पूर्वी अस्वलांचा वावर होता. आंबोली मधाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हिरण्यकेशी नदीवर १० किमी अंतरावर नांगरतास धबधबा आहे. हा धबधबा पर्यटकांचा आकर्षणबिंदू म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच इथे महादेवगड, मनोहरगड हे जुने ऐतिहासिक किल्लेही आहेत.

येथील कावळेसाद नावाचा पॉईंटही पर्यटकांना भुरळ घालतो. या पॉईंटवरील दरीत आवाज दिल्यास प्रतिध्वनी ऐकू येतात.ब्रिटिश काळात वेंगुर्ला बंदरापासून बेळगाव शहरापर्यंत सैन्याची रसद नेताना आंबोली हे विश्रांतीचे ठिकाण म्हणून उपयोगी पडे. आंबोली आणि सभोवतालच्या परिसरात १०८ शिवमंदिरे आहेत अशी मान्यता आहे. परंतु फक्त१२ शिवमंदिरे ज्ञात आहेत.

- Advertisement -

कसे जाल?
कोकण रेल्वेने आल्यास सावंतवाडी हे जवळचे स्टेशन आहे. येथून बस, रिक्षा किंवा खाजगी वाहनाने आंबोलीला जाता येते. महाराष्ट्र व कर्नाटकच्या एस. टी. तसेच खाजगी बस बेळगाव ते सावंतवाडी मार्गावर धावतात. सांगली आणि कोल्हापूरहूनही बस आंबोलीला येतात. खाजगी वाहनेही भाडेतत्वावर उपलब्ध आहेत. विमानाने गोव्याला उतरून आंबोलीला जाता येते.आंबोली येथे राहण्यासाठी हॉटेल्सची सोय उपलब्ध आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या निवास – न्याहारी योजनाही उपलब्ध आहेत.आंबोलीची गुलाबी थंडी पर्यटकांना साद घालतेय. उबदार दुलईची मजा घेऊक आंबोलीक नक्की येवा.

-तृप्ती परब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -