घरलाईफस्टाईलकसारा : नाशिक-मुंबईमधील दुवा

कसारा : नाशिक-मुंबईमधील दुवा

Subscribe

मुंबईपासून कसारापर्यंत लोकल धावतच आहे. मात्र नाशिकहून कसारापर्यंत लोकल धावली तर कसारा हे येणार्‍या काळात मध्यवर्ती ठिकाण म्हणून उदयास येईल. मुंबई व नाशिकला जोडणारा दुवा म्हणून कसारा आता विकासकांना खूणावू लागला आहे. म्हणूनच शहरातील मोठमोठ्या विकासकांनी या ठिकाणी आपले बस्तान मांडायला सुरुवात केली आहे. येणार्‍या काळात या शहराचे झपाट्याने नागरिकीकरण होणार आहे. कल्याणच्या पुढे शहाड, आंबीवली परिसरात नागरिकीकरण विस्तारले आहे. अनेक मोठ्या बिल्डरांचे प्रोजेक्ट तिथे आकार घेत आहेत. मात्र हाही परिसर हळूहळू पुढे पुढे सरकू लागला आहे. त्याचे विस्तारीकरण थेट कसारापर्यंत होत आहे. या विस्तारीकरणामुळे हा परिसर प्रदूषित मुंबई किंवा बकाल शहर व्हायला नको. तिथे एक सुंदर, स्वच्छ आणि निसर्गरम्य शहर वसावे याकरिता टॉवनलॅन्ड कन्सल्टन्ट कंपनीच्या माध्यमातून कसाराचे नियोजन करण्यात येत आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांचे विस्तारीकरण ही अत्यंत आवश्यक आणि तातडीची बाब झाली आहे. सागरीबेटावर वसलेली मुंबई नगरी औद्योगिक झाल्यामुळे तिच्यावर प्रचंड भार वाढला. तो भार तिला लागून असलेल्या ठाण्याकडे विस्तारला. मात्र ठाणेही कमी पडू लागले, मग नवी मुंबईसारखे नवीन शहर निर्माण करावे लागले. नवी मुंबईतही आता जागेची कमतरता भासू लागली आहे. तेव्हा आहे त्या मेट्रोपोलीस शहरांना स्मार्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र हा प्रयत्न किती यशस्वी होईल हे येणारा काळच ठरवेल. पण एवढे मात्र निश्चित की जुन्या शहरांना नवीन आकार देताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र संपूर्ण शहरच नवीन वसवताना ते सहज शक्य होते. यामुळेच की काय आता कर्जतपासून कसार्‍यापर्यंतच्या संपूर्ण पट्ट्याचे शहरीकरण करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे. या ठिकाणी तिसरी मुंबई साकारण्याचे धोरण आखले जात असून त्यासाठीच कर्जतपर्यंत असणारी लोकल खोपटपर्यंत नेली आणि आता नाशिक ते कसारा लोकलची पाहणी करण्यात येत आहे.

परवडणारी घरे आणि असलेल्या छोट्या छोट्या वाड्या-पाड्यांची सुधारणा करणे, त्यांचे पुनर्वसन करणे, अनेक सामुदायिक विकासासाठी जागतिक बँक आणि खासगी क्षेत्राकडून या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी या कंपनीने आपले लक्ष कसाराकडे केंद्रित केले आहे. वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे नवीन शहरे आणि शहरांचे मास्टर प्लॅनिंग करणे ही फार गंभीर बाब आहे. कारण त्यांच्या निर्मितीचे परिणाम अत्यंत दूरगामी असतात. याचा विचार करूनच कसारा शहराचे डिझाइन करण्याचे काम होत आहे. शहरी वातावरण, स्थानिक नागरिकांची सांस्कृतिक ठेवण, त्याचबरोबर राहण्यायोग्यता, सुरक्षितता आणि आधुनिकता यांचे सार्वभौमिक गुणधर्मांबद्दल अधिक माहिती घेऊन या नवीन शहर निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागत आहे. प्रत्येक वस्तीला पाणी, वीज, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन आणि रस्ते पुरवण्याची जबाबदारी तसेच सर्वसामान्य नागरिकांपासून ते अति उच्चभ्रू वर्गापर्यंतच्या लोकांना सामावून घेण्याचे काम या माध्यमातून केले जाणार आहे. आज मुंबई आणि आजूबाजूच्या मेट्रोपोलीस शहरामधून वाढणारे प्रदूषण त्यामुळे होणारी घुसमट या सर्वांच्या पलिकडे जाऊन या शहरामध्ये नैसर्गिक वातावरणाला बाधा येणार नाही आणि प्रत्येक नागरिकाला स्वच्छ हवा, पाणी मिळेल अशा पद्धतीने या शहराची आखणी करण्यासाठी अनेक विकासक हातभार लावत आहेत.

