नवजात अर्भकासाठी एसी सुरक्षित आहेत का ?

एका विशिष्ट तापमान श्रेणीत बाळ अगदी आरामात राहू शकते

Mumbai

छोट्या बाळांना, विशेषत: नवजात अर्भकांना, त्यांच्या शरीराचे तापमान कमी-जास्त करणे काहीसे कठीण जाते आणि म्हणून ती बाळे अतिउष्णता किंवा उष्म्याशी संबंधित आजारांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. उष्णतेमुळे येणारे पुरळ, डिहायड्रेशन, उष्णतेमुळे येणारा थकवा (हीट एक्झॉशन) किंवा उष्माघात या आजारांचा धोका बाळांना अधिक असतो. हे भीतीदायक आहे ना? हो, नवजात अर्भकाला गरम, कोंदट आणि दमट वातावरणात ठेवण्यापेक्षा कूलर किंवा एसी वापरणे नक्कीच सुरक्षित आहे.

बाहेरील तापमान अधिक असेल, तर एसी/एअर कूलर्स वापरणे सुरक्षित आहे. तापमान ३४-३५ अंश सेल्सिअसहून अधिक असेल, तर बाळाला एसी/एअर कूलरशिवाय अस्वस्थ वाटू शकेल. एका विशिष्ट तापमान श्रेणीत बाळ अगदी आरामात राहू शकते. साधारपणपणे आजूबाजूचे तापमान ३४-३५ अंश सेल्सिअस असेल तर बाळाला सतत घाम येऊ शकतो आणि त्यात त्याची बरीच ऊर्जा खर्च होते. शरीराचे तापमान समतोल राखण्यासाठी हे आवश्यक ठरते. अशा परिस्थितीत एसी किंवा कूलरचा वापर करून आजूबाजूचे तापमान सामान्य व निरोगी श्रेणीत ठेवणे अत्यंत सुरक्षित आहे. एअर कंडिशनर किंवा कूलर वापरताना तुमच्या बाळाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जावी यासाठी खालील टिप्स लक्षात ठेवा.

खोली खूप थंड होऊ देऊ नका

खोलीतील तापमान २४-२५ अंश सेल्सिअसच्या खाली जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. एसीचे तापमान २४ अंश सेल्सिअसहून कमी असेल तर बाळांना हायपोथर्मिया. एसीमध्ये रूम टेंपरेचर डिसप्ले असतो. जर कूलर वापरत असाल, तर खिडक्या थोड्या उघड्या ठेवा, कारण, कूलरमुळे वातावरणातील आर्द्रता वाढते आणि ते बाळाच्या शरीरासाठी योग्य नाही. आर्द्रता खूप वाढत असेल, तर याचा अर्थ कूलर योग्य पद्धतीने काम करत नाही आहे.

थंड हवेच्या थेट झोतापासून बाळाला दूर ठेवा

हात-पाय संपूर्ण झाकले जातील अशा पद्धतीने पातळ आवरणांचे कपडे बाळाला घालणे अत्यावश्यक आहे. यामुळे बाळाचे थंड हवेपासून संरक्षण होईल. तुम्ही त्याच्या डोक्यावर पातळशी टोपी घालू शकता किंवा पातळ सुती मोजे किंवा बुटीज घालून त्याची पावले झाकू शकता. तुमच्या बाळाच्या कपड्यांना एकाहून अधिक स्तर असले पाहिजेत पण ते खोलीतील तापमानाच्या तुलनेत खूप गरम नसावेत. त्याचप्रमाणे त्याला जे गुंडाळाल ते खूप सैल ठेवू नका. एसी किंवा कूलरचा वारा थेट लागणार नाही अशा ठिकाणी बाळाला ठेवा.

बाळाच्या त्वचेतील ओलावा कायम ठेवा

एसीचा बराच वापर केल्यामुळे तुमच्या बाळाची त्वचा शुष्क होऊ शकते. त्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. कोणतीही उत्पादने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय (ओव्हर द काउंटर) वापरू नका, कारण, ती बाळांसाठी घातक ठरू शकतात. गरम हवा साधारणपणे वर जाते आणि खालील पृष्ठभाग थंड राहतो, त्यामुळे तुम्ही जमिनीवर एखादी पातळ गादी घालू त्यावर बाळाला ठेवू शकता. ते त्यावर खेळू किंवा रांगू शकते.

बाळाला थंड खोलीतून तत्काळ उष्ण जागी नेऊ नका

एअर कंडिशन्ड खोलीतून बाहेर पडल्यानंतर बाळाला लगेचच उष्ण जागी नेऊ नका. तापमानात अचानक होणारा बदल तुमच्या बाळाच्या शरीराला सहन होणार नाही. त्याऐवजी एसी बंद करा आणि बाळाला बाहेरच्या तापमानाची सवय होऊ द्या. प्रवास करत असताना कार खूप गरम होऊ शकते. ती थंड करण्यासाठी तुम्ही काही मिनिटे खिडक्या उघड्या ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कारमध्ये बंद झालेली गरम हवा बाहेर जाईल. मग तुम्ही खिडक्या बंद करून थोड्या वेळाने एसी सुरू करू शकता.

प्रिमॅच्युअर बाळांसाठी विशेष काळजी

मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांची उष्णता नियमन क्षमता कमी असते. त्यामुळे तुमचे बाळ मुदतपूर्व जन्मलेले असेल तर खोलीतील तापमान २६ अंश सेल्सिअसहून अधिक राहील याची काळजी घ्या. नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागातही तापमान २६ अंश सेल्सिअसहून अधिक ठेवले जाते.अतिथंडीमुळे हायपोथर्मिया आणि संबंधित गुंतागुत निर्माण होऊ शकते. बाळाचे तापमान हाताच्या मागच्या बाजूने तपासा. बाळाचे शरीर, पंजे/पावले हे अवयव डोके/छातीच्या तुलनेत गार असतील तर बाळ कोल्ड स्ट्रेसखाली आहे म्हणजेच त्याला कदाचित हायपोथर्मिया झाला आहे आणि रिवॉर्मिंगची गरज असते अशावेळी बाळाला चांगले गुंडाळून ठेवा.

(डॉ. तुषार पारीख, कन्सल्टण्ट, पीडिअॅट्रिक्स अँड निओनॅटोलॉजिस्ट )