घरलाईफस्टाईलघोस्ट टाऊन लखपत

घोस्ट टाऊन लखपत

Subscribe

आजूबाजूला ना कोणी लोक ना कुठला आवाज. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त खंडर. एखाद्या भयपटात जसं उजाड गाव तशी काहीशी तिथली परिस्थिती.

सकाळी ११ वाजताची वेळ असावी… सामसुम अशा रस्त्यावरून दूर किल्ल्याची तटबंदी दिसत होती. किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून एन्ट्री करताच दिसतं ते एक गाव. इथले घर जरी चांगल्या स्थितीतील असले तरी त्यात कुणीच राहत नव्हतं. आजूबाजूला ना कोणी लोक ना कुठला आवाज. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त खंडर. काही घरं तर अगदी बंगले होते. मात्र ते ही अगदी उजाड. एखाद्या भयपटात जसं उजाड गाव तशी काहीशी तिथली परिस्थिती होती. हे गाव आहे गुजरातमधल्या कच्छ जिल्ह्यातील लखपत.

सर्वात आधी आम्ही लखपतचं प्रमुख आकर्षण असलेल्या किल्ल्याला भेट द्यायचं ठरवलं. किल्ल्यावर चढताच दूरपर्यंत पसरलेलं पांढरं शुभ्र रण. रिफ्यूजी चित्रपटातील ‘मेरे हमसफर मेरे साथ आ’ हे गाणं आणि ‘बॉर्डर’ चित्रपटातील काही सिन याच ठिकाणी चित्रीत झाले आहेत. तिथे लावलेल्या बोर्डवर लखपतचा थोडक्यात इतिहास मांडला आहे. त्यामुळे ते उजाड असलेलं गाव बघण्याची उत्सुकता ताणली गेली. तिथे असलेल्या गुरुद्वारात मुक्काम करून गाव बघण्याचा आम्ही निश्चय केला.

- Advertisement -

लखपत हे किल्ल्याच्या आत वसलेलं ४०० ते ४५० लोकवस्तीचं हे गाव. हे गाव भूजपासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. गावात गेल्यावर एका महालानं आमचं लक्ष वेढलं. अकबानी महाल असं त्याचं नाव. तो महल कधी काळी इथं असलेल्या समृद्धीची साक्ष देत होतं. जेव्हा जेव्हा इथं दुष्काळ पडला तेव्हा या महालाच्या मालकाने इथल्या लोकांना प्रचंड मदत केली. तसेच एकतर अल्ला मदत करतो किंवा या घराचा मालक असे गौरवोद्गारही तिथे लावलेल्या बोर्डवर आहे.

असे कित्येक बंगले, महाल तिथे आज ओसाड पडले आहेत. २०० वर्षांपूर्वी हे एक समृद्ध शहर होतं. हे शहर इतकं समृद्ध होतं की इथल्या लोकांची रोजची कमाई ही लाखोंच्या घरात होती. त्यामुळे त्या गावाचं नाव लखपत पडलं. हे एक व्यापारी बंदर होतं. सिंध आणि गुजरातच्या व्यापाराचं हे मुख्य केंद्र होतं.

- Advertisement -

व्यापाराचं मुख्य केंद्र असण्याचं कारण म्हणजे या शहराची भौगोलिक परिस्थिती. कोरी क्रीक इथून निघाल्यावर समुद्र मार्गाने इथून सिंध, अरबी महासागर आणि हिंद महासागराच्या तटावरच्या कोणत्याही भागात जाता येत होते. तसंच हजला जाण्याचा हा एक प्रमुख जलमार्ग होता. शिखांचे पहिले गुरू गुरुनानक यांनी देखील याच ठिकाणाहून हजची यात्रा केल्याचे बोलले जाते. त्याच्या स्मरणार्थ इथं गुरुद्वारा बांधला गेला आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि हजला जाण्याच्या मार्गामुळे इथं वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या धर्मातील लोक येऊन स्थायिक झाले होते. त्यामुळे हे एक कॉस्मोपॉलिटियन शहर बनलं होतं. शिवाय त्या काळी इथं शेतीही चांगली व्हायची. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की १० हजार वस्तीचं शहर आज उजाड असं घोस्ट टाऊन म्हणून का ओळखलं जातं. तर ज्या पाण्यामुळे या शहराला समृद्धी दिली त्याच पाण्याने याचा घातही केला.

१६ जून १८९१मध्ये इथे मोठा भूकंप आला. या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की इथं वाहणार्‍या सिंध नदीने प्रवाह बदलला. प्रवाह बदलल्याचा परिणाम शेती आणि लोकजीवनावर झाला. या बंदराचं महत्त्व कमी झालं. १९६५ च्या भारत पाकिस्तान लढाईत जो थोडाबहुत व्यापार सिंध प्रांताशी शिल्लक होता तोही बंद झाला. शेती नाही. पिण्याला पाणी नाही, व्यापार नाही त्यामुळे लोकांनी शहर सोडायला सुरुवात केली. इथले सर्व श्रीमंत लोकांनी मुंबई, सुरत, अहमदाबाद अशा मोठ्या शहराकडे धाव घेतली. १० हजार लोकवस्ती असलेल्या शहराचं आज खेड्यात रुपांतर झालं असून आज इथं केवळ ४००-४५० लोकं उरली आहेत.

या गावापासून चाळीस किलोमीटर अंतरावर नारायण सरोवर आणि कोटेश्वर ही दोन प्रसिद्ध ठिकाणं आहेत. लखपत या ठिकाणी कोणतेही हॉटेल नाही की रेस्टॉरंट नाही. राहण्यासाठी गुरुद्वार आहे. जिथे मोफत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ एक टपरी आहे. तिथे नाष्टा, कोल्ड्रिंक्स, पाणी बॉटल मिळते. गावात काही लोक जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्थाही करतात. मात्र गुरुद्वारात राहण्यासाठी योग्य आहे. तिथे रमजान यांच्या घरी आम्हाला अगदी ताजे मासे खायला मिळाले. अगदी आदराने ते तुम्हाला खाऊ घालतात. याचे असे काही चार्ज नाही तुम्ही स्वखुशीने जे पैसे द्याल तोच या जेवणाचा चार्ज. सोबतच दर आठ दिवसांनी रंग बदलवणारा असा अद्भूत तलाव या गावात आहे.

कधी काळी इथं व्यापारानिमित्त असलेली लोकांची रेलचेल, किल्ला हा बंद झाला आणि त्याची जागा घेतली ती शांततेने. आज इथं जे काही लोक उरले आहेत ते मासेमारीचे काम करतात. पिण्याच्या पाण्याची इथं व्यवस्था नसल्याने खारे पाणी पिऊन लोकांना जगावं लागत आहे. त्यामुळे हे गावही आता नष्ट होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. तु्म्ही कधी कच्छला गेले तर एक दिवस तरी या गावात नक्की थांबा.
-स्नेहल वानखेडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -