उन्हाळ्यातील आरोग्य समस्यांचा करा प्रतिबंध

Mumbai
आरोग्य समस्या

आपल्या देशातील बहुतेक भागांमध्ये उन्हाळा कडक असला तरी अनेकांसाठी हा ऋतू म्हणजे परीक्षांपासून मुक्ती, मोठी सुट्टी आणि आंब्याचा मोसम असतो! या कालावधीत उष्म्यावर मात करण्यासाठी बहुतेक जण संध्याकाळी घरी थांबत नाहीत, पण उन्हाळ्यातील अ‍ॅक्टिव्हिटींमुळे आरोग्याला अतिरिक्त धोका निर्माण होऊ शकतो.
उन्हाळ्यात आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यावर एक दृष्टिक्षेप टाकू

अन्नातून विषबाधा होणे
मुलांना उन्हाळ्याची साधारण २ महिन्यांची सुट्टी असल्यामुळे सहलींना जाणे होते. आपण पिकनिक बास्केट घेऊन जातो, म्हणजे पदार्थ उष्ण वातावरणात राहतात. या उष्ण वातावरणाचा परिणाम होऊन अन्न दूषित आणि खराब होते आणि त्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. सॅल्मोनेला, ई. कोली यासारख्या जीवाणूंमुळे अन्नातून विषबाधा होते. त्यामुळे नाशवंत पदार्थ नेणे टाळा आणि ते नेले तर त्यांचा उष्म्यापासून बचाव होईल, याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे तुम्ही बाहेर काय खाताय याकडेही लक्ष ठेवा. खाद्यपदार्थ विकणार्‍या गाड्यांकडे मुले आकर्षित होतात आणि तळलेले पदार्थ किंवा थंड व गोड पदार्थ त्यांना खावेसे वाटतात. ते अस्वच्छ पद्धतीने तयार केलेले असू शकतात आणि त्यांच्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते.

उलटी, अतिसार, मळमळ, पोटात गोळे येणे, अशक्तपणा इत्यादी अन्नातून होणार्‍या विषबाधेची लक्षणे आहेत. ही परिस्थिती फार गंभीर नसली आणि एक किंवा दोन दिवसांत उपचारांविना बरे वाटू शकत असले तरी उन्हाळ्यात आपण काय खातो याची काळजी घेणे आवश्यक असते. तीन वेळा भरपूर जेवण जेवण्यापेक्षा थोडा आहार दिवसातून अनेक वेळा घ्यावा.

डिहायड्रेशन
आपल्या सर्वांना पाण्याचे महत्त्व माहीत आहे आणि आपण दिवसाला ६-८ ग्लास पाणी प्यायले पाहिजे, पण आपल्यापैकी काही जणच याचे पालन करतात. विशेषतः उन्हाळ्यात घामावाटे शरीरातून बरेच पाणी निघून जात असल्याने या काळात द्रवपदार्थांची गरज वाढते. आपल्या देशात डिहायड्रेशन हे सर्रास पहायला मिळते आणि याकडे दुर्लक्ष केले तर ते प्राणघातक ठरू शकते. प्रवास करताना आणि खूप वेळ बाहेर असणार असू तर पाणी बाळगणे अत्यावश्यक आहे. ही सवय मुलांनाही लावा कारण मुले पाणी पिण्यास टाळाटाळ करतात किंवा खेळताना पाण्याऐवजी थंड पेयांना प्राधान्य देतात. शीत पेये/कोला ही पेये असली तरी त्यात रसायनांसोबतच स्वीटनर्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज घातलेली असतात. हे घटक तात्पुरती तहान भागवत असले तरी शरीरासाठी अपायकारक असतात. द्रवपदार्थांची गरज भागविण्यासाठी शहाळ्याचे पाणी, फळांचा रस, सरबत (गुलाब, खसखस, लिंबू), ग्लुकोज हे चांगले पर्याय आहेत. या पर्यायांमुळे शरीराला आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाइट्सही मिळतात.

पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट बघू नका! तुम्हाला तहान लागली तर याचा अर्थ हा की, तुमच्या शरारीने द्रवपदार्थांचा राखीव साठासुद्धा वापरला आहे आणि तो आता पुन्हा भरण्याची गरज आहे आणि घरी पोहोचल्या पोहोचल्या गार पाण्यासाठी फ्रिज उघडू नका. सामान्य तापमानाला असलेले किंवा माठातील पाणी पिणे हितावह असते.

-डॉ. अमित गुप्ते, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here