चमचमीत हैद्राबादी मटण करी

Mumbai

अनेकदा आपल्याला चमचमीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी कोणता पदार्थ करावा असा प्रश्न पडत असेल तर या विकेंडला हैद्राबादी मटण करी हा नॉन व्हेज पदार्थ नक्की ट्राय करून पहा.

साहित्य

पाऊण किलो मटण, ४ कांदे, अर्धा कप किसलेला नारळ, १ चमचा खसखस, २-३ बडी वेलची, ५-६ हिरव्या वेलच्या, १ चक्रीफूल, ४-५ लवंगा, अर्धा चमचा जिरे, १ चमचा धने-जिरे पूड, १ चमचा बडीशेप, ५-६ सुक्या मिरच्या, २ चमचे आले-लसूण वाटून, मीठ.

कृती

कांदा चिरून घ्या. मटण नीट साफ करून  कुकरमध्ये २ मोठे चमचे तेल गरम करा. त्यात मोठी वेलची, हिरवी वेलची, लवंग आणि कांदा घालून एकत्र परता. त्यात मटण घालून दीड कप पाणी टाका. त्यानंतर कुकरचे झाकण लावून ५ दणदणीत शिट्टय़ा करून घ्या.

एका दुसऱ्या भांडय़ात १ चमचा तेल गरम करा. त्यात जिरे, धने, बडीशेप, मिरची, खसखस, खोबरे परतून घ्या. हे मिश्रण गार करून घ्या. त्यात पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या. मसाल्याचे वाटणही तयार झाल्यावर हे वाटण दुसऱ्या मोठय़ा भांड्यात घाला. या वाटणामध्ये मटण घालून पुन्हा १० मिनिटे शिजवून घ्या. वरून भरपूर कोथिंबीर घालून सजावट करा. भाताबरोबर ही हैद्राबादी मटण करी खाण्यास सर्व्ह करा.