घरलाईफस्टाईलतीर्थरूप आईबाबा

तीर्थरूप आईबाबा

Subscribe

आयुष्याच्या ह्या वळणावर मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आईबाबांनी केलेला त्यांचा ‘संसार’ आठवतो आणि गतकाळातील सर्वकाही डोळ्यांसमोर उभं राहतं.

माझ्या आयुष्यावर माझ्या आईबाबांचा सर्वाधिक प्रभाव आहे. त्याला कारणेही तशीच आहेत.मुंबईच्या पोलीस दलात कार्यरत असताना बाबांनी मुंबईच्या कुलाबा, अंधेरी आदी एकूण नऊ पोलीस ठाण्यांत काम केले. पदरी सात मुलं असं नऊ जणांचं भलं मोठं कुटुंब. शिवाय जोडीला अधूनमधून शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने गावाकडून राहायला येणारी मामे-मावस भावंडं, वैद्यकीय उपचारांसाठी गावाकडून येणारे नातेवाईक, आईबाबांच्या सुस्वभावामुळे येणारे जाणारे अगणित पै-पाहुणे ह्या सर्वांचा पाहुणचार त्यांनी कसा केला असेल ते देवच जाणे! आयुष्याच्या ह्या वळणावर मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आईबाबांनी केलेला त्यांचा ‘संसार’ आठवतो आणि गतकाळातील सर्वकाही डोळ्यांसमोर उभं राहतं. विशेष म्हणजे तो काळही असा होता की एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी बदली झाली रे झाली की सर्व गाशा गुंडाळून पोलीस लाईनमधले घर सोडून मुंबईतल्या मुंबईत नवीन ठिकाणच्या घरात वास्तव्यास जायला लागायचे.

घराचा पत्ता बदलायचा, आम्हा सर्व भावंडांच्या शाळा बदलायच्या, शेजारी, मित्रमंडळी सर्व काही बदलून जायचं. आश्चर्य एका गोष्टीचं होतं की आम्ही सर्व भावंडं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या शाळेत जायचो. आई तर इतके कष्ट उपसायची की तिला जरासुद्धा उसंत लाभायची नाही. बाबांची सतत ड्युटी असायची. आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण तरीही त्यांनी आम्हा भावंडांना काहीच कमी पडू दिलं नाही.आमचं बालपण खूपच मजेत गेलं.

- Advertisement -

बाबांच्या सततच्या ड्युटीमुळे आम्हा सर्व भावंडांवर मोठा भाऊ अशोकदादाची ‘नजर’ असायची. अभ्यास एके अभ्यास. खेळ एके खेळ. दररोज पाढे पाठ करणे, सुंदर वळणदार हस्ताक्षरासाठी शुद्ध लेखन, अशा सर्व गोष्टींचा तो पिच्छा पुरवायचा. थोडं जरी इकडे तिकडे झालं तर कोणतीही गय नाही. त्यामुळे शिक्षणाच्या आघाडीवर आम्ही खर्‍या अर्थाने ‘आघाडीवर’ होतो. आम्हा भावंडांच्या जडणघडणीत त्याचाही मोठा वाटा होता. यथावकाश सर्व भावंडं उच्च शिक्षित झाली.आयुष्यात स्थिरस्थावर झाली. काळाच्या ओघात आईबाबा हे जग सोडून गेले आणि आमचं मातृ-पितृछत्र हरपलं.आम्हा भावंडांवर सुसंस्कार करून आमचे आयुष्य घडवणार्‍या आमच्या तीर्थरूप आईबाबांना शिरसाष्टांग नमस्कार!

– प्रदीप शंकर मोरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -