सकारात्मक राहून तणावमुक्त व्हा

नकारात्मक विचाराऐवजी सकारात्मक विचार केल्याने तुमचे आयुष्य नक्की सकारात्मक होऊन तुमच्या जीवनातील ताण-तणावमुक्त होण्यास नक्कीच मदत होईल

Mumbai

धकाधकीचे जीवन जगत असताना अनेकदा कामाचा व्याप असल्याने ताणतणावामुळे आपले विचार नकारात्मक होतात. अशावेळी मला कोणतेही काम जमेल का?, मी काहीही करू शकत नाही? अशाप्रकारचे नकारात्मक बोलणे आपले स्वतःशीच अनेकदा सुरू असते. अशा नकारात्मक विचारामुळे व्यक्ती नैराश्यात जाण्याची शक्यता असते. अशा सतत नकारात्मक विचारामुळे व्यक्ती एकटा पडून स्वतःच्या नकारात्मक संवादामुळे निराशा येण्याची शक्यता असते.

अशावेळी मनात कोणतीही नकारात्मक भावना किंवा तसे विचार न करता मनात सकारात्मक विचार करण्यास प्राधान्य द्या. नकारात्मक विचाराऐवजी सकारात्मक विचार केल्याने तुमचे आयुष्य नक्की सकारात्मक होऊन तुमच्या जीवनातील ताण-तणावमुक्त होण्यास नक्कीच मदत होईल.

व्यक्ती जर ताण-तणावातून जात असेल तर त्या व्यक्तीला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या तणावामुळे हृदयविकार, डोकेदुखी तसेच इतर अजारांना विनाकारण आमंत्रण मिळते. या आजाराला पळून लावण्यासाठी हे काही खालील उपाय नक्कीच लाभदायक ठरू शकते.

दीर्घ श्वसन

श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. डोळे बंद करुन शांत आणि दीर्घ श्वसन सातत्याने करा. अशी कृती पाच ते सात वेळा केल्यास सगळा थकवा, ताण-तणाव दूर होईल आणि एकदम ताजेतवाने वाटण्यास मदत होईल.

काही वेळ एकांतात घालवा

नकारात्मक विचार घालवण्यासाठी आपला काहीसा वेळ एकांतात घालवा. काही क्षण मांडी घालून जरा निवांत बसा. थोडा वेळ डोळे मिटून हाताचे तळवे एकमेकांवर घासून त्याची ऊब डोळ्यांना द्या. दिवसातून कितीही वेळा ही क्रिया तुम्ही करु शकता. या साध्या सोप्या उपायाने ताजंतवानं राहण्यास मदत होईल.

मेडिटेशन

मन शांत करण्यासाठी मेडिटेशन करणे हा उत्तम पर्याय असू शकतो. मेडिटेशन करताना दोन मिनिटांसाठी डोळे मिटलेत तरी समोर अनेक विचार येतात परंतु हे मेडिटेशन करताना तुम्ही त्यांच्या मागे न जाता मेडिटेशनची प्रक्रिया सुरू ठेवा. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही मेडिटेशन करू शकतात. मनाला शांतता मिळाल्यास नकारात्मक विचार जाण्यास मदत होईल.

नित्यनेमानं करा व्यायाम

मार्शल आर्ट्स किंवा रोज सकाळी ताज्या हवेत फिरणं, जिन्यांची चढ-उतार करणे यापैकी कोणताही व्यायाम प्रकार नित्यनेमानं करणं अतिशय महत्त्वाचं आहे. शरीराला व्यायाम मिळाला की मेंदूही आपोआप फ्रेश होण्यास मदत होते. दैनंदिन व्यायाम तसेच योग साधना केल्याने अनेक आरोग्याच्या व्याधी कमी होण्यास मदत होते.