घरलाईफस्टाईलमी ‘विचारी' फॅशनिस्टा

मी ‘विचारी’ फॅशनिस्टा

Subscribe

हॉस्पिटॅलिटी आणि अभिनय अशा दोन ग्लॅमरस क्षेत्रांशी जोडले गेल्याने फॅशनशी माझा संबंध ओघाने आलाच. पण ‘तेजाज्ञा’ या क्लोदिंग ब्रँडने मला ‘ट्रेंडसेटर’ म्हणूनही प्रस्थापित केलं. करिअरमुळे वेगवेगळ्या फॅशन ट्रेंड्सना आपलंसं करावं लागतं. अशा वेळी व्यक्तिमत्त्वाला उठाव देणाऱ्या नेमक्या पेहरावाची निवड करणं कठीण असतं. पण तुमची फॅशनची संकल्पना स्पष्ट असेल तर फॅशनिस्टा बनणं फारसं अवघड नाही.

पेहरावात वैविध्य असावं, विविध प्रकारचे पेहराव आपल्याकडे असावेत हे अनेकजणींचं स्वप्न असतं. नुसते पेहराव असून उपयोगी नाही तर योग्य प्रकारे कॅरी करताही यायला हवं. पेहरावामुळे आपल्या व्यक्तिमत्वाला वेगळंच वजन प्राप्त होत असतं. औचित्यानुसार पेहराव करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला उठाव येतो असं मला वाटतं. मला पेहरावातील वैविध्य शोधणं खूप आवडतं. ही आवड सर्वांपर्यंत पोहोचावी या हेतूनेच मी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने एकत्र येत ‘तेजाज्ञा’ या क्लोदिंग ब्रँडची सुरुवात केली. माझ्या आणि तेजस्विनीच्या नावातील अक्षरांचा मिलाफ असलेलं नाव आम्हाला द्यावंसं वाटलं. यामागे कारणंही तशीच आहेत. डिझायनिंग आणि फॅशन या दोन्ही बाबी माझ्या आणि तेजस्विनीच्या खूप जवळ आहेत. या पार्श्वभूमीवर स्वत:च्या कल्पनेतून उतरलेले पेहराव इतरांना परिधान करताना पाहणं यात अपूर्व आनंद असतो. ‘तेजाज्ञा’ माध्यमातून मी आणि तेजस्विनी हा आनंद मिळवत आहोत. मे २०१५ मध्ये ‘तेजाज्ञा’ची सुरुवात करताना आपण काही तरी चांगलं देऊ शकू याबद्दल मनात विश्वास होताच. तेजाज्ञाने या तीन वर्षांमध्ये आम्हाला निर्मितीचं आणि ग्राहकांना वैविध्याचं समाधान दिलं आहे.

- Advertisement -

डिझाईन करताना एक बाब जरूर लक्षात ठेवली जाते. ती म्हणजे ‘कपडे आम्हाला परवडले पाहिजेत तर ते इतरांनाही परवडतील.’ याच हेतूने आम्ही डिझाईन करत असतो. मी आणि तेजस्विनी किंवा आपल्यातले बरेचजण मध्यमवर्गीय घरातून आलो आहोत. अशा वेळी कपड्यांच्या खरेदीवर पंधरा-वीस हजार खर्च करणं तितकंसं रुचतही नाही आणि पचनीही पडत नाही. त्यामुळेच कपड्यांचा दर आवाक्यात ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. एकाच ड्रेसवर भरपूर रक्कम खर्च करण्यापेक्षा त्या रकमेत तीन ते चार ड्रेस खरेदी करणाऱ्या संस्कृतीत आपण सगळे मोठे झाले आहोत. याच दृष्टिकोनाचा उपयोग मला ‘तेजाज्ञा’साठी डिझायनिंग करताना झाला. त्यामुळे आमच्या ब्रँडचे कपडे अगदीच महागडे आहेत असं झालं नाही. कपडे डिझाईन करताना माझ्यातला कलाकार सतत जागा असतो. त्यामुळे भूमिकेतलं वैविध्य डिझायनिंगमध्येही उतरवण्याचा आमचा प्रयत्न असतो. पेहरावाबद्दल आपण सगळे आग्रही असतो. त्यातही आपल्याकडे असलेला ड्रेस इतर कुणीही कॉपी करू नये अशी अनेकांची सुप्त इच्छादेखील असते. त्यामुळे एक डिझायनर म्हणून काम करताना मला या वैविध्याकडेही तितक्याच बारकाईने बघावं लागतं.

जुन्यावरच नवा साज चढवणं मला कमालीचं आव्हानात्मक वाटतं. एखाद्या प्रावरणाचा आधीचा बाज आणि तोरा तसाच कायम ठेवून नवीन रुपडं देण्यासाठी कल्पनाशक्ती पणाला लागते. ‘तेजाज्ञा’ मध्ये आम्ही हा प्रयोग खणासोबत केला. खण हा पारंपरिक, रसरशीत पण तितकाच सौंदर्यपूर्ण वस्त्रप्रकार आहे. या खणाला नवं रुपडं देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या खणापासून वेगवेगळ्या प्रकारची प्रावरणं डिझाईन केली. वन पीसपासून पंजाबी ड्रेसपर्यंत प्रत्येक प्रावरणात आम्ही खणाच्या कापडाचा समावेश केला. इतकंच कशाला, खण हा प्रकार आम्ही दागिन्यांमध्येही आणायचा ठरवला आहे. त्यामुळे आम्ही आता खणाचे दागिनेही डिझाईन करत आहोत. हे वेगळेपण सर्जनशीलतेचं खरं समाधान देत असतं. स्वत:ला फॅशनशी जोडणं आणि या निर्मितीचा एक भाग बनणं हे सगळंच माझ्यासाठी खूप चांगला अनुभव देणारं आहे. डिझाईन करताना मी केवळ एक डिझायनर नसते तर एक साधी मुलगीही असते जिला सतत वेगळी फॅशन ट्राय करायची हौस असते. त्यातूनच फॅशनशी संबंधित अनेक नव्या संकल्पनांना वाव मिळत जातो. अभिनेत्री म्हणून मी सतत फॅशनेबल राहणं गरजेचं आहे. किंबहुना, चाहत्यांचीही तशीच अपेक्षा असते. पण माझ्या क्षेत्रासाठी गरजेचं आहे म्हणून सदैव मेक अपमध्ये राहणं हे मला पटत नाही. करिअरला सुरुवात करण्याआधी माझाही फॅशन सेन्स चारचौघींसारखाच होता. त्यावेळी ‘फॅशन दिवा’ बनण्यापेक्षा आरामदायी पेहरावाला जास्त पसंती असायची. कॉलेजमध्ये असेपर्यंत इतर मुलींप्रमाणे जीन्स आणि टी शर्ट माझ्या विशेष आवडीचे होते. त्या दिवसात घरातून बाहेर पडताना लूकचा आताइतका बारकाईने विचारही करत नसे.

- Advertisement -

हवाई सुंदरी प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर मात्र ही परिस्थिती बदलली. तिथल्या एकूणच सक्तीच्या वातावरणाने माझा फॅशन सेन्स बराच सुधारला. हवाई सुंदरीचं व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि नीटनेटकं असावं असा साधारण नियम आहे. पण या आकर्षक अणि नेटक्या लूकच्या मागे बरीच मेहनत असते. ट्रेनिंगला गेल्यावर मारून मुटकून का होईना, मला या सवयी अंगी बणवाव्याच लागल्या. सुरुवातीला या सवयींचा त्रास झाला असला तरी आता काम करताना ही शिस्त मला इतरांच्या पुढे रहायला मदत करते. नीटनेटकं राहणं, योग्य पेहराव परिधान करणं, देहबोली योग्य आणि प्रभावशाली असावी यासाठी जाणीवपूर्वक परिश्रम घेतल्याचा फायदा संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला होत असतो. त्यामुळेच ट्रेनिंगदरम्यान नाखुशीने का होईना, मी स्वत:कडे लक्ष द्यायला शिकले. फॅशन म्हणजे यापेक्षा वेगळं काय असतं? फॅशन ही एक प्रकारची शैली असते जी तुम्हाला सर्वांगाने प्रभावित करत असते.

केवळ मेक अप करून रॅम्प वॉक करणं ही फॅशनची व्याख्या नाही. याउलट तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देणाऱ्या शैलीशी जुळवून घेणं ही फॅशनची खरी व्याख्या आहे असं मला वाटतं. त्यामुळे विशिष्ट व्यक्ती किंवा वर्ग एखादा ट्रेंड फॉलो करतोय म्हणून मी ही त्याच वाटेने जाणं तितकंसं योग्य होणार नाही. याउलट तो ट्रेंड माझ्यासाठी कितपत आरामदायी असेल याकडे लक्ष द्यायला आवडेल. त्यामुळे आली फॅशन की ट्राय कर, असं माझ्याबाबत कधीही होत नाही. अभिनय करतानाही मी या बाबींकडे आवर्जून लक्ष देते. व्यक्तिरेखा कशी आहे, तिची विचारसरणी कशी आहे, तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर पेहराव ठरत असतो. उदाहरणार्थ नकारात्मक व्यक्तिरेखेचा पेहराव हा काहिसा बटबटीत, वेगळा आणि शक्यतो गडद रंगातील असतो. व्यक्तिरेखेची नकारात्मकता अधिक उठावदार व्हावी हा उद्देश यातून साध्य केला जातो.

– अभिज्ञा भावे (लेखिका अभिनेत्री आहेत)

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -