घरलाईफस्टाईलवयाप्रमाणे आहार संतुलित ठेवा

वयाप्रमाणे आहार संतुलित ठेवा

Subscribe

प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती ही वाढत्या वयानुसार कमी होत जाते. अनेकांना दाताच्या प्रॉब्लेम्समुळे अन्न चावता येत नाही, याच दरम्यान जर व्यायामाचा अभाव असेल तर अपचनाचे विकार चालू होतात. वयोमानानुसार आतड्याची हालचालही मंदावते. त्यामुळे पोषक आहाराचे आतड्याकडून शोषण होत नाही. त्याचबरोबर अनेक लोकांना पैशांअभावी पोषक आहार खरेदी करता येत नाही. परंतु जसजसे वय वाढत जाते तसतसे व्यक्तीला लागणार्‍या कॅलरीज कमी होत जातात. ५० वर्षे असलेल्या व्यक्तीला १८०० कॅलरीज रोज लागत असतील तर ७० व्या वर्षी त्याच माणसाला १४४० कॅलरीज एका दिवशी पुरेशा असतात. परंतु ज्या व्यक्ती आपल्या वयाप्रमाणे आपला आहार संतुलित आणि कमी करत नाहीत त्यांना जास्त वजन, हृदयविकार, मधुमेह, संधीवात यासारखे आजार होऊ शकतात.

वाढत्या वयानुसार प्रत्येक व्यक्तीला हाडांची होणारी झीज आणि संधीवात होऊ नये म्हणून कॅल्शियमची गरज असते. त्याचबरोबर कॅल्शियम शोषून घेण्यासाठी व्हिटॅमीन डी लागते. व्हिटॅमीन बी 12 हे रक्तपेशी आणि मज्जातंतुचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी झिंकचा उपयोग होतो. हाय ब्लडप्रेशर असणार्‍या व्यक्तींना पोटॅशियमची गरज असते. फॉलिक अ‍ॅसिड आणि बी व्हिटॅमीनची गरज हृदयविकार असलेल्यांना जास्त असते. अर्थात या सर्व घटकांचे शोषण आहारातून नाही झाले तर अनेक विकार होऊशकतात.

- Advertisement -

वाढत्या वयाबरोबर योग्य, संतुलित आहाराबरोबरच ताणतणाव, हार्मोन्स, चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे महत्त्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात ज्येष्ठांनी आपल्या विचारात आणि आहारात थोडा लवचिकपणा आणला तर ताणतणावचे कारण राहणार नाही. तसेच प्रत्येक सामाजिक ठिकाणी ज्येष्ठांचा विचार केला जावा यासाठी प्रत्येकाने आग्रह धरला पाहिजे.

संतुलित आहारासाठी जेवणात विविध रंगांच्या भाज्या असाव्यात. मीठाऐवजी लवंग, काळीमीरी वापरावी. जेवण जास्त चवदार होते. फळे खरेदी करताना शक्यतो ती गडद रंगांची असावीत. दिवसातून 6ते 8ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. अनेक लोक हे टाळतात. त्यामुळे त्यांना बध्दकोष्ठ होऊ शकतो. जर दातांची अवस्था योग्य नसेल तर मऊ अन्न , पातळ पालेभाज्या घ्याव्यात. रोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा. संतुलित आहारबरोबरच आपल्या वयाप्रमाणे आहार थोडा कमी करावा. जड आहार घेऊ नये. योग्य प्रमाणात संतुलित आहार , रोज किमान अर्धा तास चालणे , जीवन जगण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर वाढत्या वयाबरोबरच आरोग्यदायी जीवन जगताना ‘आरोग्यम धनसंपदा’ याचा अनुभव येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -