घरलाईफस्टाईलनिसर्ग सहलींचा अनुभव घ्या

निसर्ग सहलींचा अनुभव घ्या

Subscribe

या विकेंडला जर तुम्ही सहलीचे आयोजन करत आहात तर निसर्ग सहलींना प्राधान्य द्या. नेहमीचे वॉटर स्पोर्ट्स, वॉटर राईड्स यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यातील सहल तुम्हाला वेगळाच अनुभव देईल. तेव्हा मुंबईजवळील निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता येणारी सहलीची ठिकाणे तुमच्यासाठी.

कर्नाळा किल्ला – पक्षी निरीक्षण, नैसर्गिक पाऊलवाटांवरून ट्रेकिंग करणे, तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेला कर्नाळा किल्ला निसर्ग पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ. पनवेलपासून 12 किमी अंतरावर असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य 12.11 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. याठिकाणी निवासी पक्ष्यांच्या १५० प्रजातींचे व स्थलांतरित पक्ष्यांच्या ३७ प्रजातींचे निवासस्थान आहे. याशिवाय कर्नाळा किल्ला परिसरातील कर्नाळा अभयारण्य, करणाई देवी मंदिर, तटबंदी, जुने बांधकाम, थंड पाण्याच्या टाक्या आदी ऐतिहासिक बाबी पर्यटकांना भुरळ घालतात.

- Advertisement -

कसे जावे – पनवेलवरून पेण, अलिबाग, रोहा, कोणतीही एसटी बस पकडा. पनवेल – पळस्पे – शिरढोण-चिंचवण नंतर पुढील थांबा कर्नाळा अभयारण्य मग तिथून पायी जावे लागते.

येऊरचे डोंगर : आदिवासी पाडे, डोंगररांगांमधून पडणारे धबधबे, विविध प्रजातींचे पक्षी पाहण्याची इच्छा झाल्यास येऊरचे डोंगर गाठावे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पूर्वेकडील भागात असलेले येऊरचे डोंगर हे सहा लहान वस्त्या व तेथील रहिवासी असलेल्या आदिवासींचे घर आहे. येथील धबधबे पाहत घनदाट अरण्यातून पायवाटांवर संपूर्ण दिवसभर भटकंती करणे म्हणजे आवडणार्‍या निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्ग आहे. हौशी पक्षी निरीक्षक व शाळेची मुले मोठ्या संख्येने नेहमी भेट देत असतात. येऊरच्या डोंगरावर काही रिसॉर्टही आहेत. त्यामुळे राहण्याचा आणि जेवणाचा प्रश्नही सुटतो. मुंबईपासून फक्त 25 किमी अंतरावर असल्याने मुंबईकरांसाठी सहज पोहोचता येणारे असे हे सहलीचे ठिकाण आहे.

- Advertisement -

एलिफंटा बेट– प्रसिद्ध अजिंठा व वेरूळ लेण्यांशी साधर्म्य असणार्‍या लेण्यांचे ठिकाण म्हणजे एलिफंटा बेट. गेटवे ऑफ इंडियापासून फेरीने गेल्यास तासाभराच्या अंतरावर असलेले एलिफंटा बेट हे मुंबईपासून 10 किमी पूर्वेस आहे. येथे हाताने कोरलेल्या भिंतीवरील चित्रांच्या सात प्राचीन लेण्या आहेत ज्यांचे अजिंठा व वेरुळच्या लेण्यांशी बरेच साधर्म्य आहे. तसेच या परिसरातील कॅनॉन हिलवर चढू शकता जेथे शिखरावर एक जुनी तोफ ठेवलेली आहे.

साहसी जलक्रीडांचे केंद्र, कोलाड : महाराष्ट्रातील साहसी क्रीडाप्रकारांचे केंद्रस्थान असलेले रायगड जिल्ह्यातील कोलाड हे ठिकाण त्याच्या कुंडलिका नदीमधील व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि ट्रेकिंगच्या पायवाटांसाठीही प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या पुढ्यात वसलेले व मुंबईपासून 121 किमी अंतरावरील कोलाड हे नेहमीच साहसी क्रीडाप्रकारांनी गजबजलेले असते. राफ्टिंगशिवाय येथे निवड करण्यासाठी कॅनोइंग, कायाकिंग, पॅराग्लायडिंग, रॅपलिंग, रॉक क्लायम्बिंग आणि रिव्हर झिप लाईन क्रॉसिंगचे पर्यायही उपलब्ध आहेत. परागकणांवर जशा मधमाशा आकर्षित होतात त्याचप्रकारे वॉटरफॉल रॅपलिंग आणि माऊंटन बायकिंग यासारख्या क्रीडाप्रकारांकडे साहसी क्रीडाप्रकारांचे चाहते आकर्षित होऊन कोलाडला येत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -