नूडल्ससाठी मुलांना नाही म्हणू नका, द्या हे पौष्टिक नूडल्स

आता घरच्या घरी नूडल्स तयार करून मुलांचा हा हट्ट नक्कीच पुरवता येऊ शकतो.

Mumbai

सध्या मुलांच्या आवडी-निवडी वरून पालकांना त्यांना कोणते पदार्थ खायला द्यावे, असा प्रश्न सतत पडत असतो. त्यात पालेभाज्या नको, हेच हवं ते नकोच. अशावेळी मुलं अधिक नूडल्स हवे असा हट्ट पालकांकडे करतात. नूडल्स आरोग्यासाठी चांगली नसतात. त्यामुळे पालक मुलांना नूडल्स देणं टाळतात. परंतु आता मुलांना नूडल्ससाठी नाही म्हणू नका. कारण आता घरच्या घरी नूडल्स तयार करून मुलांचा हा हट्ट नक्कीच पुरवता येऊ शकतो. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. म्हणून हवे त्यांना नूडल्स खायला देऊ शकतात.

असे बनवा ज्वारीच्या पिठाचे नूडल्स

साहित्य
ज्वारीचे पीठ १ वाटी , हिंग – एक चिमूट, मीठ- गरजेनुसार, आलं लसूण पेस्ट २ चमचे, तेल ३ चमचे, मोहरी जिरे १ चमचा, हळद १/२ चमचा, कढीपत्ता १०-१२ पाने, कांदा बारीक कापलेला १, टोमॅटो बारीक कापलेला १ (आवडीनुसार भाज्या- गाजर, मटार, हिरवी शिमला मिरची), टोमॅटो सॉस २ चमचे, कोथिंबीर- सजावटीसाठी

कृती

  • सर्वप्रथम ज्वारीच्या पिठात १ चमचा तिखट, चिमूटभर हिंग, मीठ आणि १ चमचा तेल टाकून चकली च्या पिठाप्रमाणे मळुन घ्यावे. चकलीच्या सोऱ्यात मोठ्या शेवची डिश टाकून ज्वारीचे पीठ त्यात भरावे.
  • वाफावण्याचे पात्र असेल तर त्याच्या डिश ला तेल लावून घ्यावे आणि पात्रात पाणी उकळायला ठेवावे.
  • पात्र नसेल तर कढई मध्ये पाणी उकळायला ठेवावे आणि त्यात खाली स्टॅण्ड ठेवावे आणि एका डिश ला तेल लावून घ्यावे .
  • डिश मध्ये सोऱ्याने शेव पसरून घालावी. आणि झाकण ठेवून १० मिनिटे वाफवून घ्यावी. वाफवून होईपर्यंत नूडल्स साठी फोडणी करून घ्यावी.
  • एका कढई मध्ये २ चमचे तेल गरम करून त्यात जिरे मोहरी, कडीपत्ता,कांदा, आले लसूण पेस्ट,टाकावे. कांदा परतला कि त्यात टोमॅटो टाकून परतून घ्यावा.
  • आवडीनुसार वर सामग्रीमध्ये दिलेल्या आणखी भाज्या घालू शकता. भाज्या परतून झाल्या की त्यात टोमॅटो सॉस आणि मीठ घालावे आणि ज्वारीचे वाफलेले नूडल्स टाकावे. ५-७ मिनिटे वाफवून घेऊन कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
  • ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळी नाष्टा म्हणून ही डिश उत्तम आहे..अगदी पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here