अशी करा हिवाळ्यातील सांधेदुखीवर मात

Mumbai
सांधेदुखी

हिवाळा आणि संधिवात यांचा अगदी जवळचा संबंध आहे. सांधे जखडणे, सुजणे, वेदनापूर्वक हालचाली इत्यादी सांध्याबद्दलच्या अनेक तक्रारी हिवाळ्यात सुरू होतात. थंडीमुळे शारीरिक हालचाली मंदाविल्यानेही सांधे अजून जखडल्यासारखे वाटतात. थंडीच्या काळामध्ये वाढलेला सांधेदुखीचा त्रास जवळपास दोन तृतीयांश रुग्णांना सहन करावा लागतो. हा त्रास पुढील उपायांमुळे कमी होतो. वेदना कमी झाल्याने तुमचे दैनंदिन काम तुम्हाला सहज करता येते.

सर्वसाधारणपणे ६० ते ६५ वर्षेवयोगटातील वृद्धांमध्ये सांधेदुखीची तक्रार दिसून येते. थंड हवामानात सांध्यांमधील वेदना, ताठरपणा आणि सूज वाढते. या आजारासाठी कोणताही कायमस्वरूपी उपचार नसल्याने अनेक आरोग्यतज्ज्ञ सांधेदुखीपासून आराम मिळावयासाठी योग्य आणि पोषक आहारावर भर देण्याचा सल्ला देतात.

जसजसा हवामानाचा पारा खाली उतरू लागतो तसतसे सांधेदुखी डोके वर काढू लागते. सांधेदुखीचा त्रास असणार्‍यांसाठी हिवाळा हा वेदनादायक ठरू शकतो. हिवाळ्यामध्ये सांधेदुखी का वाढते यामागची वैज्ञानिक कारणे अनिश्चित आहेत. परंतु, या काळात सांधेदुखीच्या रुग्णांची स्थिती क्लेशदायक होते हे नक्की. काही सांधेदुखी विषयक संशोधनातून असे समोर आले आहे की, बॅरोमेट्रिक प्रेशरमुळे सांधेदुखी थंडीच्या काळात अधिक बळावते. पण योग्य आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेल्या औषधांमुळे सांधेदुखीचे व्यवस्थापन करणे सहज शक्य आहे.

हवेच्या दाबातील छोट्याशा बदलांमुळे सांधेदुखी वाढू शकते. यात आणखी भर म्हणून थंडीच्या काळामध्ये कमी प्रमाणात होणार्‍या शारीरिक हालचालींमुळे रक्ताभिसरणही कमी प्रमाणात होते. असेदेखील आढळून आले आहे की, याकाळामध्ये परिघीय भागातील रक्ताभिसरण नेहमीपेक्षा कमी होते.

सांधेदुखीचा आणि हवामानाचा संबंध खरा असो अथवा नसो, सांधेदुखीमध्ये आराम मिळण्यासाठी जीवनशैलीतील बदल महत्त्वाची भूमिका निभावतो. त्याचबरोबर व्यायामाची कमतरता, खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा अभाव यामुळे सांधेदुखीच्या तक्रारी वाढतात. सांधेदुखी आनुवंशिकही असू शकते. त्यासाठी काही आरोग्यपूर्ण गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. या गोष्टी पाळल्या, तर हिवाळ्यात होणारा सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.

१. कायम उबदार रहा– थंडीमध्ये तुमच्या सर्व सांध्यांना उबदार कपड्यांनी लपेटा. सांध्यांना ऊब द्या.

२. व्यायाम – व्यायामाबद्दल तुम्ही जेवढे सजग असाल तेवढेच तुमच्या शारीरिक हलचाली सहज होतील. चालणे हा सर्वांसाठी सर्वोत्तम उपाय आहे. म्हणूनच घरात असतानाही हालचाल करीत रहा. व्यायाम सांधेदुखीला लगाम घालतो. व्यायामाने तुमची शारीरिक क्षमता, लवचिकता वाढीस लागते आणि त्यामुळे वेदना कमी व्हायला मदत होते. मात्र, तुमच्या फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्यानेच व्यायाम करा. एक चुकीचा व्यायाम तुमचे दुखणे वाढवू शकतो. तुम्हाला कोणता व्यायाम करायचा आहे हे ठरविण्याआधी तुम्हाला कोणती शारीरिक हालचाल करायची नाही आहे हे शिकून घ्या.

३. वाफ – सांधेदुखीमध्ये गरम वाफ मोलाची मदत करू शकते. बहुतेकदा लोक इलेक्ट्रिक हीटिंग पॅडचा किंवा गरम पाण्याच्या पिशवीचा वापर करतात, परंतु हे दोन्ही वापरताना काळजी घ्यायला हवी. कारण या दोन्ही गोष्टी झोपताना अंगाखाली राहून गेल्यातर सांधेदुखीच्या वेदना तर कमी होतील. परंतु, त्वचा मात्र भाजली जाऊ शकते. या दोन्ही वस्तूंचा वापर पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा जास्त करू नये. डायबेटिक न्यूरोपॅथीच्या पेशंटनी वाफेचा अथवा हीटिंगपॅडचा खूप काळजीपूर्वक उपयोग करायला हवा.

४. आरोग्यदायी आहार- नेहमी संतुलित आहार घ्या. ओमेगा ३, फॅटीअ‍ॅसिडस, व्हिटॅमिन ‘के’ आणि व्हिटॅमिन ‘सी’ आर्थ्रायटिसच्या वेदना कमी करण्यात सहाय्यक ठरतील. ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिडस असलेले खाद्यपदार्थ शक्यतो टाळा. त्याच्यामुळे सांधेदुखी जास्त होऊ शकते.

५. भरपूर पाणी प्या- शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने सांधेदुखीमध्ये वेदना जास्त वाढू शकतात. म्हणून भरपूर पाणी प्या.

६. वजन कमी करा – कमी शारीरिक हालचालीमुळे सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. वजन असल्यास वेदनांमध्ये ही वाढ होते म्हणून वजन नियंत्रणात ठेवा.

७. पूरक जीवनसत्वे – व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा आजार बळावू शकतो. त्यासाठी नियमित पहाटेच्या कोवळ्या उन्हात फिरायला जा. तसेच इतर सर्व पूरक जीवनसत्त्वे आपल्या आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्या.

– डॉ मनन गुजराती, ऑर्थोपेडीक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here