खेळा आणि तंदरुस्त रहा!

Mumbai
मैदानी खेळ

छोटे असो वा मोठे सर्वांसाठी मैदानी खेळ खुप महत्त्वाचे असतात. खेळणे आणि शिकणे यासाठी वयाची मर्यादा नसते. खरं तर खेळाची सवय मुलांना लहानपणापासूनच असायला हवी. नर्सरीमध्ये तर मुलांना फक्त खेळच शिकवायला हवेत. अभ्यास नकोच. मोठ्या मुलांसाठी खेळणे म्हणजे अधिकची ऊर्जा मिळवण्याचे चांगले माध्यम आहे. खेळांमधून मुले नानाविध प्रकारची कौशल्ये शिकतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हरणे आणि जिंकणे शिकतात! या दोहोंतला फरक त्यांना कळू लागतो. हार-जितचा अर्थ कळणे हे आयुष्याच्या अनेक टप्प्यात उपयोगी पडते. तर मोठ्यांनाही खेळातून अनेक फायदे आहेत. जिममध्ये जाऊन फिटनेस राखण्यापेक्षा खेळातून ती अधिक पटीने मिळेल. शिवाय टीम स्पिरीट, हरणं-जिंकणं, रोजच्या ताणतणावातील कामातून ब्रेक अशा दृष्टीनेही मोठ्यांनी मैदानी खेळाकडे पाहायला हवं.

मैदानी खेळामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मुले सक्षम होतात. सांघिक खेळ मुलांना समूहाने काम करण्याचा धडाच देतात. एकमेकांशी संवाद साधायला आणि एकमेकांमधील मतभेद दूर करण्याला खेळ शिकवतात.

मुले थोडी मोठी झाल्यावर, काही पालक त्यांचे खेळणे बंद करतात. एरवी खेळ म्हणजे मुलांना गुंतवून ठेवण्याचे केवळ माध्यम त्यांना वाटते. त्यामुळे जसजसा अभ्यास वाढत जातो, तसतसे पालकांना मुलांचे खेळणे म्हणजे वेळ वाया घालवणे वाटते. हा पूर्णत: चुकीचा विचार आहे. मुलांना खेळू द्यायला हवे. खेळण्यासाठी मुलांना वेळ काढता यावा, असे नियोजन पालकांनी पुढाकार घेऊन करायला हवे.

खेळामुळे होणारे फायदे –

– मुलांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढत नाही.

-स्नायू व हाडे मजबूत होतात.

-रोगप्रतिकारशक्ती वाढते.

-मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.

-रक्तदाबावर नियंत्रण राहते.

-चांगल्या कोलेस्टेरॉलमध्ये वृद्धी होते.

-अनेक प्रकारच्या कॅन्सरच्या धोक्यापासून मुक्ती मिळते.

-खेळण्यामुळे व्यक्ती प्रसन्न राहते.

-आत्मविश्वासात वाढ होते.

-स्वस्थ झोप येते.

-शारीरिक व भावनिक आव्हानांना आणि मानसिक ताणतणावांना चांगल्याप्रकारे यामुळे सामोरे जाता येते.

-जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here