गर्भाशयाचा कर्करोग (भाग- २)

पॅप स्मिअरच्या साह्याने सुरुवातीच्या टप्प्यातच गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्यास त्यातून बचावण्याची शक्यताही वाढते

Mumbai

स्त्रियांमधील गर्भाशयाचे कर्करोग याबद्दल काल अधिक जाणून घेतले. मात्र पॅप स्मिअर किंवा पॅप टेस्ट म्हणजे स्त्रियांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रकार आणि त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया…

पॅप स्मिअरचे प्रकार

चाचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानानुसार पॅप स्मिअरचे दोन प्रकार असतात – कन्व्हेंशनल (पारंपरिक) पॅप स्मिअर आणि लिक्विड बेस्ड सायटोलॉजी (थीन प्रेप/श्युअर पाथ). सामान्यत: लिक्विड बेस्ड सायटोलॉजी ही पद्धत वापरली जाते. ही पद्धत अधिक अचूक आहे आणि कर्करोगपूर्व बदलही टिपून संभाव्यता मांडणे यात अधिक चांगल्या प्रकारे शक्य होते.

ही चाचणी कधी सुचवली जाते?

२१ ते ६५ या वयोगटातील लैंगिकरित्या सक्रिय असलेल्या महिलेने दर ३ वर्षांनी पॅप स्मिअर चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. ३० किंवा त्याहून अधिक वय असलेल्या स्त्रियांनी दर पाच वर्षांनी पॅप चाचणी करून घ्यावी. यात एचपीव्हीसाठीही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस डीएनए) चाचणी समाविष्ट असावी. एचआयव्ही संसर्ग,केमोथेरपी किंवा दिर्घकाळासाठी स्टीयॉईड घेणाऱ्या स्त्रिया, अवयव रोपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे घेणे, आधी गर्भाशयाचा कर्करोग झालेला असल्यास किंवा पॅप स्मिअरमध्ये कर्करोगपूर्व पेशी आढळून आल्यास, धूम्रपान करणाऱ्या किंवा अनेक वर्ष संतती नियमनाच्या गोळ्या घेणाऱ्या, अनेक जोडीदारांशी लैंगिक संबंध असणाऱ्या अशा स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांनी वारंवार पॅप स्मिअर चाचणी करावी.

पॅप स्मिअरसाठी स्वत:ला करा असे तयार 

पॅप स्मिअरचे निदान अधिक अचूक यावेत यासाठी पॅप स्मिअर करण्यापूर्वी किमान २ ते ३ दिवस लैंगिक संबंध, योनीमार्गाला स्पर्श, योनीमार्गातून घेण्याची औषधे किंवा शुक्राणूनाषक जेलीचा वापर टाळावा. यामुळे, सामान्य नसलेल्या पेशीही निघून जातात. आपल्या मासिक पाळीच्या आसपासही पॅप स्मिअर करू नये. मात्र, गरोदर असताना पॅप स्मिअर करता येते. पॅप स्मिअरच्या वेळी योनीमार्गात काही अंशी त्रास आणि हलकासा रक्तस्राव होऊ शकतो. मात्र, चाचणीनंतर लगेचच तुम्ही दैनंदिन कामकाजाला लागू शकता.

स्त्रीने पॅप स्मिअर कधी करावी?

याआधीच्या पॅप स्मिअरचे निकाल नकारात्मक असतील किंवा गर्भाशयातील फायब्रॉईड्ससारख्या कारणांसाठी गर्भाशयाच्या मुखापासून संपूर्ण गर्भाशय काढून टाकलेले असल्यास ६५ व्या वर्षानंतर पॅप स्मिअर करण्याची आवश्यकता नाही.

पॅप स्मिअर चाचणीत असामान्य पेशी आढळून आल्यास डॉक्टर कोल्पोस्कोपी ही प्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. यामध्ये गर्भाशयाचे मुख, योनी आणि योनीच्या बाह्य भागातील काही ऊती खास दुर्बिणीसारख्या उपकरणातून (कोल्पोस्कोप) तपासले जातात. असामान्य वाटणाऱ्या भागातील काही ऊतींचे नमूनेही (बायोप्सी) डॉक्टर घेऊ शकतात. अचूक आणि ठोस निदानासाठी हे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातात. पॅप स्मिअर ही फक्त स्क्रीनिंग टेस्ट आहे आणि ती चुकीचीही असू शकते. त्यामुळे, पॅप स्मिअरमध्ये काही असामान्य आढळल्यास ठाम निदानासाठी पुढील चाचण्यांची आवश्यकता असते. त्यामुळेच, आधीच्या चाचण्यांमध्ये सामान्य निदान झाले असले तरी नियमित कालावधीने पुन्हा पुन्हा पॅप स्मिअर करण्याची गरज असते.

(डॉ. विना औरंगाबादवाला, स्त्री रोग तज्ज्ञ)