ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना, जवळील सहकाऱ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो. आपल्या मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सअॅप, फेसबुक, एसएमएस, सोशल मीडिया पोस्ट, व्हॉट्सअॅप स्टेटस, ग्रीटिंगच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. हा मैत्री दिवस कलाकारसह सगळेच साजरा करतात. मात्र, कलाकारांनी मैत्रिचे महत्त्व सांगितले आहे.
मैत्री म्हणजे माझ्यासाठी आयुष्य. आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात आणि निघून जातात. मात्र, मित्रमैत्रिणी कायम टिकून राहतात. एकतर या नात्याला ना कोणते बंधन ना अपेक्षा असते ते निःस्वार्थी प्रेम आणि पारदर्शकता. माझा अगदी बोटांवर मोजण्याइतका मित्रपरिवार आहे. अंजली, श्वेता, विनायक, कृतिका, अभिषेक, सुयोग हे माझे खूप जवळचे मित्रमैत्रिणी आहेत. विनायक आणि मी सहा सहा महिने बोलत नाही, भेटत नाही. तरीही सहा महिन्यानंतर भेटल्यावरही आमचं नातं तसंच असतं. ताज टवटवीत. खरं तर हे सगळेच माझ्यासाठी खास आहेत. आजवर त्यांनी माझ्यासाठी खूप केलं आहे.
‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’
एकदा माझं फोटोशूट होतं. आदल्या दिवशीच मला खूप ताप आला होता. त्यामुळे मी फोटोशूट करूच शकत नव्हते. त्यात जिच्यासाठी फोटोशूट करायचे आहे, ती कॉलेजमध्ये जाणारी मुलगी होती आणि तिने कॉलेजला सुट्टी घेऊन, वेळातवेळ काढून फोटोग्राफर, मेकअप या सगळ्यांचीच व्यवस्था केली होती. मला तिला फोन करून सांगायला जरा विचित्रच वाटत होतं. परंतु माझाही नाईलाज होता. अखेर तिने मी काही होऊ शकते का बघते सांगून, हृताला फोन करून तिने परिस्थिती सांगितली आणि आपण शूट करूया का विचारलं. हृतानं तिला लगेच होकार दिला. हृता सकाळी दादरहून ठाण्याला शूटला गेली, तिथून दादरला फोटोशूटला आली आणि दोन -अडीच तासांचा प्रवास करून ती मला गोरेगावला भेटायला आली. तासभर थांबून पुन्हा दादरला गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता ठाण्याला शूटला हजर. हे खरं तर माझं फोटोशूट होतो परंतु ते हृतानं केलं. हे सगळं मित्रच करू शकतात. याला निव्वळ वेडेपणा आणि प्रेम म्हणतात आणि हा वेडेपणा हृताने अनेक वेळा माझ्यासाठी केला आहे. आम्ही गंमतीत आमच्या नात्याला ‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’ म्हणतो. आमच्या वेळा, जागा यांचा कधीच ताळमेळ जमत नाही. तरीही आमचं प्रेम कायम आहे. मला खूप अभिमान आहे तिच्याबद्दल.
– सायली संजीव

मैत्री म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व
आज प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे. मात्र तरीही आम्ही सगळ्यांच्या वेळेचे नियोजन करून कधीतरी एकत्र भेटतोच आणि आमच्या प्रत्येक भेटीत गोव्याच्या ट्रीपच्या आठवणी या आवर्जून निघतात. कॉलेजपासूनचा माझा हा ग्रुप आजही तितकाच घट्ट आहे पाहून, खूप छान वाटतं. आमच्या सहा जणींमध्ये काहीच लपवाछपवी नसते. प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकींशी शेअर करतो. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. त्यांच्याबरोबर असताना मी अभिनेत्री मृण्मयी कधीच नसते. फक्त मृण्मयी असते. आम्ही जीवाभावाच्या मैत्रिणी आहोत.भविष्यातही आमची मैत्री अशीच राहूदे.
– मृण्मयी देशपांडे
‘ओन्ली युअर ट्रू फ्रेंड विल टेल यू दॅट यू आर अग्ली’

तिची एक खास गोष्ट अशी, की तिला मित्रमैत्रिणींना विलक्षण पद्धतीनं सरप्राईज द्यायला खूप आवडतं. माझ्या बाबतीत तर अनेकदा असं घडलं आहे. एक आठवण मला सांगावीशी वाटते. मी दंतवैद्यकीय करत होते आणि ती कायद्याचा अभ्यास. त्यामुळे आमचे कॉलेजेस वेगळे होते. कॉलेजमध्ये असताना वाढदिवस म्हणजे नेहमीच खास असायचा. माझ्यामते मी इंटर्नशीपला असताना माझ्या वाढदिवसाला ती काही कारणास्तव नव्हती. मी सुद्धा तिला समजून घेतलं. त्यानंतर माझ्या कॉलेजमध्ये हॅलोविन पार्टी होती. मी चर्चगेटला राहायचे आणि माझं कॉलेज नवी मुंबईला होतं. माझा वाढदिवसाला ती येऊ शकली नाही म्हणून ती आमच्या कॉलेजच्या हॅलोविन पार्टीला आली. तिने माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीसोबत संपर्कात राहून मला अचानक सरप्राईज दिलं. त्या दिवशी मी खूपच खुश झाले. मला तिचं येणं अजिबात अपेक्षित नव्हतं आणि ती आल्याने मला जो आनंद झाला होता तो निव्वळ अवर्णनीय होता. आम्ही प्रत्येक वर्षी असं काहीतरी करतोच. जे आमच्यासाठी खूप खास असतं. मग ते काहीही असो. कविता करणं असो, एकमेकींना भेटवस्तू पाठवणं असो. आजवरच्या माझ्या प्रवासाची ती खूप जवळची साक्षीदार आहे. माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग ती आहे. मी खूप नशीबवान आहे, की माझ्या आयुष्यात श्वेतासारखी मैत्रीण आहे. पुढील आयुष्यात मी सुद्धा तिच्यासाठी तेवढंच करू शकेन, जेवढं आजवर तिने माझ्यासाठी केलं आहे.