- Advertisement -

मानवाच्या इतिहासात शहरे ही पाण्याच्या स्त्रोताजवळ वसली. आजची शहरे ही कुठल्यातरी व्यवसाय आणि उद्योगावर आधारित आहेत, मग ते शेती असो की कुठला तरी व्यवसाय वा व्यापार. म्हणूनच प्रत्येक वस्तीचे स्वत:चे अर्थकारण चालवण्यासाठीचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. हे नियोजन आणि डिझाइन करण्याचे उद्दिष्ट करताना आजूबाजूला असणार्‍या परिस्थितीचाही विचार होणे गरजेचे असते. सार्वजनिक वाहतूक आणि इतर वाहतुकीसाठी स्थानिक व पायाभूत टिकाऊ उपाययोजना काळजीपूर्वक नागरी फॅब्रिकमध्ये एकत्रित करून येथील नवनवीन प्रकल्प मार्गी लागत आहेत. मात्र हे सर्व करत असताना गर्भश्रीमंतांसह येथील सर्वसामान्य व्यक्तीलाही केंद्रस्थानी ठेवून या शहराची निर्मिती करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक विकासक आग्रही आहेत. त्यातूनच या शहराची निर्मिती होत आहे.

ज्यांना हिलस्टेशनमध्ये घर घेणे परवडत नाही त्यांनी आता कसारा परिसरात गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही. विकेन्डचा ट्रेन्ड सध्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आठवडाभर शहरातील प्रवासाला आणि एकंदर प्रदूषित वातावरणाला कंटाळून विकेन्डला कुठेतरी शांत ठिकाणी आराम करण्याचे प्रयोजन करणार्‍यांकरिता या ठिकाणी स्वतंत्र प्लॉटही विक्रीस उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर हे प्लॉट एकट्याने अथवा सामूहिक पद्धतीनेही विकास करण्याच्या योजनाही कार्यान्वित आहेत. ज्याचा फायदा आज शहरातील अनेक बडी मंडळी घेत आहेत. म्हणूनच आज कसारा येथे जमिनीचे भावही गगनाला भिडत चालले आहेत. मेट्रोपोलीस सिटीमध्ये आता जागा उरली नसल्याने अनेक विकासकांसोबत वित्त पुरवठा कंपन्यांनी कसारामध्ये आपले बस्तान जमवले आहे. अल्पावधीतच हे शहर मेट्रोपोलीस शहरांच्या यादीत समाविष्ट होईल. नाशिक ते कसारा ट्रेनचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास या शहराचा कायापालट अतिशय जलदगतीने होईल. मात्र त्याआधीच गुंतवणूक करून आपली मालमत्ता सुरक्षित करण्यास काय हरकत आहे.

- Advertisement -

नवनवीन गृहप्रकल्प निर्माणाधीन
भविष्यात कसारा हे परिपूर्ण आकर्षक शहर म्हणून गणले जाणार असल्याने कसारा परिसरात अनेक मोठमोठ्या विकासकांनी आपली गृहसंकुले उभारून सर्वसामान्यांना आकर्षित करायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये किंग कॅसल, ऑरेंज सिटी-विला, रॉयल ब्लूज कॉस्मिक पॅराडाईज, दिषा डायरेक्ट लँडमार हिल, अमन सिटी, एमजीएलआय सन सिटी अशी नावे प्रामुख्याने घेता येईल. यामध्ये सर्वसामान्य पगारदारांपासून ते उच्च श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच परवडतील अशा घरांची, फ्लॅटची निर्मिती करण्यात येत आहे. लोकांना किमान राहणीमान राखण्यासाठीच्या दर्जेदार सोयी तसेच पुरेशी ऐसपैस ज्याच्या-त्याच्या खिशाला परवडतील अशा प्रत्येक प्रकारची अधिकृत घरांची निर्मितीवर भर दिला जात आहे.

३० लाखांपासून घरे उपलब्ध
सर्व नागरिकांना शहरातल्या शहरात सुरक्षित संचार करण्यासाठी सोपी व परवडणारी रोजच्या जीवनासाठी लागणार्‍या सोयीसुविधांनी युक्त इतकेच नव्हे तर लहान मुलांना, महिलांना, ज्येष्ठांना घराबाहेर पडताना सुरक्षित वाटावे अशा अनेक बाबींनी युक्त अशी संकुले निर्माण होत आहेत. 30 लाखांपासून ते अगदी कोटीपर्यंत या परिसरात आता घर घेणे शक्य झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -