घरलाईफस्टाईलनिसर्गाशी जवळीक!

निसर्गाशी जवळीक!

Subscribe

आधुनिक तंत्रज्ञानामुळे जीवनशैली सुखकर झाली तरी प्रदूषित वातावरणामुळे आरोग्यमान मात्र बिघडले. छोट्या पिढीचा तर टीव्ही, मोबाईलच्या वेडापायी मैदानी खेळाशी संबंधच तुटत चाललाय. साहजिकच मोकळा वेळ मिळताच निसर्गाच्या सान्निध्यात रमण्यासाठी माणसे धाव घेतात.

आदिम काळापासून निसर्ग आणि सजीवसृष्टी यांचे वेगळेच नातेबंध राहिले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यातच सजीवसृष्टी बहरत गेली. निसर्गाला पूरक असे जीवनचक्र अंगिकारुन निसर्गाशी असलेले नाते घट्ट कसे राहील हेच प्रत्येक सजीवाने पाहिले. डार्विनचा सिद्धांत तर मुळी याच परस्परपूरक नातेसंबंधावर आधारीत आहे. जो निसर्गनियमांशी जुळवून घेऊ शकतो तोच आपले अस्तित्व टिकवून ठेऊ शकतो. ज्या सजीवाला तसे करता आले नाही त्या सजीवांच्या प्रजाती नामशेष झाल्याची उदाहरणे आहेत. सजीवसृष्टीतील महत्त्वाचा घटक मानव मात्र बुद्धिमान ठरला. विविध शोध लावून त्याने आपली प्रगती साधली. परंतु, ही प्रगती साधत असतानाच त्याने निसर्गावर मात्र अतिक्रमण केले. नैसर्गिक जंगलांची तोड करुन सिमेंट काँक्रिटची जंगले उभी केली. निसर्गाशी असलेली नाळ त्याने स्वत:हून तोडली. निसर्गाशी असलेल्या त्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

शहरीकरणामुळे मनुष्य निसर्गापासून दूर गेला. तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे जीवनशैली सुखकर झाली तरी प्रदूषित वातावरणामुळे आरोग्यमान मात्र बिघडले. छोट्या पिढीचा तर टीव्ही, मोबाईलच्या वेडापायी मैदानी खेळाशी संबंधच तुटत चाललाय. साहजिकच मोकळा वेळ मिळताच निसर्गाच्या सान्निध्यात रमण्यासाठी माणसे धाव घेतात. तशा सहली आयोजिल्या जातात. मोठ्या सुट्टीत तर सहकुटुंब गाव गाठतात किंवा निसर्गरम्य परिसरात जातात. यंदाच्या सुट्टीत आम्हीसुद्धा असेच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नडगिवे या गावी गेलो होतो. या काळात अवघं कोकण हिरवेगार झालेलं असतं. रानफुलांनी परिसर बहरलेला असतो. भातशेती तरारलेली असते. अधूनमधून गारवा जाणवत असतो. कोकणातील अशा रम्य निसर्गाच्या कुशीत शिरल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जाते.

- Advertisement -

गावी गेल्यानंतर असाच मस्त अनुभव आमच्याबरोबर किंबहुना जास्तच बच्चेकंपनीने घेतला. घरासभोवतालची हिरवळ, भातशेती, झाडे, हिरवे डोंगर पाहून बच्चेकंपनी आनंदली, मनसोक्त बागडू लागली. कानात वारा शिरल्यानंतर उड्या मारणार्‍या अवखळ खोंडासारखी त्यांची गत झाली. मातीत खेळता खेळता हातपाय मातीने माखले तरी त्यांना त्याची तमा नव्हती, भान नव्हते. मातीत खेळल्यानंतर विहिरीवर जाऊन आंघोळ करण्याचाही एक वेगळाच आनंद बच्चेकंपनीने घेतला. सुट्ट्यांच्या निमित्ताने त्यांना निसर्गाशी जवळीक साधता आली. ही जवळीक त्यांच्या बालमनाला सुखावून गेली. निसर्गाशी असलेले हे नाते त्यांना इतके भावले की परत परत गावी यायचे त्यांनी नक्की करुन टाकले. निसर्गाशी नाते असेच जपून ठेवायला हवे तरच निसर्गाची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहील.

– दीपक काशिराम गुंडये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -