एण्डोकार्डिटिसवर प्रतिबंध करण्याचे उपाय

हृदयरोगतज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक

Mumbai

हृदयाच्या अस्तराच्या सर्वांत आतील स्तराचा तसेच हृदयातील झडपांना सूज येण्याच्या अवस्थेला एण्डोकार्डिटिस असे म्हटले जाते. एण्डोकार्डिटिसवर प्रतिबंध करण्याचे उपाय पुढीलप्रमाणे-

एण्डोकार्डिटिसवरील उपचार रुग्णाची वैद्यकीय परिस्थिती, प्रादुर्भावाची तीव्रता, हृदयातील झडपांना झालेली जखम आदी घटकांवर अवलंबून असतात. हृदयरोगतज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक असते. या आजाराचे निदान निश्चित करण्यासाठी टू एकोकार्डिओग्राफी, ब्लड कल्चर चाचणी अशा चाचण्या कराव्या लागतात. बहुतेकदा रुग्णाला रुग्णालयात दाखल व्हावे लागते. एण्डोकार्डिटिसच्या रुग्णांना प्रतिजैवके दिली जातात. ही प्रतिजैवके इंट्राव्हेनस मार्गाने अर्थात ड्रिपद्वारे दिली जातात. प्रतिजैवक उपचार दीर्घकाळ चालतात. डॉक्टरांना कल्पना न देता स्वत:हून औषधे घेणे किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे घेणे पूर्णपणे टाळले पाहिजे.

हे ही वाचा – एण्डोकार्डिटिस होण्याची ‘ही’ आहेत कारणं

एण्डोकार्डिटिसमुळे हृदयाचे नुकसान झालेले असेल, तर रुग्णावर ओपन हार्ट सर्जरी करून एण्डोकार्डिटिसमुळे झडपेत झालेला बिघाड दुरुस्त करावा लागतो. हृदयाच्या झडपेचे ती पुरेशी घट्ट बंद होणार नाही इतके नुकसान झाले असेल व त्यामुळे रक्ताचा प्रवाह उलट्या दिशेने जात असेल, शस्त्रक्रियेखेरीज पर्याय उरत नाही.

एखाद्याला सातत्याने प्रादुर्भाव होत असेल आणि तो प्रतिजैवक किंवा बुरशीनाशक औषधांना प्रतिसाद देत नसेल, किंवा जीवाणू आणि पेशींचा मोठा गुंता तयार झाला असेल किंवा हृदयाच्या झडपेला लागून काही वाढ (व्हेजिटेशन) झाली असेल तरीही शस्त्रक्रिया आवश्यक ठरते. थोडक्यात, हृदयाला झालेली हानी दुरुस्त करण्यासाठी किंवा नुकसान झालेल्या हृदयाच्या झडपा दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया हा पर्याय ठरतो.

इन्फेक्टिव एण्डोकार्डिटिसचे एकंदर निदान तो कोणत्या प्रकारच्या जीवाणूंमुळे झाला आहे, हृदयाच्या कोणत्या झडपांना प्रादुर्भाव झाला आहे, शरीराची प्रतिजैवकांप्रती असलेली संवेदनशीलता आणि रुग्ण प्रतिजैवकांना देत असलेला प्रतिसाद यांवर अवलंबून आहे.

एण्डोकार्डिटिसवरील प्रतिबंधात्मक उपाय

तुम्हाला एण्डोकार्डिटिसच्या खुणा व लक्षणांची माहिती असणे आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही खुणा किंवा लक्षणे दिसल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरांना दाखवून योग्य सल्ला घ्या.

विशेषत: न उतरणारा ताप, तापामुळे पुन्हापुन्हा दवाखान्यात दाखल व्हावे लागणे, कारणाशिवाय थकवा येणे, त्वचेला झालेला प्रादुर्भाव, बऱ्या न होणाऱ्या उघड्या जखमा किंवा छेद. त्वचेला प्रादुर्भाव ओढवण्याचा धोका असलेल्या बॉडी पीअर्सिंग किंवा टॅटू काढण्यासारख्या बाबी टाळा.

आयव्हीद्वारे औषधे अतिप्रमाणात घेऊ नका. यामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाचा उजव्या झडपेचा एण्डोकार्डिटिस होऊ शकतो. हा बहुतेकदा बुरशीमुळे झालेला असू शकतो.

(एण्डोकार्डिटिस : भाग- २ | डॉ. बिपीनचंद्र भामरे, कार्डिओ-थोरॅसिक सर्जन, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई)