घरलाईफस्टाईलअनुभवसंपन्न विद्यापीठ!

अनुभवसंपन्न विद्यापीठ!

Subscribe

आई या दोन अक्षरी शब्दाची जादू एवढी मोठी आहे की थोरामोठया लेखक, कवी, नाटककारांनी यावर आपली बरीच पाने खर्ची घातली आहेत. आत्मा व ईश्वर यांचा मिलाफ असलेली आई म्हणजे पृथ्वीतलावरील मूर्तिमंत देवताच. या मातृत्वाची कृपा लाभलेला मानव भाग्यवंतच होय. ‘दिवार’ या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध संवाद ‘मेरे पास माँ है’ आठवत असेलच. लांब कशाला जा; आपल्या मायमराठीतच म्हटले गेले आहे, ’स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’.

माझी आईही अशीच. लग्नापूर्वीचे आयुष्य कोकणातील गावात गेलेले; त्यामुळे पहिली-दुसरीपर्यंत शिक्षण झालेले, पण पुस्तकी ज्ञान नसले तरी या जगात तग धरून राहण्यासाठी लागणार्‍या व्यवहारज्ञानाची मात्र आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी जमवलेली. माझी आई जुळ्या भावंडांतील एक. सारख्या चेहरेपट्टीमुळे दोघी बहिणींतला फरक इतरांना ओळखू येत नसे आणि त्यांची गंमत व्हायची. पूर्वाश्रमीची मुक्ता गणपत परब लग्न झाल्यावर सावित्री काशिराम गुंडये झाली. लग्न करून मुंबईला आल्यानंतर पहिल्यांदा मुंबईचे दर्शन. गावी स्वयंपाक मातीच्या चुलीवर केलेला.

मुंबईच्या स्टोव्हची काहीच कल्पना नव्हती. त्यातही बाबांबरोबर गावातील इतरही बरीच मंडळी जी कामानिमित्त मुंबईला आलेली ती आमच्याकडे राहायला होती. त्यांच्या जेवणखाण्याची सोय आमच्याकडेच. अशा परिस्थितीत ताडदेवच्या जायफळवाडीतील बाबांचा संसार तिने लग्नानंतर नीटनेटका केला. बर्‍याचशा गोष्टी ज्या जमत नव्हत्या त्या शिकून घेतल्या. स्टोव्ह पेटवायला ती शिकली. गावी भाकर्‍या करायची सवय, पण मुंबईला तर चपात्या लागायच्या, त्याही शिकून घेतल्या. एकदा शिकून घेतल्यावर मात्र मागे वळून पाहिले नाही. बाबा गिरणी कामगार, त्यामुळे आमच्या घरी पहाट लवकर व्हायची. चारलाच उठून धुणीभांडी करून बाबांसाठी डबा तयार असायचा. त्यात इतरांचे डबेही आले.

- Advertisement -

ओघाने मग दुपारचे जेवणपण लवकर व्हायचे. त्यातच संध्याकाळी गिरणीतून बाबा चार-पाचच्या सुमारास घरी यायचे. मग त्यांना लवकर जेवण मिळावे, म्हणून संध्याकाळचे जेवणही लवकर तयार करून सातलाच सगळ्यांना जेवण वाढले जायचे. आठपर्यंत सर्व चिडीचूप होऊन जायचे, कारण बाबांना परत दुसर्‍या दिवशी सकाळी कामावर लवकर जायचे असायचे. आईचा हा क्रम बाबांनी कामावर जायचे बंद केले (म्हणजे आम्हाला नोकरी लागल्यानंतर) तरीही चालू राहिला. याच क्रमामुळे कुठलाही घरगुती कार्यक्रम असला तरी तिचे जेवण सकाळी अकरापर्यंत तयार असायचे. आपल्यामुळे दुसर्‍यांची अडचण नको, असा समंजस विचार त्यामागे असायचा. त्याकाळी फोन, मोबाइल अशी संपर्काची साधने नव्हती. रविवार धरून नातेवाइकांचे एकमेकांकडे जाणे व्हायचे. असे कोणी नातेवाईक कुटुंबासह अचानक घरी आले तर तिची तारांबळ उडत नसे. त्या सर्वांच्या जेवणाची सोय अगदी वेळेवर होत असे.आता कळविल्याशिवाय कोणी आले तर कुठून ही ब्याद आली असा त्रासिक चेहरा यजमानबाईंचा असतो.

जायफळवाडीत माझी आई गुंडीनताई म्हणूनच ओळखली जायची आणि आम्ही भावंडे गुंडीनताईची मुले. आताही हीच ओळख कायम आहे, केस कमी तरीही केसांचा आंबाडा सतत बांधलेला. फुलांची तर खूप आवड. कुठलेना कुठले फूल तर केसात माळलेले असणार. नऊवारी साडी, कपाळावर गोल कुंकू आणि सदैव हसतमुख चेहरा. रस्त्यावरून चालताना ओळखीचे हमखास भेटणारच, मग दोन शब्द बोलून विचारपूस ही आलीच. त्याशिवाय पुढे जाणे नाही.

- Advertisement -

गावी असताना शिक्षण झाले नाही. पण आमचे शिक्षण सुरू झाले आणि तिचीही शाळा सुरू झाली. रोज न चुकता आम्हा भावंडांना शाळेत नेऊन सोडणे व शाळेतून घेऊन येणे यानिमित्ताने शाळेत ती येऊ-जाऊ लागली. पावसातही नेम चुकला नाही. दप्तरे घेऊन आम्हाला सांभाळत शाळेची वारी पंढरपुराला नेमाने जाणार्‍या वारकर्‍याप्रमाणे कधीही चुकवली नाही. जायफळवाडीत असलेल्या झर्‍यावर दिवसभर गर्दी असायची. त्यामुळे आई सकाळी लवकरच धुणे करुन पाणी भरुन ठेवायची. त्यामुळे आम्हालाही लवकर उठवायची. म्हणजे आमची आंघोळ झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या बादल्या परत भरुन ठेवता येत असत. त्यामुळे परत झर्‍यावर जाणे नको. पण या लवकर उठायच्या सवयीमुळेच आता रात्री कितीही उशिरा झोपलो तरी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जाग येतेच येते.

आई जन्माने पायाळू, त्यामुळे तिच्याकडे चमक भरलेली माणसे पाय फिरवून घ्यायला यायची आणि तिचा पायगुण असा होता की त्या माणसांचे दुखणे हमखास बरे व्हायचे. संपूर्ण जायफळवाडीत ती यासाठी प्रसिद्ध होती. कोणताही मोबदला न घेता एक प्रकारे तिची समाजसेवाच चाललेली असायची. जी अलिकडच्या काळात जिथे प्रत्येक गोष्टीत मोबदला बघितला जातो तेथे दुर्मिळ होत चाललीय. माझ्या भावाच्या मित्राच्या वडिलांची कंबरदुखी बरेच दिवस बरी होत नव्हती. डॉक्टरी उपचार करुन फरक पडत नव्हता. भावाचा मित्र आईला घरी घेऊन गेला आणि आईने आपला पाय फिरवला मात्र त्याच्या वडिलांची कंबरदुखी बरी झाली.

परीक्षेच्या काळात लवकर उठण्यासाठी वेगळा गजर लावण्याची गरज नसे. आईला सांगितले की काम झाले. अगदी ज्या वेळेस उठायचे असेल त्या वेळी ती आम्हाला उठवत असे, घडयाळ न पाहताही सूर्याच्या घरात आलेल्या किरणांवरून योग्य वेळ सांगायची. पाच-दहा मिनिटांचा फरक असायचा, पण तेवढा अचूकपणाही आम्हाला खूप वाटायचा आणि यामुळेच की काय तिची सर्व कामे अगदी वेळेवर होत असत.

आम्ही पाच भावंडे. चार भाऊ व एक बहिण. या सर्वांचे हवे नको ते पाहण्यातच ती सदैव मग्न असायची. स्वत:साठी असे काही खास नको असायचे. संपूर्ण आयुष्यात एकदाच तिने चित्रपटगृहात चित्रपट पाहिला तोही त्याकाळात धोधो चाललेला मराठी चित्रपट ‘लेक चालली सासरला’. बाकी टीव्हीचे तिला कधीच अप्रूप नव्हते. बाबांचा स्वभाव थोडासा रागीट. त्यामुळेच त्यांच्या रागापासून बचाव करण्यासाठी आईचा पदर पुरेसा पडत असे.

घरी केलेला पदार्थ हा दोन-चार शेजार्‍यांकडे जाणारच. शेजारधर्माचा हा शिरस्ता कधी चुकला नाही. वक्तशीरपणा, समाजसेवा, नेहमी हसतमुख राहणे इत्यादी गुण एकाचवेळी या माऊलीच्या अंगी होते आणि हे घरात असलेले अनुभवसंपन्न विद्यापीठ आम्हाला आमच्या आयुष्यात बरेच काही शिकवून गेले.

एका छोट्याशा आजाराच्या निमित्ताने ती हॉस्पिटलमध्ये जी भरती झाली ती परत न येण्याकरताच. तिच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब कोलमडले. १९ फेब्रुवारी २००५ रोजी शिवजयंतीच्या दिवशी आईने इहलोकाचा निरोप घेतल्यानंतर इतकी वर्षे उलटून गेली, पण अजूनही तिच्या आठवणी ताज्या आहेत, तिच्या मायेची पाखर अजूनही आमच्यावर आहे. असे राहून राहून वाटते. कधी कधी एकांतात त्या माऊलीची आठवण येते आणि डोळ्यांच्या कडा ओलावतात.

– दीपक गुंडये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -