गरोदरपणात पावसाळ्यात घेण्याची काळजी

स्त्रीने गरोदरपणात पावसाळ्यात अतिरिक्त काळजी घेण्याची आवश्यकता असते.

Mumbai
special instruction to in monsoon during pregnancy
गरोदरपणात पावसाळ्यात घेण्याची काळजी

गर्भावस्था हा स्त्रीचे आयुष्य बदलून टाकणारा कालावधी असतो. हा कालावधी आव्हानात्मक असला तरी एका नव्या जीवाला या जगात आणण्याचा अनुभव आणि आनंद अवर्णनीय असतो. संपूर्ण गरोदरपणात हॉर्मोन्सच्या पातळीमध्ये होणाऱ्या बदलांमुळे स्त्रीला सकाळी अस्वस्थ वाटणे, स्वभावातील उतार-चढाव, आहाराच्या बदललेल्या सवयी इत्यादींना सामोरे जावे लागते. पावसाळ्यातील कुंद वातावरणामुळे ही अस्वस्थता काकणभर अधिक जाणवू शकते. त्याचप्रमाणे या काळात संसर्ग होण्याचा आणि पडण्याची शक्यताही अधिक असते. त्यामुळे प्रसूती सुरळीत होण्यासाठी स्त्रीने अतिरिक्त काळजी घेण्याची आवश्यकता असते.

गरोदर असताना सर्व ऋतूंमध्ये, विशेषतः पावसाळ्यात खालील मूलभूत काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते
  • सकस आहार: गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळापासूनच तुमच्या घरचे सदस्य तुम्हाला पोषक आहार खाऊ घालत असतील. पण, या ऋतूमध्ये फळे आणि भाज्या नीट धुवून खाव्यात. नेहमी ताज्या पदार्थांना, विशेषतः फळांना प्राधान्य द्या. ती चिरून आणि साठवून ठेवू नका. बंद डब्यामध्ये साठवून ठेवले असतील तरी असे पदार्थ खाऊ नयेत. उघड्या पदार्थांना माशा आणि इतर कीडे दूषित करतात. त्याचप्रमाणे अन्नपदार्थ मातीतून किंवा अनारोग्यदायी पाण्यामुळेही दूषित होऊ शकतात.
  • रस्त्यावरील पदार्थ टाळावेत: गरोदरपणात जंक फूड, चॉकलेट इ. पदार्थ खावेसे वाटू शकतात. रस्त्यावरील विक्रेत्यांकडून हे पदार्थ घेऊ नयेत. त्यातील जिन्नस कसे हाताळले जातात आणि कशा प्रकारचे पाणी तेथे वापरले जाते, हे तुम्हाला माहीत नसते. पावसाळ्यात पोटाचे किंवा आतड्यांचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ नसलेल्या ठिकाणांहून खाद्यपदार्थ खाणे टाळावे. कुणी तुम्हाला घरी ते खाद्यपदार्थ करून देणार असेल तर उत्तम राहील.
  • हायड्रेटेड राहा: तापमान कमी असले तरी पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. गरोदरपणात खूप ऊर्जा वापरली जाते. पोषक अल्पोपहारासोबतच पाण्यासोबतच शहाळ्याचे पाणी, फळांचे रस प्यावे, जेणेकरून भोवळ थकवा इत्यादी येणार नाही.
  • वैयक्तिक स्वच्छता राखा: या ऋतूमध्ये सॅनिटायझर वापरावा. अथिरिक्त टॉवेल सोबत ठेवावा. ओल्या कपड्यांमध्ये फार काळ राहू नका. सोबत कपड्यांची अतिरिक्त जोडी आणि अंतर्वस्त्रे ठेवा आणि पावसात भिजलात तर लवकरात लवकर कपडे बदला. तुम्ही बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने शॉवर घ्या किंवा किमान हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा. पावसाळ्यात डास आणि कीटक मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे जंतू अनेक प्रकारच्या आजारांचे वाहक असतात. जे आई आणि गर्भासाठी घातक ठरू शकतात.
  • घरसुद्धा स्वच्छ ठेवा: तुमचे घर स्वच्छ करण्यासाठी चांगल्या दर्जाचे जंतूनाशक वापरा. अस्वच्छ जागांवर आर्द्र हवामानत पुरशी वाढते. ती श्वासावाटे शरीरात गेल्यास अपायकारक ठरू शकते. पावसाळ्यात अॅलर्जी होण्याची शक्यताही वाढते. तुम्ही घरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी कापूर किंवा कडुलिंबाचा वापर करू शकता. तुमचे घर स्वच्छ ठेवण्यासाठी घरगुती उपाययोजना माहित करून घेण्यासाठी इंटरनेटचा वापर करा.
  • आरामदायक, सैलसर कपडे वापरा: गरोदरपणात सिन्थेटिक आणि घट्ट कपडे वर्ज्य करावेत. विशेषत: पावसाळ्यात तर असे कपडे तुमच्या अंगाला चिकटतात. पावसाळ्यात आर्द्रता जास्त असते. त्यामुळे घाम येण्याचे प्रमाणही अधिक असते. म्हणून सिन्थेटिक कपडे अंगाला चिकटतात. त्वचेसाठी आणि माताच्या गर्भासाठीही हे चांगले नाही. पुरळ आणि बुरशीमुळे होणारे संसर्ग होऊ शकतात. त्यामुळे सुटसुटीत, सुती कपडे घालावेत जे घाम शोषून घेतील आणि तुम्ही सहज हालचाल करू शकाल.
  • पादत्राणे विसरू नका: या ऋतूत आरामदायी, न घसणारी पादत्राणे वापरणे अत्यावश्यक आहे. गरोदर असताना, विशेषतः शेवटच्या तिमाहीत चालणे कठीण होऊन बसते. आपल्या शहरांमध्ये निसरडे रस्ते आणि रस्त्यांवर खड्डेसुद्धा असतात. त्यामुळे तुम्ही योग्य मापाचे आणि ब्रिदेबल शूज घ्या. हील्स टाळावेत आणि बाजारत उपलब्ध असलेल्या शैलीदार फ्लॅट पादत्राणांची निवड करा. पादत्राणे वापरण्याआधी नीट धुवून आणि वाळवून घ्यावीत.

आई होणे आणि पावसाळा या दोन्ही गोष्टी आनंद घेण्याच्या आहेत. योग्य काळजी घेऊन तुम्ही निरोगी आणि सुरक्षित गर्भावस्थेची खातरजमा करू शकता आणि आनंदाला कवेत घेऊ शकता.


डॉ. माधुरी बुरांडे लाहा – सल्लागार, प्रसूतीतशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र, मदरहूड हॉस्पिटल