त्वचेसाठी पोषक असे नारळाचे दूध

Mumbai
coconut

नारळाला श्रीफळ म्हणतात. नारळाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतो, म्हणूनच नारळाला ही उपाधी. आपल्या घरी नारळ येताच, नुसते वाटणघाटण करण्यापलीकडेही वापरले तर या नारळात आपल्या सौंदर्यविषयक अनेक समस्यांचे उपाय सापडतात.

त्वचा, केस आणि संपूर्ण शरीरासाठी नारळ अत्यंत गुणकारी ठरतो. हिवाळा आणि इतर ऋतूमध्येही नारळाचा उपयोग क्लिनर, टोनर आणि मॉईश्चरायझर म्हणून करता येतो. नारळात त्वचेला उपयुक्त फॅटी अ‍ॅसिड आणि ई-जीवनसत्त्व असते. नारळ त्वचेतील आर्द्रता साठवून त्वचा ओलसर ठेवण्यास मदत करतो. आपली त्वचा तरुण-तजेलदार ठेवणारे घटक नारळात असतात. अशा या नारळाचा उपयोग सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी केला तर.!

रंग उजळण्यासाठी

साहित्य :- अर्धा किसलेला नारळ, चार ते पाच भिजवलेले बदाम, हळकुंडाचा तुकडा आणि लिंबू.

कृती : नारळ, बदाम आणि हळकुंड एकत्र दळून घ्यावे. या मिश्रणाला हाताने पिळून त्यातला रस काढावा. तो गाळणीनं किंवा पातळ सुती कापडाने गाळून घ्यावा. या द्रावणात लिंबाचे दोन ते तीन थेंब टाकावेत. हे द्रावण चेहरा आणि मानेला हलक्या हाताने मसाज करत लावावे. थोड्या वेळाने चेहरा गार दुधाने धुवावा आणि नंतर चेहर्‍यावर गुलाब पाणी शिंपडावे.

त्वचा मऊ होण्यासाठी

साहित्य :- एक कप किसलेला नारळ, अर्धा कप ओटमील पावडर, दोन चमचे मध आणि दोन चमचे ग्लिसरीन.

कृती :- किसलेला नारळ वाटावा. नारळाचं दूध काढावं. त्यात ओटमील पावडर, मध आणि ग्लिसरीन टाकून मऊ पेस्ट करावी. ही पेस्ट संपूर्ण चेहरा आणि मानेला लावावी. पाच मिनिटांनंतर चेहरा ताकानं धुवावा. नंतर थोडं गुलाबपाणी पाण्यात टाकून त्या पाण्यानं चेहरा धुवावा.

तरूण दिसण्यासाठी

साहित्य :- पाऊण कप नारळाचं दूध, दोन चमचे खोबर्‍याचं तेल आणि पाऊण कप पपईचा गर.

कृती :- वरील सर्व साहित्य एकत्र करावं. तयार झालेलं मिश्रण हलक्या हातानं मसाज करत चेहर्‍याला लावावं. थोड्या वेळानं नारळाच्याच दुधानं चेहरा धुवावा आणि नंतर चेहर्‍यावर गार पाण्याचे सपकारे द्यावेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here