घरलाईफस्टाईलपावसाळ्यात गरोदर महिलांनी घ्या 'असा' आहार

पावसाळ्यात गरोदर महिलांनी घ्या ‘असा’ आहार

Subscribe

चांगले आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहार घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे ध्येय असावे. गरोदरपणात गर्भ आणि भावी मातेसाठीही संतुलित आहाराचे महत्त्व अधिक वाढते. प्रत्येक ऋतूमध्येच आहाराच्या चांगल्या सवयी असाव्यात. विशेषतः पावसाळ्यात खानपानाच्या सवयींविषयी अधिक सतर्क राहावे लागते. गरोदर स्त्रीने पोषक आणि पचण्यास हलक्या पदार्थांची निवड करावी. कारण पावसाळ्यात पोटाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

- Advertisement -

गरोदरपणा स्त्रियांच्या शरीरातील संप्रेरकांच्या पातळीत तीव्र चढ-उतारहोत असल्याने गरोदर स्त्रियांना हे आजार होण्याची शक्यता अधिक असते. दूषित किंवा शिळे पदार्थ आणि पाण्यामुळे गरोदर स्त्रियांना जीवाणू, विषाणू किंवा जंतूंमुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे योग्य आहार आणि जेवण व पदार्थ तयार करण्याबाबत स्वच्छता राखल्याने गरोदर महिलांना पावसाळ्यात आजार होण्यापासून प्रतिबंध केला जाऊ शकतो.

सुदृढ गरोदरपणासाठी या सल्ल्यांचा अवलंब करा

गरोदर महिलांना दिवसातील कोणत्याही क्षणी एखाद्या विशिष्ट पदार्थ खावासा वाटू शकतो. मात्र बाहेरील दूषित अन्नपदार्थ आणि पाण्यामुळे टायफॉइड, कॉलरा यासारखे आजार होऊ शकतात. शिजवून फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खाऊ नयेत. नेहमी ताजे पदार्थ खावे. क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असलेली फळे खाऊन प्रतिकारक यंत्रणा सुदृढ ठेवा: संत्री, किवी, मोसंब या फळांमध्ये क जीवनसत्व भरपूर असते. अँटिऑक्सिडंट्स, अ, क, ई जीवनसत्व, झिंक, सेलेनिअम आणि बी६, बी१२ आणि फॉलिक अॅसिडची गरज भागविणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

- Advertisement -

शिजवलेल्या भाज्याच खाव्या: पावसाळ्यात तुम्हाला कच्ची गाजरे, काकड्या किंवा कांदे खावेसे वाटत असले तरी भाज्या न शिजवता खाणे शक्यतो टाळावे. कारण स्वच्छ न केलेल्या किंवा पावसाच्या पाण्याने भिजलेल्या भाज्यांवर जीवाणूंची वाढ होऊ शकते. अशा प्रकारच्या भाज्या खाल्ल्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे गर्भाच्या वाढीवर, विशेषत: सुरुवातीच्या टप्प्यावरील वाढीवर परिणाम होतो.

हिरव्या पालेभाज्या शक्यतो टाळाव्यात : पावसाळ्यात मात्र हिरव्या पालेभाज्या शक्यतो टाळाव्यात. कारण त्यात कीडे, चिखल असू शकतात आणि त्या पटकन शिळ्या होतात. याच कारणासाठी लेट्युस आणि पालेभाज्या असलेले सलाड या कालावाधीत टाळावे. असे पदार्थ खायचेच असतील तर ते मीठाच्या पाण्याने धुवून घ्या.

कापलेली फळे शक्यतो टाळा! फ्रुट चाट किंवा फ्रुट डिश देणाऱ्या स्टॉल्सपासून लांब राहा. किंबहुना, तुम्ही अशा स्टॉल्सवरून फळांचे रस पिणेसुद्धा योग्य नाही. फळे विकत घ्या आणि खाण्याआधी ती नीट धुवून घ्या. शिल्लक राहिलेले फळ तुम्ही साठवून ठेवू नका. चिरून ठेवलेल्या फळांवर जीवाणूंची वाढ होते आणि त्यामुळे फळाचा पोषक तत्वांचा ऱ्हास होऊ लागतो.

मांसाहार करताना पुन्हा विचार करा: मांसाहारी पदार्थांवर सूक्ष्म जंतूंची वाढ अधिक प्रमाणात होते. पावसाळ्यात मांसाहारी पदार्थांमधून कीटकांमुळे होणारे आजार फैलावण्याची शक्यता असते. कच्चे मांस कोणत्याही प्रकारे खाण्याचा विचारही करू नका.

आंबट पदार्थ टाळा: गरोदर असताना तुम्हाला लोणची आणि चिंच खावीशी वाटते. पण या पदार्थांमुळे पाणी शरीरात राहते. अशा प्रकारचे पदार्थ मर्यादित प्रमाणात खावे.

तळलेले आणि स्टार्चयुक्त पदार्थ टाळावे: हे पदार्थ पचण्यास जड असतात. त्यामुळे रुचकर चवीमुळे भरपूर प्रमाणात जेव्हा खाल्ले जातात तेव्हा अपचन होण्याची शक्यता असते. तळलेले आणि अति शिजलेले पदार्थ त्यांची पचनक्षमता घालवतात. त्यामुळे असे पदार्थ मर्यादित प्रमाणात खावे.

गरोदरपणात सुदृढ राहण्यासाठी कोणता आहार घ्यावा, याचा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा आहारतज्ज्ञ तुम्हाला देतील. गरोदरपणात आणि स्तनपान देताना तुमचा आहार हेच तुमच्या बाळासाठी पोषण असते. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या आहाराबद्दल कोणतीही तडजोड करू नका आणि तुम्ही आणि तुमचे बाळ सुदृढ राहील, याची खातरजमा करा.

{डॉ. सपना चौधरी (जैन),  सल्लागार,  प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र}

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -