घरलाईफस्टाईलपावसाळ्यात उद्भवणाऱ्या 'हेपटायटिस ई'पासून सावधान!

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या ‘हेपटायटिस ई’पासून सावधान!

Subscribe

सर्दी, ताप आणि खोकल्यासारख्या पावसाळ्यात हल्ला करणाऱ्या साध्या आजारांबरोबरच या काळात हेपेटायटिस ई सारख्या गंभीर आजारांची लागण होण्याचीही शक्यता असते.

पावसाळ्याच्या ऋतूमधील वातावरण आजारांचा फैलाव करणाऱ्या जंतूंच्या पैदाशीसाठी अतिशय पोषक असते. सर्दी, ताप आणि खोकल्यासारख्या पावसाळ्यात हल्ला करणाऱ्या साध्या आजारांबरोबरच या काळात हेपेटायटिस ई सारख्या गंभीर आजारांची लागण होण्याचीही शक्यता असते.

हेपेटायटिस ई हा मुख्यत्वे यकृताचा गंभीर आजार आहे, ज्याची लागण विष्ठेने, दूषित झालेले पाणी वा अन्न पोटात गेल्याने होते. या मोसमामध्ये पाणी, विशेषत: जलवाहिन्या आणि पाण्याच्या टाक्यांतील पाणी दूषित होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हेपटायटीस ईचे प्रमाणही वाढलेले दिसते. संसर्गित प्राण्यांचे मांस, शिंपले अर्धकच्या स्वरूपात खाल्ल्यानेही या आजाराची बाधा होऊ शकते. अर्थात योग्य त्या वैद्यकीय उपचारांनी हा आजार बरा करता येतो ही जमेची बाजू आहे. हेपेटायटिस ईची सर्वात ठळक लक्षणे पुढीलप्रमाणे :

- Advertisement -
  • भूक न लागणे
  • त्वचा व डोळे पिवळे पडणे
  • ताप
  • सांधे दुखणे
  • पोटात दुखणे
  • यकृताला सूज येणे
  • मळमळणे व उलट्या होणे
  • अतिशय थकवा जाणवणे

हेपेटायटिस ईचा प्रतिबंध :

पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेपेटायटिसच्या धोक्याबद्दल माहिती असणे आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे. या ऋतूमध्ये उद्भवणाऱ्या या आजाराला ‘सायलंट किलर’ म्हटले जाते. कारण अनेकजण त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, स्वत:च औषधोपचार करत राहतात किंवा रोग गंभीर अवस्थेला पोहोचल्यावरच त्याच्या लक्षणांची दखल घेतात. हेपेटायटिस हा अन्न आणि पाण्यावाटे होणारा आजार आहे. विष्ठेचे कण तोंडावाटे शरीरात जाणे हा या आजाराच्या संसर्गाचा प्राथमिक मार्ग मानला जातो. हा आजार प्रामुख्याने दूषित पाणी किंवा अन्न खाल्याने होतो आणि जिथे हातांची स्वच्छता आणि एकूण स्वच्छता योग्य प्रकारे पाळली जात नाही, तिथे तो मोठ्या प्रमाणात आढळतो. स्वच्छतेची उत्तम खबरदारी, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता हे या आजाराचे प्रमुख प्रतिबंधक घटक आहेत.

कच्चे अन्न आणि भाज्या खाणे टाळा :

ज्या पदार्थांमध्ये फळे किंवा भाज्या न शिजवता वापरल्या जातात (उदा. सॅलड्स, फळाचे रस) असे पदार्थ बनविताना विशेष काळजी घ्यायला हवी. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून पदार्थ विकत घेणे टाळा आणि अशा फेरीवाल्यांकडून आधीच कापलेली फळे विकत घेणेही टाळा, कारण ती दूषित पाण्यामध्ये धुतलेली असू शकतात. ज्यूस किंवा इतर पेयेसुद्धा तितकीच धोकादायक आहेत, कारण त्यात दूषित पाण्यापासून बनविलेला बर्फ वापरला गेलेला असू शकतो.

- Advertisement -

स्वच्छतेच्या चांगल्या सवयींनी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे आणि ‘शौचानंतर हात धुणे’ आणि ‘जेवण बनविण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी हात धुणे’ या सवयींचे महत्त्व समाजाच्या मनावर बिंबवले पाहिजे.

उघड्यावर शौचास जाणे थांबवले पाहिजे म्हणजे पाण्याच्या स्त्रोतांवर परिणाम होणार नाही, यामुळे विष्ठेच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध होण्यास मदत होईल. केवळ उकळलेले किंवा निर्जंतुकीकरण केलेले पाणीच प्या.

हेपेटायटिस ई वरील उपचार :

लक्षणे दिसू लागल्याबरोबर लगेच डॉक्टरांची भेट घ्या. आपला वैद्यकीय पूर्वेतिहास सर्व तपशीलांनिशी सांगा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अलीकडच्या काळात कुठे प्रवास केला होता याचे तपशील द्या. हेपेटायटिसचे निदान करण्यासाठी रक्ताची तपासणी किंवा स्टूल टेस्ट करून घ्यायला सांगितले जाईल. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे, सांगितलेले पथ्यपाणी सांगितलेल्या मात्रेमध्ये घेतले जात आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवणे अत्यावश्यक आहे.

हेपेटायटिस ई गर्भवती महिलांसाठी किंवा रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक असू शकतो. यात आजारी मुले वा वयस्क व्यक्तींचा समावेश होतो. तेव्हा स्वच्छतेच्या चांगल्या सवयी पाळणे हे हेपेटायटिस ई आणि ए चा संसर्ग टाळण्याचा प्राथमिक उपाय आहे.

डॉ. अमित नाबर; क्रिटिकल केअर विभागाचे सल्लागार, एसएल रहेजा हॉस्पिटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -