जाणून घ्या, विषाणूमुळे होणा-या हेपटायटिसविषयी

विषाणूमुळे होणारा हेपटायटिस हा विविध प्रकारच्या विषाणूंमुळे यकृताला होणारा आजार आहे

Mumbai
हेपटायटिस

विषाणूमुळे होणारा हेपटायटिस हा विविध प्रकारच्या विषाणूंमुळे यकृताला होणारा आजार आहे. दोन प्रकारचे व्हायरल हेपटायटिस असतात – संसर्गजन्य (दूषित अन्न व पाण्यामुळे होणारे – हेपटायटिस ए आणि ई) आणि रक्तजन्य (दूषित रक्त किंवा शरीरातील द्रवामुळे होणारे – हेपटायटिस बी आणि सी)

हेपटायटिस ए

जगभरात होणाऱ्या व्हायरल हेपटायटिसमध्ये हा सर्वाधिक प्रमाणात आढळतो. हा विषाणू दूषित अन्न किंवा पाण्यात असतो आणि शरीरात प्रवेश केल्यावर तो यकृतावर परिणाम करतो. त्यामुळे यकृताला सूज येते आणि इजा होते. या आजारात रुग्णाला थकवा, अशक्तपणा, हलका ताप, कणकण, सांधेदुखी आणि कावीळ होते. या आजाराच्या गांभीर्याला मर्यादा आहेत आणि कालांतराने हा आपोआप कमी होतो आणि बरा होतो. या कालावधीत रुग्णाची नीट काळजी घेण्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकस आहार घेण्याची आवश्यकता असते. हेपटायटिस ए या आजारामुळे क्वचितच कन्फ्युजन (गोंधळ उडणे), सुस्ती येणे, बेशुद्ध पडणे अशा प्रकारची गुंतागुंत उद्भवते. असे झाल्यास परिस्थिती धोकादायक होते आणि त्यावर विशेष उपचार करावे लागतात.

आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ (हायजिनिक) पदार्थ, शुद्ध, उकळलेले पाणी यामुळे या आजाराला प्रतिबंध करता येतो. हेपटायटिस ए या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी लससुद्धा उपलब्ध आहे.

हेपटायटिस ई

हा आजारसुद्धा दूषित अन्न आणि पाण्यावाटे पसरतो. हा हेपटायटिस ए या आजारासारखा असतो आणि हा अधिक गंभीर रूप धारण करू शकतो आणि विशेषतः गर्भवती महिलांमध्ये गुंतागुंत निर्माण करू शकतो. या आजाराच्या प्रतिबंधासाठी लसही विकसित करण्यात येत आहे. या आजारासाठीही प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे.

वरील लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तींनी ताबडतोबड डॉक्टरकडे जावे आणि उपचार घ्यावेत आणि ज्यांच्यात गुंतागुंत निर्माण झाली आहे त्यांचे वेळेवर निदान करून उपचार करावेत.

हेपटायटिस बी

हेपटायटिस बी विषाणूमुळे होतो आणि तो हळुहळू यकृतावर परिणाम करतो आणि अनेक रुग्णांमध्ये तो सुप्तपणे अस्तित्वात असतो. त्याला वाहक अवस्था असे म्हणतात. त्यामुळे यकृताला इजा झालेले रुग्ण ओळखणे आणि त्याच्यावर उपचार करणे महत्त्वाचे असते. हेपटायटिस बी या आजारावर वेळीच उपचार केले नाहीत तर त्याचे पर्यवसान सिऱ्हॉसिसमध्ये (यकृताला भेगा पडणे आणि कायमचे नुकसान होणे), यकृत निकामी होणे आणि यकृताचा कर्करोग होण्यात होऊ शकते. हेपटायटिस बी या आजारावर उपचार करण्यासाठी औषधे सहज उपलब्ध आहेत आणि औषधांनी या आजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येऊ शकते. रुग्णाला असलेला सिऱ्हॉसिस पुढील टप्प्यावर पोहोचला असेल तर यकृताचे प्रत्यारोपण हा एकच पर्याय राहतो. हेपटायटिस बी या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी परिणामकारक लस उपलब्ध आहे.

हेपटायटिस सी

हेपटायटिस बी प्रमाणे हेपटायटिस सी मुळेही यकृताला इजा, यकृताचा सिऱ्हॉसिस आणि यकृताचा कर्करोग होऊ शकतो. हेपटायटिस सी या आजारासाठी अत्यंत परिणामकारक वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत आणि ही औषधे ३ ते ६ महिने घ्यायची असतात आणि हेपटायटिस सी पूर्ण बरा होतो. पण यकृताला कायमस्वरुपी नुकसान पोहोचण्यापूर्वी या आजाराचे निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे. दूषित रक्ताच्या संक्रमणामुळे हा आजार फैलावतो.

त्यामुळे सतर्क राहणे, तपासणी करून घेणे महत्त्वाचे असते. कारण हेपटायटिस बी आणि सी या आजारांसाठी परिणामकारक उपचार उपलब्ध आहेत.

(डॉ. अमित गुप्ते, कन्सलटंट गॅस्ट्रोइटरोलॉजिस्ट)