घरलाईफस्टाईलभारताचा ग्रँड कॅनयन,भेडाघाट

भारताचा ग्रँड कॅनयन,भेडाघाट

Subscribe

मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वताच्या अंगाखांद्यावरून हिंदोळे घेत नर्मदा नदी प्रवास करत आहे.अमरकंटक येथे उगम पावल्यावर संथ, शांत लयीत वाहणारी ही नर्मदा भेडाघाट आल्यावर वेगळंच रूप धारण करते. नर्मदेवर असलेल्या घाटामध्ये ’भेडाघाट’ त्याच्या अद्वितीय लावण्यामुळे डोळे दिपवून टाकतो. चहुबाजुंनी उभे असलेले पांढरे शुभ्र डोंगर आणि नर्मदेचा शांत निळा प्रवाह आजही पर्यटकांना खुणावतो आहे.अद्भूत आणि चमकत्या संगमरवरी खडकांमधून वाहणारा फेसाळता नर्मदेचा प्रवाह डोळ्याचे पारणे फेडतो.

मध्यप्रदेशातील जबलपूरपासून २४ किमीवर भेडाघाट आहे. इथे नर्मदा नुसतीच जमिनीवरून वाहत नसून चक्क संगमरवराच्या अनेक पहाडांच्या किनार्‍याकिनार्‍याने वाहत जाते. इथे ?भृगु? ऋषींनी पार्वती देवीची (नर्मदेची) आराधना केली म्हणून नर्मदेच्या या घाटाला ?भेडाघाट? असे नाव पडले .इथे नर्मदेचं पात्र शांत असलं तरी काही ठिकाणी ६००-६५०फूट खोल आहे.भेडाघाटमध्ये नर्मदा नदीची शांत आणि विक्राळ अशी दोन्ही रूपं पाहायला मिळतात. ही नदी इथे धबधब्याच्या रूपाने ५० फूट खोल कोसळते आणि मार्बल रॉक म्हणजे संगमरवराच्या डोंगरांमधून नीरव वाहते. धबधब्यात फेसाळत कोसळल्यावर नर्मदा पुन्हा शांत होते.धबधबा ओलांडून पलीकडच्या काठावर जाण्यासाठी अलीकडे तिथे रोप-वेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

या प्रवाहात नौकाविहारही करता येतो आणि अगदी थोडक्या पैशात नावाडी नर्मदा प्रवाहातून ही सैर घडवितात.संगमरवरी पहाडांच्या किनार्‍याकिनार्‍याने नौका जात असतात. कित्येकदा अत्यंत अरुंद चिंचोळ्या मार्गांतून मार्गक्रमण होत असते. सततच्या हवापाण्याच्या मार्‍यामुळे या संगमरवरी पहाडांमध्ये दगडांचे निरनिराळे आकार बनतात.पर्यटकांसाठी तेच मोठं आकर्षण असतं. इथे काळा, पांढरा, गुलाबी असे विविध रंगांचे संगमरवरी दगड दिसतात. रंगीबेरंगी संगमरवरी डोंगरातून नदीची सैर करणे हा अद्भुत अनुभव असतो. नाविक पर्यटकांना होडीत बसवून प्रत्येक ठिकाणाची वैशिष्टयपूर्ण अशी माहिती देतात.

- Advertisement -

उंच चमकत्या संगमरवरी खडकातून वेगाने सुसाट वाहणारी नर्मदा कांही काळ हृदयाचा ठोका चुकवते. कोवळ्या सूर्यप्रकाशात हे दृष्य अधिकच देखणे दिसतेच पण नितळ चंद्रप्रकाशात त्याची शोभा वर्णन करणे शब्दांपलिकडचे आहे. चंद्रप्रकाशाची अशी कांही जादू या संगमरवरी खडकांवर होते की हे खडक म्हणजे स्वप्ननगरीतील डोंगर भासतात. मनाला शांतता आणि डोळ्याची तृप्ती करणारे हे दृष्य पाहण्यासाठी पौणिेमेच्या जवळ पर्यटकांची एकच गर्दी होते.

भेडाघाटमधलं आणखी एक बघण्यासारखं ठिकाण म्हणजे इथलं चौसष्ठ योगिनी मंदिर. या मंदिरात योगिनी म्हणजे योगाच्या वेगवेगळ्या अवस्थेत असलेल्या स्त्रीप्रतिमा आहेत. तिथलं चौसष्ठ योगिनी मंदिर पुरातत्त्व महिमाही अधोरेखित करणारं आहे.
भेडाघाटमध्ये फिरताना संगमरवराच्या वस्तूंची विक्री करणारी अनेक लहानमोठी दुकानं दिसतात. परंतु, गंमत अशी की, इथे संगरवराचे डोंगर असले तरी इथे संगमरवराचं उत्पादन होत नाही. त्यामुळे या वस्तू इथे बनत नाहीत.

- Advertisement -

-विवेक तवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -