शाळा निवडताना…

Mumbai
school

मागील वर्षी प्रदर्शित झालेला हिंदी मीडियम चित्रपट सर्वच पालकांनी पाहावा असाच. यातील मिता आणि राज या पालक जोडीची मुलांच्या शिक्षणासाठीची तगमग आज सर्वच पालकांमध्ये आढळते. पाल्य कोणत्या शाळेत, कोणत्या माध्यमात शिकतो हे प्रश्न पाल्याच्या विकासापेक्षा सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न बनत आहे. परिणामी मुलांच्या शिक्षणावर, भविष्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा पाल्याच्या शिक्षणाबाबत पालकांनी विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते.

* शाळा आणि सामाजिक प्रतिष्ठा या दोन भिन्न गोष्टींची एकमेकांशी केलेली तुलना पाल्याच्या सर्वांगीण विकासावर परिणाम करणारी ठरू शकते. तेव्हा केवळ प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून तर आपण पाल्याच्या शाळेची निवड करत नाही ना? असा प्रश्न प्रत्येक पालकाला पडलाच पाहिजे.

* सर्व सोयीसुविधांनी युक्त शाळेत आपल्या पाल्याचे शिक्षण व्हावे हे जवळपास प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. अनेकदा सुरुवातीला भरघोस खर्च करून नंतर आर्थिक अडचणींचा सामना करताना पाल्याच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. तेव्हा पाल्याची पुस्तके, खेळणी, छंदवर्ग, त्याच्या आवडीच्या इतर वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा शिल्लक राहतो काय? तसेच शाळेची फी आणि इतर खर्च आपल्याला परवडण्यासारखे आहेत काय? याबाबत पालकांनी सजग असणे गरजेचे आहे.

* हल्ली गल्लोगल्ली शाळांचे पीक आलेले आपल्याला दिसते. त्यातही नामांकित शाळांमध्येच पाल्याचे शिक्षण व्हावे हा आपला अट्टाहास असतो. याचा फायदा घेत काही शाळाही पालकांच्या हतबलतेचा लाभ घेत दरवर्षी भरघोस फी आकारतात. तेव्हा आपले आर्थिक शोषण होते काय? होत असल्यास काय करावे याबाबत पालकांनी विचार करावा.

* केवळ नामांकित शाळेत प्रवेश मिळाला म्हणजे पाल्याची प्रगती होत नाही. शाळेत शिकविलेले पाल्याला कळते की नाही याबाबत पालकांना सजग राहावे लागते. तेव्हा पाल्य शाळेत काय शिकत आहे? त्यांना अभ्यासात काही अडचणी असतील तर त्यांना आपण मदत करू शकतो का? याचा विचार करूनच पाल्यासाठी शाळेची निवड करावी.

* केवळ पुस्तकी ज्ञान पाल्याच्या विकासासाठी महत्त्वाचे नसून, पाल्याची शोधक वृत्ती आणि सर्जनशीलता यांना शाळेत वाव मिळतो का? याबाबीचा विचार करूनच आपल्या पाल्यासाठी योग्य शाळेची निवड करावी.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here