घरलाईफस्टाईलअफोर्डेबल घरांसाठी नाशिक उत्तम पर्याय

अफोर्डेबल घरांसाठी नाशिक उत्तम पर्याय

Subscribe

महानगरांतल्या घरांच्या चढ्या किमतींमुळे त्यांच्याजवळच्या छोट्या शहरांचं महत्त्व वाढत आहे. कारण घर घेण्यासाठी साहजिकच लोक अशा ठिकाणांना पसंती देतात. शिवाय अशा ठिकाणी गुंतवणूक केल्याने भविष्यात चांगला परतावादेखील मिळू शकतो. याच अनुषंगाने ऑर्फडेबल घरासाठी मुंबईकरांना नाशिक हा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.

निवारा ही खरंतर माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक. परंतु जागांचे दिवसेंदिवस वाढणारे भाव पाहता, ही गरज कशी भागवायची हाच खरा प्रश्न आहे. शासकीय यंत्रणांनीदेखील या प्रश्नाची दखल घेतली आहे. यातूनच अफोर्डेबल हाऊसिंगचा म्हणजेच स्वस्त किंवा परवडणार्‍या दरातल्या घरांचा पर्याय समोर आला. पंतप्रधानांनी ‘2022 पर्यंत सर्वांसाठी घर’ या उद्दिष्टाने ‘प्रधानमंत्री आवास योजना’देखील जाहीर केली आहे. अफोर्डेबल हाऊसिंगचा विचार केला तर त्यातला अफोर्डेबल हा शब्द व्यक्तीसापेक्ष आहे. काहींना 15 लाखाचं घर हे महाग वाटू शकतं तर काहींना 50 लाखांचं घरही परवडू शकतं. ही गोष्ट खरी असली तरी सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार केला तर 20 ते 40 लाखांत मिळणारं घर हे अफोर्डेबल होम असू शकतं, असं मानायला हरकत नाही. आता या किमतींचा विचार केला तर मुंबई, ठाण्यासारखी शहरं आपोआपच बाद होतात. खरंतर चांगली जीवनशैली आणि नोकरीची संधी या प्रमुख कारणांमुळे शहरातल्या घरांना मागणी अधिक असते. परंतु महत्त्वाची महानगरं जास्त किमतींमुळे बाद झाल्यावर त्यांच्या जवळ असणार्‍या छोट्या शहरांचं महत्त्व वाढतं. कारण घर घेण्यासाठी साहजिकच लोक अशा ठिकाणांना पसंती देतात. शिवाय अशा ठिकाणी गुंतवणूक केल्याने भविष्यात चांगला परतावादेखील मिळू शकतो.

- Advertisement -

मुंबईपासून अवघ्या 185 किलोमीटरवर असलेलं नाशिक हे झपाट्याने विकसित होत आहे. मुंबईशी असलेली कनेक्टिव्हिटी आणि गृहप्रकल्पांच्या परवडणार्‍या किमती लक्षात घेता मुंबईकरांची गुंतवणुकीसाठी चांगली पसंती मिळत आहे. हे शहर पूर्णपणे विकसित झालं नसल्यामुळे बांधकाम चालू असलेल्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा सल्ला बांधकाम क्षेत्रातले तज्ज्ञ देतात. जेणेकरून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत आजूबाजूचा परिसर विकसित होईल.

सद्य:स्थितीत नाशिक शहरात नवीन गृहप्रकल्पांना सामावून घेण्यासाठी अत्यंत कमी जागा शिल्लक असल्या तरी बडे गृहप्रकल्प हे शहरालगतच्या गंगापूर, गिरणारे, म्हसरूळ, आडगाव, पाथर्डी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या ठिकाणी साकारताना दिसत आहेत. अगदी दोनशे ते चारशे सदनिकांचा समावेश असणार्‍या टाऊनशिप्सपर्यंत त्यांचे स्वरूप विस्तारले आहे. त्यामुळे शहराजवळील असा कोणताच भाग बाकी नाही की त्या भागात नवीन गृहनिर्माण प्रकल्पांचा पाया खोदला गेलेला नाही. चुंचाळे, श्रमिकनगर यांसारख्या कामगार वस्तीच्या भागात 2200 रुपये स्क्वेअर फुटापासून दर सुरू होतात. परंतु गुंतवणुकीचा योग्य मोबदला मिळावा या दृष्टीने विचार करणार्‍यांपुढे शहरांबाहेरील गृह संकुलांचाही पर्याय आता उपलब्ध आहे. शिक्षणाच्या सुविधा, मनोरंजनाची साधने, असे सर्व काही नाशिकमध्ये उपलब्ध असल्याने मुंबई, पुण्याचे अनेक जण नाशिकमध्ये घर आणि जागेत गुंतवणूक करू लागले आहेत.

- Advertisement -

अशा संकुलांमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही ही संकल्पना रुजू लागल्याने अनेकांचा ओढा या संकुलांमध्ये घर घेण्याकडे आहे. जिम्नॅशियमपासून स्विमिंग पूलपर्यंत, मंदिरापासून ध्यानापर्यंत असे सबकुछ अशा संकुलांमध्ये मिळत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही अशा संकुलांमध्ये पुरेशी व्यवस्था करण्यात येत असल्याने नोकरदारांकडून त्यांना प्राधान्य मिळत आहे. विशेष म्हणजे घरासाठी गुंतवणूक करताना बहुतांशजण आपआपल्या गावाकडे जाणार्‍या रस्त्याजवळील घरांना प्राधान्य देताना दिसतात. उदा. धुळे, जळगाव, मालेगाव, चांदवड, सटाणा या भागातील मंडळी पंचवटीत महामार्गालगतच्या घरांमध्ये तर, मुंबई, पुण्याकडील मंडळींची संख्या पाथर्डी, इंदिरानगर या भागात अधिक गुंतवणूक करताना दिसतात.

शहर लहान असो वा मोठं, व्यावसायिक उलाढाल झाली की त्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यावसायिक गुंतवणूक झाली की त्या परिसरात सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा विकसित होऊ लागतात. करोडो रुपयांची गुंतवणूक केलेल्या बड्या कंपन्या रोजगार निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण अशा कंपन्या मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध करतात. त्यामुळे या कंपन्यांवर अवलंबून असणारा नोकरदारवर्गदेखील संख्येने मोठा असतो. हा नोकरदारवर्ग मग अशा कंपन्या असलेल्या आसपासच्या परिसरातच घरं विकत घेण्यास प्राधान्य देतो. त्यामुळे गृहप्रकल्पांचे नवनवे पर्याय अशा परिसरात तयार होतात. घरात गुंतवणूक करण्याठी सकारात्मक वातावरण तयार होतं. परिणामी या भागात गृहप्रकल्पांची संख्या वाढते. वस्ती वाढल्याने त्याला अनुसरून आवश्यक पायाभूत आणि अन्य सुविधांचाही विकास होतो. नाशिकच्या बाबतीतही अगदी असंच होत आहे.

नाशिकमध्ये गुंतवणूक करणारे साधारणत: काय विचार करतात तेही बघायला हवे. सुटीत राहण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणी घर हवे म्हणून येथील गुंतवणूक वाढली आहे. पिकनिक, निसर्गाच्या सान्निध्यात राहायची हौस पुरवण्यासाठी देखील लोक नाशिकचीच निवड करतात. असंख्य सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी उतारवयात या निसर्गरम्य शहरात किंवा आजूबाजूच्या शांत परिसरात वास्तव्यासाठी येतात. शहरात वाढलेल्या शिक्षण संस्था, मुबलक हॉस्पिटल्स, मॉल्स, औद्योगिक विकास या बाबीही गुंतवणूक वाढीसाठी पोषक ठरत आहेत.

– निलेश चव्हाण, (लेखक प्रसिध्द वास्तुविशारद आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -