Monday, January 18, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल जाणून घ्या अष्टविनायकातील आठ गणपती

जाणून घ्या अष्टविनायकातील आठ गणपती

महाराष्ट्रात असणाऱ्या या आठ गणपतींना भेट दिल्यास दोन दिवसात या आठही गणपतींची अष्टविनायक यात्रा दोन दिवसात पुर्ण होते.

Related Story

- Advertisement -

अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची आणि प्रतिष्ठेची गणपतीची देवळं आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात असलेल्या या देवळांना स्वतंत्र असा इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुगल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते. महाराष्ट्रात असणाऱ्या या आठ गणपतींना भेट दिल्यास दोन दिवसात या आठही गणपतींची अष्टविनायक यात्रा दोन दिवसात पुर्ण होते. या आठ गणपतीपैकी पुणे जिल्ह्यात मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री येथे पाच गणपती आहेत. तर रायगड जिल्ह्यात महाड आणि पाली येथे दोन गणपती असून अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक येथे एक गणपती आहे. जाणून घेऊया अष्टविनायकातील आठ गणपती आणि त्याचे ठिकाणं

श्री. मोरेश्वर – मोरगाव

- Advertisement -

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्वाचे स्थान आहे. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. पुरंदर तालुक्यात क-हा नदीच्या तीरावर उत्तराभिमुख असे हे मंदिर आहे. भोवती तटबंदी असून मंदिराच्या चारही दिशेला चार मिनारासारखे खांब आहेत. मंदिराला पाय-या असून तेथेच नगारखाना आणि बाजूला पायात लाडू धरलेला उंदीर आहे. पुढे अकरा पाय-या चढून गेल्यावर एका दगडी चौथऱ्यावर मोठा आता काळ्या पाषाणातला, गणपतीकडे तोंड केलेला नंदी आहे. त्या नंदीपुढे मोठे, चपटी आणि दगडी असे कासव आहे. या कासावापुढे मुख्य मंदीर लागते. ते दगडी पाषाणातले असून तेथेही एक मोठा उंदीर आहे. मंदिराच्या गाभा-यात डाव्या सोंडेची मयुरेश्वराची मूर्ती आहे. या मूर्तीला तीन डोळे असून डोळ्यात य बेंबीत हिरे बसवलेले आहेत. मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळाच्या मूर्ती आहेत.
पुणेजिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे.

- Advertisement -

श्री. चिंतामणी – थेऊर

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊर येथील गणेश मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली. मुळा आणि मुठा नद्यांनी वेढलेल्या या थेऊर गावाला पूर्वी कदंब तीर्थ तसेच चिंतामणी तीर्थ म्हटले जात असे. कदंब वृक्षाच्या खाली हे मंदिर वसलेले आहे. या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा असून तेथे शमी आणि मंदार वृक्ष आहेत. पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे. त्यापुढे गाभा-यात डाव्या सोंडेची शेंदूर लावलेली चिंतामणीची स्वयंभु मूर्ती आहे. या पूर्वाभिमुख गणेश मूर्तीच्या डोळ्यात माणिक रत्न आहेत.
भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे.

श्री. सिध्दीविनायक – सिध्दटेक

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे स्वयंभू मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असे म्हंटले जाते. भगवान विष्णूने येथील गणेश मूर्तीची स्थापना केली. या मंदिराचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे.
अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची असणारी ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक आहे. गणेशास सकाळी खिचडी, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी दुध भात, व रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो. हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे. महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्यापुढे गाभारा आहे. गाभा-यात उजव्या सोंडेची व शेंदूर लावलेली सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. गाभा-यातील मखर पितळाची असून त्यावर चंद्र, सूर्य, गरुड, नागराज यांच्या आकृती कोरलेल्या असून दोन्ही बाजूला जय-विजय आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून २३ कि. मी. अंतरावर आहे. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते, ती ओलांडायला पुर्वी होड्या होत्या, मात्र सध्या पूल तयार झाला आहे.

श्री. महागणपती – रांजणगाव

अष्टविनायकांपैकी रांजणगावचा चौथा गणपती आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. भाद्रपद महिन्यात येथे घरोघरी गणेशाची स्थापना करण्याची प्रथा नाही तर मंदिरातील गणेशाची पूजा केली जाते. अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणा-या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की उत्तरायण आणि दक्षिणायन याच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असे असून प्रवेशद्वारावर जय-विजय हे द्वारपाल आहेत. मंदिरातील सभामंडपातून आत गेल्यावर गाभा-यात महागणपतीची मूर्ती आहे. गणपतीने कमळाची आसनमांडी घातलेली आहे. गणपतीला दहा हात आहेत. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. मंदिराचे स्थान इ. स. दहाव्या शतकातील आहे. हे क्षेत्र श्री भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच गणेश मूर्तीची येथे स्थापना केली.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात हे स्थान पुणे-अहमदनगर राज्य महामार्गावर आहे. रांजणगाव-पुणे ५० कि.मी, रांजणगाव-शिरुर १७ कि.मी, जवळच्या न्हावेरपासून पुणे-सोलापूर मार्गावरील चौफुला येथे जाता येते. चौफुल्याहून थेऊर, मोरगाव व सिद्धटेकला देखील जाता येते.

श्री. विघ्नेश्वर – ओझर

अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा व विघ्नाचे हरण करणारा विघ्नेश्वर हे एक गणपतीचे जागृत स्थान आहे. मंदिराला दगडी तटबंदी आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचा कळस आणि शिखर सोन्याचा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत. महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन उंच दीपमाला नजरेस पडतात. मंदिरात एकात एक अशी सभामंडपाची रचना असून प्रवेश द्वारातून प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदीराची मूर्ती आहे.

देऊळाच्या भिंतींवर चित्रकाम केलेले आहे. दोन सभामंडपातून आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे. गाभा-यात डौलदार कमानीत बसलेली पूर्णा कृतीतील विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन डोळ्यात माणके तसेच कपाळावर आणि बेंबीत हिरे आहेत. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पिताळ्याच्या मूर्ती आहेत. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.

श्री. गिरीजात्मज – लेण्याद्री

या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरुपात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती. मत आणि पार्वतीचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज. त्यावरून त्यास गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले.
येथे एकूण २८ लेण्या आहेत. मंदिर सातव्या लेणीत असून त्याला गणेश लेणी म्हणतात. ६ व्या लेणीत बौद्ध स्तूप असून येथे सात वेळा आवाजाचा प्रतिध्वनी उमटतो. लेणीस जाण्यासाठी ३२१ पाय-या आहेत. गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झालेली आहे. लेणी परीसर पुरातत्त्व विभागाच्या अधिकारात पुरा आहे. मंदिरात प्रवेशासाठी पुरातत्त्वविभाग पाच रुपये शुल्क आकारते.

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

श्री. वरदविनायक – महड

इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास वरद विनायक म्हटले जाते. १७२५ साली पेशवे काळात हे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर कौलारू, घुमटकर असून पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या चारही बाजूंना दोन-दोन हत्ती कोरलेले आहेत. मंदिराच्या पश्चिमेला देवाचे तळे आहे तर उत्तरेला गोमुख आहे. मंदिरावर नागाची नक्षी असलेला सोन्याचा कळस आहे. मंदिराला दगडी नक्षीकाम केलेली महिरप असून गाभा-यात वरदविनायकाची दगडी सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे.

या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय.
रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.

श्री. बल्लाळेश्वर – पाली

रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सान्निध्यात स्वयंभु असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभा-यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहणा-या उंदीराची मूर्ती आहे. आतील गाभा-याच्या वरील बाजू घुमट आकार असून त्यावर अष्टकोनी कमळ आहे. या गाभार्यात बल्लाळेश्वराची डाव्या सोंडेची पाषाणाची मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ विशाल असून डोळ्यात आणि बेंबीत हिरे बसविलेले आहेत. चांदीच्या थाळीवर रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती चव-या ढाळीत आहेत.

पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली – पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल – गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.

- Advertisement -