नवरात्रीचे उपवास करताना अशी घ्या ‘आरोग्याची काळजी’

नवरात्रीचे उपवास करताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या.

Mumbai
navratri foods items to eat during fasting in navratri festival 2019
नवरात्रीचे उपवास करताना अशी घ्या आरोग्याची काळजी

नवरात्रौत्सव अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता सर्व ठिकाणी नवरात्रीची लगबग पाहायला मिळत आहे. नवरात्रीत बरेच जण भक्तिभावाने उपवास करतात. पण शरीराला कष्ट देऊन हे उपवास केले जात असल्याने अशक्तपणा येणे, चक्कर येणे, तोंडाला कोरड पडणे अशा समस्या उद्भवतात. यामुळे आरोग्य धोक्यात येते. मात्र, जर व्यवस्थित पद्धतीने उपवासाचा आहार घेऊन उपवास केल्यास आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते.

नवरात्रीचा उपवास करताना अनेकदा सांगितले जाते कि, दिवसभर काहीच खायचे नाही किंवा उपवासाचे पदार्थ हे एकदाच खायचे. मात्र, तसे न खाता उपवासाचे पदार्थ हे ५ ते ६ वेळा अगदी थोडे थोडे खावे. यामुळे थकवा येत नाही आणि पोट देखील भरलेले राहते.

काही व्यक्ती नऊ दिवस निर्जळी उपवास करतात. अशा व्यक्तींनी तासातासाला पेलाभर पाणी, लिंबू सरबत, शहाळे, ग्रीन टी, ताक याचे सेवन करावे. यामुळे दिवसातून जर २ लिटर द्रव पदार्थ घेतल्यास चक्कर येणे, तोंडाला कोरड पडणे असे त्रास होत नाहीत.

उपवासात तळलेले पदार्थ खाणे टाळावे. त्याऐवजी उकडलेल्या पदार्थांचे सेवन करावे. अनेकदा उपवासाला तेलकट बटाट्याचे वेफर्स, चिवडा, केळा वेफर्स खाल्ले जातात. यामुळे डोके दुखी होते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळून त्याजागी उकडलेल्या बटाट्याचा किस, उकडलेले रताळे खावे. हे शरीरासाठी देखील तितकेच फायदेशीर ठरते.

राजगिरा हा उपवासाला चालणारा एक चांगला पदार्थ आहे. तसेच त्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात. त्याची दुधामध्ये खीर किंवा लापशी बनवून खावी. यामुळे ताकद येते.

बऱ्याच व्यक्तींना गोड खाण्याची चटक असते. त्यांनी जिभेला थोडा आवर घालून खजूर, सफरचंद, केळी यांसारखी फळे, भगर, राजगिरा, साबुदाणा यांच्या खिरी खाव्यात.

भगर ही नवरात्रीच्या आहारातली महत्वाची गोष्ट म्हणून मानली जाते. भाताप्रमाणे ती बनवून खाता येते, तिची खीरसुद्धा करून खावी. हवे असल्यास आवडीच्या भाजीसमवेत खायला हरकत नसते.

पदार्थांना गोड चव यावी याकरिता साखर वापरण्याऐवजी गूळ किंवा मध वापरावा. केळी, घोसाळी, साबुदाणा, रताळे, राजगिरा यांचे विविध पदार्थ करून खावेत.

शिंगाड्याचे पीठ उपवासाला चालते. त्यात ७५ टक्के पिष्टमय पदार्थ आणि २० टक्के प्रथिने असतात. तेलाने माखलेल्या पुऱ्या खाण्याऐवजी या पिठाच्या पोळ्या बनवून खाल्ल्यास आरोग्याला त्या उत्तम असतात.

तसेच ज्यावेळी भूक लागते अशावेळी काकडी, फळांचे तुकडे, सलाड खाण्यावर भर द्यावा. यामुळे ताकद येते आणि थकवा दूर होतो.

अनेकदा दुपारच्या वेळेस आणि रिकाम्या वेळी काहीतरी खावेसे वाटते. अशावेळी मनुका, खजूर, अक्रोड, बदाम खावे.