कंबरदुखीवर करा मात

Mumbai
Low back pain

बदललेली जीवनशैली व सतत एका जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे अनेकांना कंबरदुखीचे दुखणे मागे लागते. कंबरदुखीची समस्या कोणालाही होऊ शकते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आधुनिकता वाढली आहे. युवा वर्गदेखील यापासून दूर नाही, पण वाढते वय आणि महिलांच्या बाबतीत ही समस्या जास्त पाहण्यात येते. कंबरदुखी सुरू झाल्यावर उपाय करण्यापेक्षा कंबरदुखी सुरूच होऊ नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. मोठा कोणताही रोग नसल्याची खात्री करून घेतल्यावर असणार्‍या कंबरदुखीवर योग्य उपचार करावेत. तसेच एखाद्या रोगामुळे जर कंबरदुखी असेल तर त्यावर योग्यवेळी उपचार करावेत.

कंबरदुखी निर्माण होऊ नये म्हणून काय करावे?

1) कामात बदल, विश्रांती गरजेची –
कामाचा ताण पाठीच्या स्नायूंना, लिगेंमेंट्स व मणके यांना त्रास होईल असे वाकून काम करणे या प्रमुख गोष्टी कंबरदुखीस कारणीभूत असतात. कारणे टाळण्यासाठी कामाच्या स्वरूपात बदल करावा. स्वयंपाक, पान मांडणे, वाढणे, केरवारे, धुणे ही कामे वाकून न करता बसून करावीत. यामुळे पाठीवर पडणारा ताण खूपच कमी होईल. तसेच सर्व कामे दिवसाच्या तासामध्ये वाटून घेतल्यास एकाच वेळी एकदम पडणारा ताण एकाचवेळी न पडता संबंध दिवसात विभागून जाईल. तसेच दोन कामांच्यामध्ये थोडी विश्रांती घेतल्यास सर्वच अवयवांना विश्रांती मिळते. योग्य तर्‍हेने कामात बदल, कामाची सबंध दिवसात वाटणी व योग्य विश्रांती ही त्रिकुटी कंबरदुखी न होण्यासाठी उपयोगी पडते.

२) आहार – योग्य नत्रयुक्तपदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे आहारात असणे आवश्यक आहे. यामुळे शरीराची होणारी झीज योग्यवेळी भरून निघून परत कामाचा ताण सहन करण्यासाठी शरीर तयार राहील.

३) नियमित व्यायाम – शरीरातील स्नायूंना व्यायामांनी पुष्टी मिळते व त्यातील ताकद वाढते. त्यामुळे सांध्यांच्या हालचाली नीट होतात. त्याचबरोबर जादा वाढणारी चरबी कमी होणे महत्त्वाचे असते. वजन जास्त असेल तर वयाबरोबर जीर्ण होणार्‍या सांध्यांना हे वजन पेलवत नाही व सांधेदुखी, गुढघेदुखी, कंबरदुखी हे विकार सुरू होतात. अर्थात घेतला जाणारा व्यायाम नियमित असावा.

४) स्त्रियांनी घ्यायची काळजी – पाळीच्या वेळी, गर्भारपणात व बाळंतपणात कंबरदुखी बहुतेक स्त्रियांच्यात आढळते. पाळीच्या वेळी, तसेच बाळंतपणातील कंबरदुखी ही गर्भाशयाच्या आकुंचनामुळे असते. तसेच गर्भारपणात पोटातील वाढणार्‍या गर्भामुळे मणक्यावर ताण येतो. या अवस्थेतील कंबरदुखीसाठी खास उपाय नाहीत. योग्य आहार, विहार, विश्रांती घेतली म्हणजे कंबरदुखी कमी होते.