घरलाईफस्टाईलमधुमेहींसाठी खेळ, व्यायामाचे महत्त्व - भाग २

मधुमेहींसाठी खेळ, व्यायामाचे महत्त्व – भाग २

Subscribe

काही अभ्यासांती असेही दिसून आले आहे की, नियमित शारीरिक व्यायामामुळे मधुमेहींना हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा विकार होण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्क्यांनी कमी होते. आठवड्याला १५० मिनिटांची मध्यम वा तीव्र स्वरुपाची एरोबिक अ‍ॅक्टिव्हिटी वा ९० मिनिटांचा जोशपूर्ण एरोबिक व्यायाम करावा अशी शिफारस अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए आणि अमेरिकन डायबेटिक असोसिएशन (एडीए) यांनी केली आहे. एडीएच्या शिफारसीनुसार सर्वांनी आणि विशेषत: मधुमेहींनी सलग ९० मिनिटांहून अधिक काळ बसू नये आणि तशी परिस्थिती असल्यास मध्ये मध्ये उभे राहावे.

एरोबिक, रेसिस्टन्स व्यायाम
पूर्वी मधुमेहींना केवळ एरोबिक व्यायामाची शिफारस करण्यात येत असे. अलीकडे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार दिसून आले आहे की, रेसिस्टन्स व्यायाम (वजन उचलणे, पुश-अप्स) यामुळे तुमच्या इन्सुलिन संवेदनशीलतेमध्ये सुधारणा होते. त्याचप्रमाणे शारीरिक व्यायामामुळे मधुमेहातील गुंतागुंतही कमी होते. सर्व वयोगटातील सर्व व्यक्तींच्या प्रतिकार क्षमतेमध्ये व्यायामामुळे सुधारणा होते आणि हृदय विकार, स्ट्रोक, कर्करोग आणि इतर महत्त्वाच्या आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.

- Advertisement -

असा करावा व्यायाम
कोणत्याही प्रकारच्या मधुमेह उपचार योजनेमध्ये व्यायाम हा महत्त्वाचा घटक असतो. संभाव्य समस्या टाळण्यासाठी व्यायामाआधी, व्यायामादरम्यान आणि व्यायामानंतर रुग्णाने त्याच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण तपासून घ्यावे. व्यायामाला शरीर कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे ते यामुळे दिसून येईल. परिणामी रक्ताच्या शर्करेमध्ये होणार्‍या अपायकारक चढ-उतारांवर प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते.

कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी सर्व मधुमेहींनी आणि मधुमेह नसलेल्यांनीसुद्धा योग्य वॉर्म अप करावा आणि व्यायाम केल्यानंतर कूल-डाऊन पिरिअडही (शरीर पूर्वपदावर येण्यासाठी लागणारा कालावधी) ठेवावा. त्यामुळे स्नायूंना होणारी इजा टाळता येऊ शकेल. ती व्यक्ती एखाद्या क्रीडा प्रकारात सहभागी होणार असेल वा फक्त अ‍ॅक्टिव्हिटीची पातळी वाढवत असेल, मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य नियोजन असणे आवश्यक आहे. मधुमेह असलेल्यांना रक्तातील प्रमाणापेक्षा जास्त असलेल्या शर्करेमुळे असणार्‍या अपुर्‍या रक्तप्रवाहामुळे आणि नसेला इजा पोहोचल्यामुळे त्यांच्या पायाची समस्या निर्माण होऊ शकेल. पायाच्या समस्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तुम्ही कम्फर्टेबल व आरामदायी बूट घालावेत आणि शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटी करताना पायांची काळजी घ्यावी.

- Advertisement -

प्रिडायबेटिक्स – दर दिवशी किमान ६० मिनिटांचा व्यायाम
डायबेटिक्स – किमान १५० मिनिटांचा मध्यम वा तीव्र स्वरुपाचा एरोबिक व्यायाम करावा. किमान ३ दिवस व्यायाम करावा आणि दोन सलग दिवस व्यायामाविना असू नयेत. वजने उचलण्याचा व्यायाम करण्यास मनाई केली नसेल तर असा व्यायाम आठवड्यातून किमान २ वेळा करावा.

व्यायमाबाबत डॉक्टर्सचा सल्ला घ्या
तुमच्या नियमित व्यायामामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे हितावह असेल. असे केल्यामुळे सुरुवात करण्यापूर्वी तुमचे आरोग्य कसे आहे हे निश्चित करता येईल. या टप्प्यावर व्यायामाच्या दिनचर्येत तुमच्या इन्सुलिन किंवा औषधांमध्ये करण्याच्या बदलांविषयी डॉक्टर तुम्हाला सुचवू शकतात. व्यायाम करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा शरीराला मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेला आहारातील किंवा जेवणातील बदलही ते तुम्हाला सुचवू शकतील. मधुमेहींना ग्लायसेमिक नियंत्रणासाठी आणि आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटी आणि व्यायामाची शिफारस केली पाहिजे. मधुमेहाचा प्रकार, वय, शारीरिक श्रमांची सवय आणि मधुमेहाशी संबंधित इतर गुंतागुंत यावरून काही निश्चित शिफारसी आणि घ्यावयाची काळजी यात बदल होऊ शकेल.

डॉ. प्रदिप गाडगे, मधुमेहतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -