आता गोव्याला जायचं आलिशान क्रूझने!

Mumbai to Goa
मुंबई टू गोवा क्रूझ

 

आजूबाजूला फक्त निळाशार समुद्र…आपल्या आवडत्या माणसाची साथ…समुद्राची सफर आणि आलिशान क्रूझ! स्वप्न वाटतंय का? खरं तर हे प्रत्येकाचंच स्वप्न! पण हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. खरंतर क्रूझवरून सफर हे सामान्य लोकांना परवडणारं स्वप्नं आहे का? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पण आता हे सत्यात उतरत आहे.
मुंबई ते गोवा ही सफर आता आलिशान क्रूझनं करता येणार आहे. यापूर्वी ट्रेन आणि विमानाने जाऊन गोव्याचा आनंद बऱ्याच लोकांना लुटला आहे. पण गोवा म्हटलं की सगळ्यात आधी समोर येतो तो समुद्र. आणि त्याचीच मजा या क्रूझमुळे पर्यटकांना घेता येणार आहे. मुंबईकरांना हा अनुभव मिळावा त्यासाठी बुधवारी या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. गोव्याला जाऊन मजा घेणाऱ्या लोकांना आता अजून एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

कशी असेल ही क्रूझ?

या क्रूझचं नाव आंग्रिया असं असून सी इगल कंपनी आणि मुंबई पोर्ट यांनी ही सेवा सुरु केली आहे. क्रूझवर ८ रेस्टॉरंट्स, कॉफी शॉप, स्विमिंग पूल, क्लब्स या गोष्टींचा समावेश आहे. मुंबईतील भाऊचा धक्का इथून रोज संध्याकाळी ५ वाजता ही क्रूझ गोव्यासाठी रवाना होईल. दिघी, दाभोळ, रत्नागिरीतील जयगड, विजयदुर्ग, देवगड, पणजी असे थांबे घेत दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता गोव्यामध्ये ही क्रूझ दाखल होईल. प्रत्येक प्रवाशासाठी ७५०० रुपये तिकीट असून यामध्ये ब्रेकफास्ट, मिल आणि रिफ्रेशमेंट्सची सोय करण्यात आली आहे.

क्रूझचं नाव आंग्रियाच का?

कान्होजी आंग्रे हे शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते. कान्होजींनी नेहमीच प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्राच्या सागरी सीमांचं रक्षण केलं. त्यांच्या नावावरूनच महाराष्ट्र आणि गोव्याच्या सागरी प्रदेशादरम्यानच्या भल्या मोठ्या प्रवाळांच्या बेटाला ‘आंग्रिया’ असं नाव पडलं. आणि याच बेटाच्या नावावरून या क्रूझचं नाव आंग्रिया असं ठेवण्यात आलं आहे. ही क्रूझ जपानमधून मागवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here