पाठीचे दुखणे दूर करण्यासाठी करा ‘धनुरासन’

जाणून घ्या 'धनुरासन'चे फायदे.

Mumbai
benefits of dhanurasana
'धनुरासन'

आपण अनेकदा वेगवेगळी आसने पाहिली आहेत. मात्र, कोणते आसन कोणत्या आजारावर फायदेशीर असते. याबाबत माहिती नसते. तसेच सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सातत्याने पाठीचे त्रास उद्भवत असतात. जर तुम्हाला पाठीचा सातत्याने त्रास जाणवत असेल, तर तुम्ही ‘धनुरासन’ नक्की करु शकता. चला तर जाणून घेऊया ते कसे करावे? त्याचे फायदे काय? आणि काय खबरदारी घ्यावी.

‘धनुरासन’ म्हणजे काय?

शरीराला धनुष्याचा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला ‘धनुरासन’ म्हटले जाते.

कसे करावे ‘धनुरासन’?

 • सर्वप्रथम दोन पायात अंतर ठेऊन पोटावर झोपावे आणि हात देखील शरीरालगत असू द्यावे.
 • नंतर गुडघ्यातून पाय उडी करुन घोटे पकडा.
 • त्यानंतर श्वास घेत जमिनीपासून छाती वर उचला आणि पाय वर आणि मागे ढकला.
 • चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत सरळ पुढे पहा. शरीरातील ताण वाढेल तसे हास्य देखील वाढू द्या.
 • श्वासावर लक्ष ठेऊन अंतिम स्थितीमध्ये स्थिर रहा. तुमचे शरीर धनुष्याप्रमाणे ताठ बनले आहे.
 • या स्थितीमध्ये विश्राम करत खोल दीर्घ श्वास घेत रहा. परंतु, खूप ताण देऊ नका.
 • पंधरा-वीस सेकंदानंतर श्वास सोडत पाय आणि छाती जमिनीवर आणा. घोटे सोडून विश्राम करा.

‘धनुरासन’चे फायदे

 • पाठीचे आणि पोटाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.
 • दररोज केल्याने पाठीची लवचिकता वाढते.
 • छाती, गळा आणि खांदे मोकळे होतात.
 • त्याचप्रमाणे पाय आणि हातांचे स्नायू बळकट होतात.
 • या आसनामुळे तणाव आणि आळस निघून जाण्यास मदत होते.
 • मासिक पाळीमधील अस्वस्थता आणि बद्धकोष्ठता दूर होते.
 • मूत्र रोगांवर फायदा होतो.

‘धनुरासन’बाबत काय घ्यावी खबरदारी?

 • उच्च किंवा कमी रक्तदाब असणाऱ्यांनी ‘धनुरासन’चा सराव करु नये.
 • मानेचे विकार असलेल्यांनी हे आसन करु नये.
 • डोकेदुखी, पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे, पोटाची शस्त्रक्रिया, अर्धशिशी आणि डोकेदुखी असणाऱ्यांनी हे आसन करु नये.