घरलाईफस्टाईलकडुलिंबाच्या सेवनाने करा नववर्षाची सुरुवात

कडुलिंबाच्या सेवनाने करा नववर्षाची सुरुवात

Subscribe

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. प्रसन्न वातावरणात, गोडा-धोडाच्या जेवणात, नवे कपडे परिधान करून अगदी जल्लोषात हा सण साजरा केला जातो. मात्र, केवळ नववर्षापुरतीच ‘गुढीपाडव्या’चे महत्त्व मर्यादीत नसून निसर्गातदेखील या काळात बदल होत असतो. बहरणार्‍या वसंत ऋतुत झाडावेलींची पालवी नव्याने बाळसं धरत असते.

 गुढीपाडव्याला ‘कडुलिंब’ का खातात?

होलिका दहनानंतर वातावरणात उष्णता वाढू लागते. या वातावरण बदलाच्या काळात कांजण्या, गोवर यासारखे त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी- पडशांसारखे लहान सहान विकार फोफावतात. मग अशावेळी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व पुढील काळात शरीराचे स्वास्थ्य राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करतात.

मात्र चवीला कडू असल्याने कडुलिंब खाण्याचे आपण टाळतो. पाडव्या दिवशी आईने अट्टाहास केल्यास कडुलिंब कसा खावा? असा प्रश्न पडतो. कडुलिंब इतका बहुगुणी असेल तर निरोगी आरोग्यासाठी एक ‘कडू घोट’ घ्यायलाच हवा. मग चवीला कडवट असणारा कडुलिंबाचा पाला थोडा चविष्ट करून खा.

- Advertisement -

कोवळ्या कडुलिंबाच्या पानाचे बारीक तुकडे करून त्यात मिरपुड, हिंग, मीठ, गूळ, खोबर्‍याचा किस, जिरे व थोडा कैरीचा किस एकत्र करून खा.

कडुलिंबाचे गुणधर्म

कडुलिंब पचायला हलका, चवीने कडू व तुरट असतो, तसाच तो काही प्रमाणात शीतलही असतो. मुख्यत्वे कफदोष व त्यामागोमाग पित्तदोषाचे शमन करतो. मात्र, वात वाढवतो. कडुलिंब चवीमुळे नकोसा वाटला तरी अग्नीला प्रदीप्त करणारा असतो. योग्य प्रमाणात सेवन केल्यास श्रमांमुळे झालेल्या अशक्ततेला भरून आणतो, तहान शमवतो; खोकला, ताप, तोंडाची चव जाणे व जंत या सर्व विकारांत उपयुक्त असतो.

- Advertisement -

कडुलिंब जखम भरून येण्यासाठी उपयुक्त असतो. जंतुसंसर्ग झाला असला तर कडुलिंबाच्या पानांच्या काढ्याने जखम अगोदर धुऊन घेऊन नंतर कडुलिंबाची पाने मधासह वाटून तयार झालेला लगदा जखमेवर लावावा. या प्रकारे काही दिवस रोज केल्याने हळुहळू जखम भरून येते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयुक्त असतात. कडुलिंबाच्या पानांचा रस खडीसाखरेबरोबर काही दिवस घेतल्याने कडकी कमी होते.

आग होणार्‍या सुजेवर पानांचा लेप करण्याने लगेच बरे वाटते. कडुलिंबाची पाने बारीक करून पाण्यात मिसळून व्यवस्थित फेटली की पाण्यावर फेस तयार होतो. हा फेस अंगाला लावला असता दाह कमी होतो. विशेषतः पित्तामुळे आलेल्या तापात त्वचेचा दाह होतो, तो शांत करण्यासाठी हा फेस उपयुक्त असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -