प्रजासत्ताक दिनाचे सामर्थ्य

२६ जानेवारी रोजी भारतामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होतो. गेली कित्येक वर्ष आपण हा दिवस साजरा करत आहोत. पण नेमकं या दिवसाचं काय महत्त्व आहे, हेच बहुतेकांना माहिती नसतं. अशावेळी हा दिवस केवळ सार्वजनिक सुट्टी म्हणून याकडे पाहिलं जातं. त्यामुळे २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व, त्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे आपण जाणून घेणार आहोत.

Mumbai
Republic-Day

काय करावे

* ध्वजारोहण शालेय विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, अधिकारी वगळता देशातील इतर नागरिक राष्ट्रीय सण साजरा करण्याचा कंटाळाच करतात. देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येत राष्ट्रीय सण साजरे केले पाहिजे. तेव्हा या दिवशी आपल्या जवळच्या शासकिय कार्यालयं, इमारती, शाळा आदी ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहावे.

* परिसर स्वच्छता, वृक्षारोपण – या दिवशी सर्वांनी एकत्र येत आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा. विविध सामाजिक संस्थांद्वारे वृक्षारोपण तसेच स्वच्छतेचे कार्यक्रम राबवण्यात येतात. त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होत परिसर स्वच्छता ठेवावा, वृक्षारोपण करावे.

* सैन्यांचे शौर्य – २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ, नवी दिल्ली येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. आपल्या देशातील सर्व राज्यांचे चित्ररथ यावेळी प्रदर्शन करतात. आर्मी, वायू, नौका या तिनही सैन्य दलातर्फे सादर करण्यात येणारे शिस्तबद्ध संचलन, कवायतींचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर होते. त्याचा आस्वाद घ्यावा.

* सेवानिवृत्त सैन्य अधिकारी – या दिवशी आपल्या परिसरातील सेवानिवृत्त सैन्य अधिकार्‍यांची आवर्जून भेट घ्यावी. त्यांच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यापेक्षा वेगळी संधी तुम्हाला क्वचितच मिळेल.

* मतदानाचा हक्क – आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो, हे मतदानाच्या दिवशी विसरतो. सुजाण, जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणे हा आपला हक्क असून तेच कर्तव्यही आहे. तेव्हा या दिनाचे औचित्य साधत, मी मतदानाचा हक्क बजावणार, अशी प्रतिज्ञा घ्यावी.

काय करु नये

* राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचा अपमान करू नये.

* या दिवसात राष्ट्रध्वजाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. पण दुसर्‍या दिवशी हेच राष्ट्रध्वज कचर्‍याच्या ढिगार्‍यात दिसतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो.

* या दिवशी अनेक ठिकाणी राष्ट्रगीत म्हणण्यात येते. तेव्हा राष्ट्रगीत कानी पडताच जागच्या जागी थांबावे.

* राष्ट्रीय सणानिमित्त देण्यात येणार्‍या सुट्टीचा गैरवापर करणे टाळावे.सुस्तीत, फिरण्यात वेळ वाया न घालवता, लोकोपयोगी कामं करावी.