निरोगी हृदयासाठी करा योगसाधना

Mumbai
Yoga

धावत्या आणि धकाधकीचे जीवन जगत असताना नुसतं शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर मानसिक स्वास्थ्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. योगामुळे शरीर आणि मन दोन्ही नेहमी प्रसन्न राहते असा लोकांचा अनुभव आहे. योगामधील आसनं, प्राणायम आणि ध्यानधारणा आरोग्य आणि मुळात आपलं हृदय निरोगी राहण्यासाठी मदत होते. हृदय चांगलं राहण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. जाणून घेऊया याची पाच कारणं.

तणावापासून मुक्तता
रोजच्या ताणतणावांपासून मुक्त राहायचं असल्यास रोज दिवसातून काही वेळ योगा करावा. ध्यानधारणेमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. योगाच्या सरावामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात. ध्यानामुळे तुम्हाला शांत राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयावर ताण येत नाही.

वजनात होते घट
दैनंदिन योगा केल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. योगामधील आसनांमुळे शरीरातील स्नायूंवर योग्य दबाव येऊन वजन कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र त्यासाठी रोज योगा करणं गरजेचं आहे. वजन कमी झाल्यावर आपोआपच हृदयावर येणारा भार कमी होतो. त्यामुळे हृदयाशी निगडीत आजार कमी होतात.

धुम्रपान रोखते
धुम्रपान हे हृदयविकारासाठी मुख्य कारण आहे. रोज योगा केल्यामुळे धुम्रपान करणार्‍या व्यक्तींना धुम्रपान सोडण्यासाठी मदत होते. बरेच लोक ताणतणावात असल्यानंतर धुम्रपानाचा आधार घेतात; पण योगामुळे ताण कमी होतो. त्यामुळे धुम्रपान सोडणं शक्य होतं.

योगामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत
नियमित योगा केल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतं. यामुळे रक्तदाबदेखील कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपोआप हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण कमी होत जातं. योगातील काही आसनं वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाणदेखील आपोआप कमी होऊन हृदयावर दबाव येत नाही.

हृदयाच्या काळजीसाठी उपयोगी
उच्च रक्तदाब, ताणतणाव यापासून मुक्त होण्यासाठी योगाचा उपयोग होतो. दिवसातून साधारण ४० मिनिटं योगा केल्यानं हृदयाची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. शरीरातील रक्तप्रवाह नीट होऊन आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here