स्क्रब टायफसपासून सावधान

‘त्सुत्सुगामुशी’ हा जपानी शब्द ‘त्सुत्सुगा’ म्हणजे आजार व मुशी म्हणजे किटक अशा दोन शब्दांपासून बनलेला आहे. त्सुत्सुगामुशी नावाच्या जीवाणूंपासून स्क्रब टायफस हा घातक आजार होतो. स्क्रब म्हणजेच लहान झुडूपांमध्ये वास्तव्य करून राहणार्‍या एका विशिष्ट प्रकारच्या किटकाने (माईट) चावल्यामुळे माणसास स्क्रब टायफस हा आजार होतो. माईट हा एक परोपजीवी किटक असून स्क्रब टायफसचे जीवाणू तो माणसाच्या शरीरात त्याच्या चावण्यातून सोडतो.

Mumbai
Scrub Typhus

भारतात हिमाचल प्रदेशात स्क्रब टायफसचा प्रादुर्भाव आढळतो. महाराष्ट्रात गेल्या दीड-दोन वर्षांपासून विदर्भात या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. स्क्रब टायफस या एका नवीन, धोकादायक आजाराचा आपणाकडे शिरकाव झाालेला आहे.

असा होतो स्क्रब टायफस                                                                                                        लहान लहान झुडूपे असलेल्या ठिकाणी हा आजार परसविणारे माईटस हे सूक्ष्म किटक वास्तव्य करून राहतात. या माईटसच्या जीवनचक्रामध्ये ‘चिगार’ नावाची एक स्थिती असते. डासाचे जसे जीवनचक्र असते त्याचप्रमाणे माईट या किटकाचेही चार अवस्थांचे जीवनचक्र अंडी – अळी, चिगार – निम्पफ – माईट असे असते. चिगार या अळीला उष्ण रक्ताच्या प्राण्याच्या त्वचेमध्ये रहायला आवडते. त्यामुळे चिगार या अळ्या गोचिडाप्रमाणे प्राण्याच्या कातडीवर घट्ट पकडून राहतात. या चिगार अळीची लांबी 0.17 ते 0.22 मि.मि. इतकी असते. हे चिगार पावसाळ्यात उंच गवत तसेच झाडा झुडूपांमध्ये आढळून येतात आणि उन्हाळ्यात झाडांच्या सावलीत गळून पडलेल्या पानांच्या खाली, पालापाचोळ्यात दिसून येतात. त्याचप्रमाणे चिगार या अळ्या शेतातील उंदीर घुशी यांच्या अंगावर व पाळीव प्राण्यांच्या अंगावर मुख्यत: कानामध्ये, शेपटीच्या व गुदद्वाराच्या अवतीभवती चिकटलेल्या असतात. या स्थितीतील हे चिगार जेव्हा माणसास चावतात त्यावेळी स्क्रब टायफसचे जंतू माणसाच्या शरीरात सोडले जातात.

स्क्रब टायफसची लक्षणे                                                                                                        असे हे चिगार चावल्यानंतर साधारणपणे दहा-बारा दिवसांनी, सहा दिवसांपासून ते 20 दिवसांपर्यंत अशा चिगार चावलेल्या व्यक्तीस जोराचा ताप येतो, थंडी वाजून येते, डोकेदुखी, अंगदुखी, जांघेत किंवा बगलेत गाठी येणे ही लक्षणे दिसून येतात. वेळेवर निदान न झााल्यास अथवा उपचार घेण्यास उशीर झाल्यास अशी व्यक्ती बेशुद्धावस्थेत जावून मृत्यू ओढावतो. या आजारात मृत्यू होण्याचे प्रमाण 10 ते 40 टक्क्यांपर्यंत जाते. ज्या ठिकाणी चिगार हे सूक्ष्म किटक चावतात त्या जागेवर एक जखम तयार होते आणि या जखमेवर काळपट पापुद्रा दिसून येतो. या जखमेस ‘ईशार’ असे म्हणतात. हा आजार ओळखण्याची ही एक महत्त्वाची खूण आहे. अनेक रुग्णांमध्ये अंगावर पुरळ येणे, रक्तस्त्राव होणे ही लक्षणेही दिसून येतात. या आजाराचा कालावधी साधारणपणे दोन ते तीन आठवड्यांचा असतो.

      डॉ. के.आर.खरात
सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा,

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here