घरलाईफस्टाईलयेवा! सिंधुदुर्ग आपलोच आसा

येवा! सिंधुदुर्ग आपलोच आसा

Subscribe

देशातीलच नाही तर जगातील पर्यटक या निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि मालवणी संस्कृतीने बहरलेल्या या जिल्ह्याकडे खेचले जातात. त्यामुळे तुम्ही जगात कुठेही असाल आणि तुम्हाला कोकणात फिरायला जायचं असेल तर सिंधुदुर्गात नक्की या ! अस्सल मालवणी जेवण, भाषा, प्रसिद्ध मंदिरे, समुद्रकिनारे यांचा सुरेख आणि सुंदर असा मिलाप तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. गंभीर आणि निळाशार समुद्र,त्याच्याच साथीने मोकाट सुटलेला बेफाम वारा आणि साथीला तेवढेच बिन्धास्त आणि स्वभावाने गोड मालवणी स्थानिक लोक यांच्या सहवासात सहलीचे दिवस कसे संपतात याचा थांगपत्ताच लागत नाही.

भगवान परशुरामांनी वसवलेली भुमी अशी कोकण भूमीची आख्यायिका आहे. त्याच कोकणाचा सिंधुदुर्ग जिल्हा मुकूटमणी आहे. पर्यटन जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. देशातीलच नाही तर जगातील पर्यटक या निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि मालवणी संस्कृतीने बहरलेल्या या जिल्ह्याकडे खेचले जातात. त्यामुळे तुम्ही जगात कुठेही असाल आणि तुम्हाला कोकणात फिरायला जायचं असेल तर सिंधुदुर्गात नक्की या ! अस्सल मालवणी जेवण, भाषा, प्रसिद्ध मंदिरे, समुद्रकिनारे यांचा सुरेख आणि सुंदर असा मिलाप तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. गंभीर आणि निळाशार समुद्र,त्याच्याच साथीने मोकाट सुटलेला बेफाम वारा आणि साथीला तेवढेच बिन्धास्त आणि स्वभावाने गोड मालवणी स्थानिक लोक यांच्या सहवासात सहलीचे दिवस कसे संपतात याचा थांगपत्ताच लागत नाही. त्यात भर म्हणून मन प्रसन्न करायला नारळी – पोफळीच्या बागा असताताच. तेथील सहवासात शहरातील रोजच्या धकाधकीमुळे मनाला आलेला क्षीण आणि शरीराला आलेला थकवा कुठच्या कुठे पळून जातो. तळकोकणातील विशेषत:मालवण आणि देवगड तालुक्यातील काही ठिकाणे मन मोहवून टाकतात.

तारकर्ली समुद्रकिनारा.

मस्त आणि मजेशीर असा किनारा. केवळ वॉटर स्पोर्टच्या मजेपुरता हा बीच आता मर्यादीत राहिला नसून तुम्हाला स्कुबा डायव्हिंग देखील करता येते. त्यामुळे समुद्राखालचे विश्व पाहण्याची मजा काही औरचं. अगदी वाजवी दरात तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करता येते.

- Advertisement -

देवबाग.

सिंधुदुर्गात गेलात तर मालवण तालुक्यातील देवबागला नक्की भेट द्या. विस्तीर्ण असा समुद्र किनारा आणि लगबग पाहिल्यानंतर पाय निघायचे नाव घेत नाहीत. शिवाय, रापण चालू असताना गेलात तर मासेमारीचा अनुभव देखील घेता येतो. तसं तुम्ही मासळीचे शौकीन असाल तर मग काय? कोणतीही वाट न बघता बिनधास्तपणे ताव मारा.

शिवशंभूचे स्थान -कुणकेश्वर

समुद्रकिनारी वसलेलं हे मंदिर आणि मागे असलेला समुद्रकिनारी पाहिल्यानंतर मनात एक वेगळाच भक्तीभाव दाटतो. भक्ती, निसर्गाने उधळलेल्या सोैंदर्याचा आणि शांतीचा सुरेख असा मिलाप. त्यानंतर मालवण तालुक्यातील मसुरे या गावी असलेल्या आंगणेवाडीच्या प्रसिद्ध भराडीदेवीचे नक्कीच दर्शन घ्या.

- Advertisement -

साक्ष गौरवशाली इतिहासाची

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी आहे. त्यामुळे त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग किल्ला, देवगड किल्ला शेकडो वर्षांनंतरही समुद्राच्या लाटांना न जुमानता रूबाबात उभे आहेत.

खाद्यसंस्कृती

सिंधुदुर्ग आणि खाणे यांचे एक विलक्षण नाते आहे. सागोती वडे, घावणे आणि चटणी, आंबोळी , मालवणी खाजा, नारळ वडी,सुकी मच्छी असे एक ना एक पदार्थ तुम्हाला खाण्यासाठी मिळतील. बरं आणि तुम्ही शाकाहारी असाल तर काहीही काळजी करू नका. कारण सोलकढीचा समावेश असलेल्या मालवणी जेवणाचा आस्वाद देखील तुम्हाला घेता येईल.

शेवटी एक गोष्ट मात्र महत्त्वाची सिंधुदुर्गात फिरताना मालवणी भाषेशी मात्र नक्की मैत्री करा. काहीशी अवघड आणि कदाचित भाषा उद्धट वाटेल तुम्हाला. पण, त्या भाषेतल्या गोडव्याला मात्र तोड नाही आणि राहिला प्रश्न तो कोकणी माणसाचा तर वरून फणसाप्रमाणे वाटणारा कोकणी माणूस गर्‍यांप्रमाणे रसाळ आहे. तर मग वाट कसली पाहताय? बॅग भरा आणि या मग सिंधुदुर्गात. कारण हे सर्व वाचल्यानंतर तुमचं मन सिंधुदुर्गातील ‘नारबाच्या वाडीत’ पोहोचलं देखील असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -