घरलाईफस्टाईलवाढते वजन दम्याला आमंत्रण - भाग १

वाढते वजन दम्याला आमंत्रण – भाग १

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) दमा हा एक दीर्घकालीन आजार असून, यात अनेकदा धाप लागते किंवा छातीत घरघरते. याचे गांभीर्य आणि वारंवारता व्यक्तीनुसार बदलते. हा आजार असलेल्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दर दिवशी किंवा आठवड्यातून अनेकदा दिसू शकतात आणि काही व्यक्तींना शारीरिक श्रम केल्यावर वा रात्री ही लक्षणे दिसून येतात. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार जगभरात २३.५ कोटी व्यक्ती दम्याने पीडित आहेत. दम्याचे निदान झाले नाही आणि वेळेवर उपचार झाले नाहीत तर त्या व्यक्तीवर आणि कुटुंबावर प्रचंड ताण येतो. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या दैनंदिन क्रियांवर मर्यादा येतात. त्यामुळे धाप लागणे, छाती आखडणे किंवा छातीमधील वेदना, खोकला किंवा घरघर, उच्छवास सोडताना छातीमध्ये घरघर होणे वा शिट्टीसारखा आवाज होणे (छातीमध्ये घरघर असणे हे मुलांना दमा असण्याचे सामान्यपणे आढळणारे लक्षण आहे) आणि सर्दी किंवा फ्लूसारख्या श्वासांच्या विषाणूमुळे येणारा खोकला वा उबळ या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. या लक्षणांकडे वेळेवर लक्ष द्या आणि वेळेवर उपचार करा. त्याचप्रमाणे स्थूलपणामुळे तुम्हाला दमा होण्याची शक्यता असते हे तुम्हाला माहीत आहे का? यासंदर्भात झालेल्या अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे की, दमा आणि स्थूलपणा यांचा परस्परसंबंध आहे.

वाढते वजन ठरतेय घातक

दमा हा एक दीर्घकालीन आजार आहे, ज्याची जगभरातील लाखो लोकांना लागण झालेली आहे. सुमारे ३० कोटी व्यक्ती दमेकरी आहेत आणि २०२५ सालापर्यंत या आकडेवारीत अजून १० कोटी रुग्णांची भर पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे स्थूलपणानेही अनेक व्यक्तींना ग्रासले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०१६ साली १.९ अब्जांहून अधिक प्रौढ म्हणजेच १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींचे वजन प्रमाणापेक्षा अधिक होते. यापैकी ६५ कोटी व्यक्ती स्थूल होत्या. २०१६ सालातील आकडेवारीनुसार १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींपैकी ३९ टक्के व्यक्तींचे वजन प्रमाणापेक्षा अधिक होते, तर १३ टक्के व्यक्ती स्थूल होत्या. याच आकडेवारीनुसार ५ वर्षांखालील ४.१ कोटी मुलांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक होते किंवा ती स्थूल होती. ५-१९ वयोगटातील ३.४० कोटी मुलांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक होते किंवा ती मुले स्थूल गटात मोडत होती. ही निश्चितच चिंता वाढविणारी आकडेवारी आहे. त्याचप्रमाणे स्थूलपणामुळे रक्तदाब वाढतो आणि धाप लागते तसेच परिणामी दम्याची लागण होऊ शकते. दमा होण्यासाठी स्थूलपणा हे महत्त्वाचे कारण आहे, असे अनेक संशोधनाअंती दिसून आले आहे.

- Advertisement -

डॉ.समीर गर्दे, छाती विकारतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -